रक्तसमाधी

2,142

स्त्रीपुरुष प्रेमातील शरीर अनुभवाचे धुंद, मोकळे, धीट चित्रण करणारी करंदीकरांची  ‘रक्तसमाधी’ ही संपूर्ण नवी आणि आशयसंपन्न कविता खास वेबसाईटच्या वाचकांसाठी…

रक्तसमाधी

विचार- वाचन व्याख्यानांनी होउन वेडे आपण

खेडे शोधात गेलो;

आणिक शेवट आलो धावत जेथे

आकाश निळे वरती;

आपण भूमीवरती

हिरवळ आपल्याभोवती

आणिक देवीच्या राईतील पक्षी कुजबुज करिती.

आतुरतेने संकल्प होऊन आलिस तू मग जवळी

आणिक त्या वेळी ! त्या अद्भुत काली !!

अर्धोन्मीलित काळ्या डोळ्यांतुनिया

त्याहुन काळी उफाळली मग ज्वाळ;

गाल बोलले; नेत्र बोलले; ओठ बोलले; एकच ‘माला… माला’

केस तुझे सुटलेले पाठीवरती;

उभारलेले स्तन टवटवते पुढती;

आणिक त्या उन्मादक

भरिव नितंबाच्या भवतीच्या नीटस रेषा मोहक;

नितंब गोरे, मृदल, गोल नी मांसल;

मस्त, पुष्ट, मादक मांड्या थरथरती;

विवस्त्र झालेली तब कंबर माझ्या पुढती झुलती.

हृदयाजवळी घट्ट घेउनी आवळताना तुजला

देह जाहला घामाने मग ओला;

तीव्र, गूढ निश्वसने

गाउ लागली अनंत अपुरे गाणे;

रक्त लागले नाचू आणिक गाऊ;

मृत्युतूनही अमर लागले होऊ;

जिवाजिवांच्या तारा साऱ्या जुळल्या;

संगितलहरी उठल्या रुधिरामधुनी;

जुन्या काळची नव्या सुरातून गाउ लागलो गाणी;

तुझ्यात गेलो, विरलो; आणिक मेलो;

मजला पाजुन, तुजला गिळलो; प्यालो;

मीपण गेले; तूपण आले … आले.

जीवन संगित झाले, जीवन प्याले !

अव्यक्ताला व्यक्त करायासाठी

अद्वैतातच विरल्या सार्‍या गाठी;

विसरुनि गेलो अद्वैतातच मीपण,

स्वत्वाचे सरंक्षण;

आणि त्या आत्यंतिक अद्भुत वेळी

दिक्कालाची बेडी भंगुन गेली.

रक्तसमाधित दिव्य रवाने वदलो जेव्हा दोघे

तू…” ये…ये….” मी- घे…घे…”

रक्तसमाधी लागुन विरली माया;

रक्तातुनिया रक्त मिसळले जीवन पुढती न्याया.

 

स्त्रीपुरुष प्रेमातील शरीर अनुभवाचे धुंद, मोकळे, धीट चित्रण करणारी ही कविता आहे. हा अनुभव व्यक्त करण्यासाठी करंदीकरांनी ‘रक्तसमाधी’ ही संपूर्ण नवी आणि आशयसंपन्न प्रतिमा निर्माण केली आहे. ही प्रतिमा हेच या कवितेचे केंद्र आहे. या प्रतिमेचे वैशिष्ट्य ध्यानात घेतले पाहिजे. सळसळनाऱ्या तरुण रक्ताची आसक्ती आणि त्यातून घडणारे शरीर मिलन हा मुख्य अनुभव. पण या रक्ताशी समास घडतो समाधी या शब्दाचा. समाधी हा शब्द आपण अध्यात्मिक अर्थाने वापरतो. या पारंपारिक अध्यात्मिकतेत शरीर आसक्तीचा अनुभव नाकारण्याची, कळत न कळत पापकल्पनेशी त्याची सांगड घालण्याची आपली प्रवृत्ती असते. परंतु करंदीकर हा शरीर अनुभव नाकारत नाहीत. हा अनुभव त्यांना सुंदर चैतन्यपूर्ण वाटतो, ‘जीवन पुढती’ नेणारा वाटतो. आणि म्हणूनच एखादा अध्यात्मिक अनुभव स्वीकारावा तितक्या सहजतेने ते या अनुभवाचा स्वीकार करतात : या मोकळ्या स्वीकारशीलतेतून रक्त आणि समाधी या दोन गोष्टी एकत्र येऊन रक्त समाधी ही एकवट प्रतिमा निर्माण होते. शरीर अनुभव निरोगी वृत्तीने स्वीकारणारी करंदीकरांची ही जीवनदृष्टी त्यांच्या अनेक कवितांतून रंगेलपणे व्यक्त झालेली आहे. जीवनातील हा मुलभूत अनुभव मोकळ्या शरीरमनाने घेताना व्यक्त आणि अव्यक्त, द्वैत आणि अद्वैत यांच्यामधील कृत्रिम भिंती जणू गळून पडतात. अद्वैतात मीपणाची जाणीव, स्वत्वाचे संरक्षण करण्याचा काच विरून जातो. या रक्तसमाधीत ब्रह्म आणि माया हा भेदच नष्ट होतो.

कवितेत दुसऱ्या कडव्यात स्त्रीदेहाचे धीट, संवेदनांना चैतन्यपूर्ण अवाहन करणारे चित्र करंदीकरांनी रेखाटले आहे. “ तुझ्यात गेलो, विरलो, आणिक मेलो; मजला पाजुन, तुजला गिळलो, प्यालो,” या ओळींतील क्रियापदे तादात्म्याच्या सीमेवर निडर बेहोषीने कोसळतात आणि त्यापुढे येणारी ‘जीवन संगित झाले’, ही ओळ अधिकच अर्थपूर्ण करतात.

बोरकरांच्या ‘दुधसागर’ या कवितासंग्रहात ‘रमलाची रात्र’ ही रतिसुखाचे धुंद चित्रण करणारी सुंदर कविता आहे. या कवितेतील ‘कळले का मज जडते देवा नरकाची ओढ’ ही ओळ अंतर्मनातील या अनुभवाशी संबद्ध असलेली पापकल्पना न कळत व्यक्त करते. करंदीकरांच्या या कवितेत ही पापाची जाणीव कुठेच नाही. शरीर अनुभवाचा आदिम सहजतेने येथे स्वीकार केलेला आहे.

संदर्भ: मंगेश पाडगावकरांनी संपादित केलेल्या ‘संहिता: विंदा करंदीकरांची निवडक कविता’ या कविता संग्रहातील कविता.

Comments are closed.