माफ करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खूप उशीर झाला. प्रश्नांची संख्या वाढल्यामुळे आणि इतर काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही वेळेत उत्तर देऊ शकलो नाही. तुमची समस्या समजली. आमचा सल्ला आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमच्या लग्नाला एकच वर्ष झाले आहे. स्वतःला वेळ द्या. घाईचे काही कारण नाही. गर्भधारणा कशी होते ते समजून घ्या. अन्डोत्सर्जन होण्याचा काळ साधारणपणे समजला तरी तुम्ही त्या काळात गर्भधारणेसाठी प्रयत्न करू शकता. तुम्ही कसली औषधं घेतली आहेत ते सांगितले नाही. त्यामुळे त्यावर काही बोलता येणार नाही.
पण बाळाची अपेक्षा ठेवणाऱ्या स्त्रियांना डॉक्टर अनेकदा आयर्न आणि विशेषतः फोलिक असिड हे पूरक औषध सुचवितात. तुमच्या डॉक्टरांना याबद्दल तुम्ही अधिक तपशीलात विचारा. आहाराविषयीसुद्धा तुम्हाला त्यांचा किंवा एखाद्या डायटेशियेनचा सल्ला घेता येईल. परंतु प्रतिकारशक्ती चांगली असणे, रक्तात एच. बी.चे प्रमाण पुरेसे असणे आणि तणावरहित जीवनशैली असणे हे कधीही चांगले. त्यासाठी आपली दैनंदिनी तशी ठेवणे उत्तम.
पाळीच्या दिवसात बहुतके स्त्रियांना ओटीपोटात दुखते, पायात गोळे येतात किंवा कंबर दुखीची तक्रार असते. ते सहन करण्यासारखे नसेल तर डॉक्टरांना दाखवा.
गर्भधारणेत जर काही अडचण असेल, गर्भ राहत नसेल, अबोर्शन होत असेल तर त्यावर आमच्यापेक्षा डॉक्टरच अधिक अधिकारवाणीने बोलू शकतील. पण त्यासाठी तुम्ही दोघांनीही एकत्र जाणे, ज्या तपासण्या सांगितल्या जातील त्या दोघांनी करणे आवश्यक आहे.
तेंव्हा काळजी करू नका, वेळ घ्या आणि आवश्यक असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या. टेक केअर..