अनेक मुलांना भावनिक आणि लैंगिक आकर्षण फक्त मुलींबद्दल वाटतं. अनेक मुलींना लैंगिक व भावनिक आकर्षण फक्त मुलांबद्दल वाटतं. याचा अर्थ या मुलांचा किंवा मुलींचा लैंगिक किंवा भावनिक आकर्षणाचा कल विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे असतो. अशा विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे असणाऱ्या लैंगिक किंवा भावनिक कलाला भिन्नलिंगी लैंगिक कल म्हणतात. इंग्रजीत याला हेटरोसेक्शुअल म्हणतात.
काही मुला-मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण वाटतं. मुलींना मुलं आणि मुली दोघांबद्दल लैगिक आकर्षण वाटतं आणि मुलांना देखील मुलं आणि मुली दोघांबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण निर्माण होतं. अशा आकर्षणाला उभयलिंगी लैंगिक कल असं म्हणतात. उभयलिंगी कल असणाऱ्या म्हणजे बायसेक्शुअल व्यक्ती गोंधळलेल्या असतात असा मात्र याचा अर्थ होत नाही. एका व्यक्तीला एकाच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटलं पाहिजे असा काही निसर्गाचा नियम नाही.
काही मुला-मुलींना केवळ त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. म्हणजेच मुलांना फक्त मुलांबद्दल आणि मुलींना फक्त मुलींबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण वाटतं. याचा अर्थ या मुला-मुलींचा लैंगिक-भावनिक आकर्षणाचा कल समलिंगी असतो. अशा व्यक्तींना समलिंगी कलाच्या किंवा समलिंगी व्यक्ती म्हणतात. इंग्रजीत समलिंगी मुलांना किंवा पुरुषांना गे म्हणतात तर समलिंगी मुली किंवा स्त्रियांना लेस्बियन म्हणतात.
कोणत्याही व्यक्तीबाबत निर्माण होणारं लैंगिक आकर्षण नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. त्यात चुकीचं असं काहीही नाही.
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/