यासाठी तुम्हाला गर्भनिरोधक वापरावे लागेल. गर्भनिरोधक म्हणजे असं साधन किंवा पद्धत ज्यामध्ये गर्भधारणा किंवा गर्भाची वाढ टाळता येईल. यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीजाचं मिलन रोखणे, फलित बीज गर्भाशयाच्या भिंतीवर रूजू न देणे किंवा ठराविक काळाच्या आत रुजलेला गर्भ काढून टाकणे असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यातलं सुरक्षित काय आणि शरीरासाठी घातक काय ते जाणून घेऊन मग त्या साधनांचा वापर करणं कधीही चांगलं. नेमके कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून ठरवू शकता.
नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात मात्र गर्भनिरोधक वापरण्याची सगळी जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली दिसते. खरं तर पाळी चक्रातले काहीच दिवस स्त्री जननक्षम असते किंवा गर्भ धारणा होऊ शकते. पुरुषाच्या शरीरात मात्र रोज लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं तयार होत असतात आणि प्रत्येक वेळी वीर्यामध्ये पुरुषबीजं असतात. तसंच निरोध ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक गर्भनिरोधक पद्धत आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे.
गर्भनिरोधकांविषयी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.