बलात्कार…! अॅड एकनाथ ढोकळे

3 1,425

बलात्कार…!

तर, बरीच चर्चा सुरु आहे बलात्कारांवर, अनेकानेक बलात्कारांवर, पुनः पुन्हा बलात्कारांवर. नाही म्हणजे, बलात्कार करणारे विकृत असतात इथंपासून ते स्त्रियांचे कमी कपडे बलात्काराला जबाबदार असतात इथंपर्यंत व बलात्कार हे सत्तेचं, नियंत्रणाच साधन आहे इथंपासून तर बलात्कारालाही असतो जात नि धर्म इथंपर्यंत, बरीच चर्चेरुपी उलथापालथ झाली आहे, चालू आहे, चालू राहील. अजून एखादा असाच बलात्कार समोर आला की. ती परत नव्याने सुरु होईल, अट एवढीच, की त्यात थोडं क्रौर्य हवं. बाकी नवऱ्याचा (बिन क्रौर्याचा वगैरे) बलात्कार आम्ही बऱ्यापैकी चालवून घेतलेला आहे. सो.. बलात्काऱ्यांनो पुढच्या वेळीही असं थोडसं क्रुर रहायला विसरु नका, ही सुरुवातीलाच नम्र विनंती, म्हणजे अगदी ‘प्रथम नमो….’ या भावनेने ही विनंती. अर्थात आपल्या आजूबाजूला अजून बरेच बाकी आहेत की, ज्यांना ह्या क्रौर्याच्या अनुभवाने अजूनही फँटसीयुक्त ऑरगॅझम मिळालेला नाही, त्यांचावर तरी निदान थोडी दया करुन थोडं क्रौर्य अजून दाखवाच…!!!

आता जरा मुद्यावर येऊया. काही प्रश्नांची उत्तरे मला स्पष्टपणे ‘नाही’ अशीच द्यायची आहेत. त्यात,

१. बलात्कार करणारे विकृत असतात का?
नाही.

२. कमी कपडे घातल्याने बलात्कार होतो का?
नाही.

३. लैंगिक इच्छा पुर्ण करण्यासाठी बलात्कार होतो का?
नाही.

आणि काही गोष्टींना मला स्पष्टपणे ‘हो’ म्हणायचं आहे.

१. बलात्कार बदला घेण्यासाठी होतात का?
हो.

२. बलात्कार सत्ता व नियंत्रण ठेवण्यासाठी होतात का?
हो.
३. बलात्कारालाही जात- धर्म असतो का?
हो.

वरील गोष्टी जरा समजून घेऊयात.

बलात्कार करणारे अजिबात विकृत वगैरे नसतात. तस असतं तर आयुष्यात ते सतत सीरिअली बलात्कार करत फिरत राहिले असते. शिवाय इतर सर्वच गोष्टीत हे अगदी सामान्य असतात मग बलात्कारापूरतेच ते विकृत होण्याची सुतराम शक्यता नाही. आजवरच्या बलात्काराच्या कोणत्याही प्रकरणामध्ये बलात्कार करणारा हा कोणत्यातरी विकृतीने पछाडलेला होता किंवा कसे, असा आढळलेला नाही. त्यामुळे बलात्कार करणारे हे तुमच्या माझ्यासारखे सामान्य पुरुष असतात हे आधी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे असं नक्कीच म्हणता येईल की, कोणताही सामान्य पुरुष विशिष्ट परिस्थितीत बलात्कार करु शकतो, त्यासाठी त्याला विकृत वगैरे होण्याची / असण्याची गरज नाही.

