लैंगिक भावना होणं अगदी नैसर्गिक आहे. वयात येताना आणि वयात आल्यावर बहुतेकांच्या मनात कुणाविषयी तरी लैंगिक भावना निर्माण होतात. अनेक जण त्या व्यक्त करतात किंवा आपल्यापाशी ठेवतात. मनात निर्माण होणाऱ्या भावना प्रत्यक्षात कृतीत उतरतील अशी परिस्थिती मात्र नेहमी नसते. मग या भावना शमवण्यासाठी कुणी हस्तमैथुन करतात. त्यात गैर काही नाही.
आपल्या समाजात लैंगिक संबंध किंवा सेक्स आणि लग्नाचा फार जवळचा संबंध लावला गेला आहे. पण खरं तर लग्न हा एक सामाजिक विधी आहे आणि सेक्स ही नैसर्गिक ऊर्मी. त्या दोन्हीचा संबंध लावल्याने सगळ्यांचीच मोठी गोची झाली आहे. लैंगिक भावना निर्माण होतात, कुणी तरी जोडीदार असतो पण केवळ लग्न झालेलं नाही म्हणून मनातल्या भावनांचा कोंडमारा होतो. पण समाजाच्या अपेक्षांमुळे कधी कधी हे आपल्याला मान्य करावं लागतं.
खरं तर लैंगिक भावनांची अभिव्यक्ती विविध प्रकारे होऊ शकते. तुम्ही आणि तुमचा किंवा तुमची जोडीदार सज्ञान असाल, तुमचा एकमेकांवर विश्वास असेल, दोघांच्याही मनात लैंगिक संबंधांची इच्छा असेल आणि दोघांचीही तयारी असेल तर सेक्समध्ये काही गैर नाही. पण त्यासाठी दोघांची संमती, इच्छा आणि तयारी आवश्यक आहे. जर तुम्ही एकटे असाल, तुम्हाला कुणी जोडीदार नसेल तर तुम्ही हस्तमैथुन करून स्वतःच्या लैंगिक भावना शमवू शकता. त्यामध्ये काही वाईट नाही.
जाता जाता असाही विचार करून पहा. इतर भावनांसारख्याच लैंगिक भावनाही नैसर्गिक आहेत. त्या आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे मन वेगळ्या गोष्टीत गुंतलं तर या भावनांपासून थोडा काळ दूर जातं. अनावर लैंगिक इच्छा कधी कधी घातक ठरू शकते. त्यामुळे भावना येत असतील तर येऊ द्या. दर वेळी त्यातून काही घडायलाच पाहिजे असंही नाही. लैंगिक भावना आणि सेक्स आनंददायी असतात, जीवनावश्यक नाही.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा