गर्भधारणा होण्यासाठी पाळीचक्रातील अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का स्त्रीबीज बीजकोषातून बाहेर आलं की फक्त 12 ते 24 तास जिवंत राहतं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते. प्रत्येक स्त्रीचं पाळी चक्र वेगवेगळं असू शकतं. नियमित येणार्या पाळीचक्रातील बदलानुसार तुम्हाला सुरक्षित काळ(ज्या काळात गर्भधारणा होत नाही तो काळ) शोधून काढावा लागतो. शिवाय तो काळ नक्की किती सुरक्षित असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळं गर्भनिरोधके वापरणं जास्त सुरक्षित मानलं जातं. शिवाय यातून लिंगसांसर्गिक आजार होण्याचा धोकादेखील कमी होतो.
महत्वाचं: असुरक्षित शरीरसंबंधामुळं नको असणारी गर्भधारणा झालीच तर त्याचे मानसिक आणि शारीरिक परिणाम स्त्रीयांनाच जास्त सोसावे लागतात. जबाबदार आणि समजूतदार जोडीदार बनण्यासाठी तुम्हालाही एक पाऊल उचलावं लागेल.