Viagra हे औषध आहे. आणि औषध हे आजार असला तरच दिलं जातं. त्यामुळे ज्या पुरुषांना लिंग ताठर होण्यामध्ये अडचणी येतात त्यांना डॉक्टरी सल्ल्याने काही औषधं दिली जातात. त्यातलं एक म्हणजे Viagra.
ही गोळी खावी का? असा प्रश्न तुम्ही विचारला आहे. त्याच्या उत्तराकडे वळण्याआधी मुळात लिंग ताठर न होणे हा खरोखर आजार आहे का याचा विचार वेगळ्या पद्धतीने करावा असं वाटतं. लिंग अजिबातच ताठर होत नसेल तर ती समस्या आहे कारण त्यामुळे संभोग करण्यात अडचण येऊ शकते. पण लिंग ताठर होण्यामध्ये फार जास्त अडचण येत नसेल तर इतर मार्गांनीही शरीर संबंध सुखकारक करता येतात. लिंग हा शरीराचा अवयव आहे, मशीन नाही. त्याचा ‘परफॉर्मन्स’ चांगला आहे का नाही हे शरीरावर आणि मनावर, सेक्स करताना काय वातावरण आहे, एकमेकांशी किती संवाद आहे, एकमेकांबद्दल संवेदनशीलता आहे का यावरही अवलंबून असतं. तसंच संभोगव्यतिरिक्त इतर मार्गांनीही शरीराला आणि मनाला लैंगिक सुख मिळू शकतं हे समजून घ्यायला पाहिजे.
आता Viagra औषधाच्या परिणामाविषयी. लिंग ताठ होण्यासाठी आणि जास्त काळ ताठ राहण्यासाठी Viagra दिलं जातं. मात्र काही जण कसलीही समस्या नसताना केवळ लैंगिक संबंध जास्त काळ टिकण्यासाठी Viagra चा वापर करतात असं भारतातल्या आणि बाहेर देशातल्या काही अभ्यासांवरून दिसून आलं आहे. याचे परिणाम मात्र चांगले नाहीत. वैद्यकीय कारणाशिवाय Viagra घेणाऱ्या पुरुषांमध्ये सेक्सविषयी आणि लिंग ताठर होण्याविषयी मोठ्या प्रमाणावर टेन्शन असल्याचं आणि Viagra शिवाय लिंग ताठर न होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आलं. त्यामुळे गरज नसेल, डॉक्टरी सल्ल्याशिवाय Viagra घेणं चुकीचं आणि आरोग्यासाठी, सेक्ससाठीही घातक आहे.
Viagra चे आरोग्यावर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी http://www.nhs.uk/medicine-guides/pages/MedicineSideEffects.aspx?condition=erectile%20dysfunction&medicine=sildenafil%20citrate&preparation=Sildenafil%2025mg%20tablets ही लिंक पहा.
दुसऱ्या बाजूने साइड इफेक्टचा विचार केला तर लैंगिक नात्यामध्ये दुसऱ्या जोडीदाराची मनाची आणि शरीराची तयारी या गोष्टी चांगल्या लैंगिक संबंधासाठी आवश्यक आहेत. Viagra घेऊन लिंग जास्त आणि जास्त काळ ताठर राहील याची खात्री करताना आपल्या जोडीदारावर आपण संभोगासाठी जबरदस्ती करत नाही ना, जास्त अपेक्षा ठेवत नाही ना, लिंग जास्त ताठ झाल्याने आपल्या जोडीदाराला इजा होत नाही ना याचा विचार केला जाणंही महत्त्वाचं आहे. लैंगिक संबंध हे दोघांनी एकत्र करायचे असतात. त्यात एकाने बाजी मारणं योग्य म्हणता येईल का?
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा