लैंगिक संबंधामध्ये कोणतीही जबरदस्ती नसेल किंवा एकेमेकांचा आदर ठेवत संबंध ठेवले गेले तर लैंगिक सुखाचा आनंद जोडीदारालाही घेता येतो. केवळ स्त्रीला उत्तेजित करण्यापेक्षा लैंगिक सुखाचा आनंद दोघानांही कसा घेता येईल यावर विचार व्हायला हवा. शिवाय संभोग करताना गर्भधारणा टाळायची असेल तर योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करणं फायदेशीर राहतं. पुढे लिहिलेलं उत्तर केवळ उत्तेजना निर्माण कशी होते याव्यरिरिक्त लैंगिक सुखाचा आनंद कसा घेता यईल यादृष्टीने लिहिलं आहे.
तुम्ही ज्या जोडीदारासोबत समागम(संभोग/सेक्स) करता त्याच्याबद्दल आदर असणं महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही समोरील जोडीदाराला केवळ संभोग(सेक्स) करण्याची वस्तू समजता त्यावेळी लैंगिक सुख कितपत मिळेल यावर शंका आहे. जोडीदाराच्या कलेने, त्याला कोणत्या गोष्टींमधून/कृतींमधून आनंद मिळतो हे पाहणं लैंगिक उत्तेजनेसाठी महत्वाचं असतं. लैंगिक संबंधांमध्ये, हस्तमैथुन करताना किंवा कुठल्याही प्रकारे लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर एक क्षण असा येतो जेव्हा लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठला जातो. हा सुखाचा बिंदू गाठल्यावर शरीराला, मनाला एकदम हलकं, शांत वाटू लागतं. यालाच इंग्रजीमध्ये ऑरगॅझम असं म्हणतात. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही ऑरगॅझमचा अनुभव येतो. स्त्री-पुरुषांच्या ऑरगॅझम बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.
पुरुषांमधील ऑरगॅझम
लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर पुरुषाचं लिंग ताठर होऊ लागतं. हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक प्रकारचा ताण निर्माण होतो. पण हा ताण हवाहवासा वाटत असतो. लिंग ताठर झाल्यानंतर काही काळाने हा ताण अगदी टोकाला पोचतो आणि त्याच क्षणी लिंगातून वीर्य बाहेर येतं. याला वीर्यपात म्हणतात. किंवा इंग्रजीमध्ये याला इजॅक्युलेशन म्हणतात. ऑरगॅझमनंतर लिंग परत शिथिल होतं आणि शरीराला मोकळं, हलकं वाटू लागतं. पुरुषांचा ऑरगॅझम वीर्य बाहेर येण्याशी निगडित आहे.
स्त्रियांमधील ऑरगॅझम
स्त्रियांना अशा प्रकारची संवेदना किंवा जाणीव असते हेच अनेक स्त्री पुरुषांना माहित नसतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना ऑरगॅझमचा अनुभवच आलेला नसतो. स्त्रियांच्या योनिमध्ये क्लिटोरिस नावाचा एक पूर्णपणे लैंगिक अवयव असतो. क्लिटोरिस अतिशय संवेदनशील अशा स्नायूंनी बनलेला असतो. त्याचं टोक मूत्रद्वाराच्या किंवा लघवीच्या जागेच्या वरच्या बाजूला असतं पण त्याची आतली रचना संपूर्ण योनिमध्ये असते. क्लिटोरिसला स्पर्श झाला, ते घासलं गेलं की ते उत्तेजित होऊन थोडं ताठर होतं. हळूहळू त्यातील संवेदना वाढतात. स्त्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लैंगिक सुखाचा बिंदू गाठला की योनि व योनिमार्गातील, गुदद्वाराचे स्नायू प्रसरण आकुंचन पावतात आणि स्त्रीला लैंगिक सुखाचा अनुभव येतो. अनेकदा स्तनाग्रं किंवा शरीरातील इतर अवयवांना कुरवाळल्याने किंवा स्पर्श केल्यानेही ऑरगॅझम यायला मदत होते.
स्त्री आणि पुरुष जर संबंध करताना एकताल झाले असतील, एकमेकांच्या कलाने संबंध करत असतील तर दोघांनाही एकाच वेळी ऑरगॅझमचा अनुभव येतो. मात्र दर वेळी असं होईलच असं नाही. मात्र लैंगिक संबंधांमध्ये दोघांनाही हे सुख अनुभवण्याचा अधिकार आहे.