स्त्रियांचे कमी कपडे आणि बलात्काराचा तसा अजिबात संबंध नाही. स्त्रियांना कमी कपड्यात बघितल्याने येणारी लैंगिक उत्तेजना व्यक्तिपरत्वे बदलते. म्हणजे आपल्या आईला किंवा बहिणीला कमी कपड्यात बघितलं तर लैंगिक उत्तेजना येते का? असा प्रश्न विचारायला हवा. इतर स्त्रियांना बघितल्यावरच का येते मग. पण समजा कोणत्याही स्त्रीला कमी कपड्यात बघितल्याने किंवा नग्न बघितल्याने लैंगिक उत्तेजना येत असेल असं गृहीत धरलं तरी, अशी उत्तेजना किती काळ टिकते? म्हणजे सनी लिओनीला बघितलं आणि तुमच्यात उत्तेजना आली तर लगेच तुम्ही बलात्कार करुन ती शमवता का? तर नाही. कमी कपड्यात स्त्रीला बघून आलेली लैंगिक उत्तेजना काही काळातच काहीही न करता अगदी सामान्यपणे विरते, मग बलात्कारात करण्यासाठी आलेली उत्तेजना कोणती असते असा प्रश्न शिल्लक राहतो. लक्षात घ्यायला हवं की,  मुळातच लैंगिक उत्तेजनेचा आणि कमी कपड्याचा काही संबंध नाही. लैंगिक उत्तेजना ही नैसर्गिक बाब आहे. ती येणारच, त्यासाठी नग्न स्त्रीचे दर्शन घडणे आवश्यक नाहीच. स्त्री पुरुष किंवा समलिंगी संभोगाचे आकर्षण व प्रेरणा ह्या नैसर्गिक असतात. प्रश्न शिल्लक राहतो तो ह्या प्रेरणांचे नियमन आपण कसे करतो याचा. बलात्कार हा या प्रेरणेचा भाग नसतो. बलात्काराची प्रेरणा ही लैंगिक उत्तेजनेचा प्रेरणा नाही. सहमतीच्या लैंगिक संबंधांमध्ये किंवा स्वहस्तमैथुनामध्ये लैंगिक उत्तेजना ही प्रेरणा प्रामुख्याने आधी असते, मात्र बलात्कारामध्ये कुणावर तरी ताबा मिळवणं आधी आवश्यक असल्याने बळाची पर्यायाने सत्ता व नियंत्रणाची प्रेरणा आधी येते. त्यामुळेच बलात्कार हे संवेदनशील परिस्थितीत, तुलनेने आपल्यापेक्षा संवेदनशील व सत्ताहीन व्यक्तींसोबत केले जातात. लहान मुलं मुली आणि त्यानंतर स्त्रिया हे त्या अर्थाने सर्वात संवेदनशील घटक आहेत. शिवाय बळाची प्रेरणा वा एखाद्या व्यक्तीला काबूत करायची प्रेरणा उगाचच निर्माण होत नाही, तिला कोणत्या ना कोणत्या स्वरुपाची पार्श्वभूमी असतेच असते. मग ती भूमी जातिद्वेषाची असू शकते,कधी ती धर्म द्वेषाची असते, कधी ती व्यक्तिद्वेषाची असते तर कधी ती थेट स्त्री द्वेषाची असते. अनोळखी स्त्रियांवर होणाऱ्या बलात्कारांमागे मूलतः हीच स्रीद्वेषाची प्रेरणा असते. निर्भया प्रकरणातील आरोपी म्हणतो की, मुलींना धडा शिकवला हवा, त्या आजकाल जास्त शेफारल्या आहेत, संस्कृती विसरल्या आहेत, बॉय फ्रेंडला घेऊन फिरता आहेत वगैरे वगैरे. व्यक्तिगत कसलंही शत्रुत्व नसलेल्या स्त्रीवर हा स्रीद्वेषी विचार बलात्काराची प्रेरणा असते हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे बलात्कार हे लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी होतात हा मुद्दाही वरील विश्लेषणात निकाली निघतो. मूळ प्रेरणा सत्ता प्रस्थापित करण्याची, काबूत ठेवण्याची म्हणजे नियंत्रणाची, जात-जात-धर्माला धडा शिकविण्याची वा बदला घेण्याची असते, व त्यासाठी बलात्कार हे साधन ठरतं, साध्य नाही.

बलात्कारात अजून एक महत्वाचा मुद्दा असतो तो स्त्रीच्या वस्तुकरणाचा. बलात्काराचा आणि कपड्यांचा संबंध नाही हे खरेच पण स्त्रियांच्या वस्तुकरणाचा आणि कपड्यांचा काही संबंध आहे का? हे तपासायला हवे. वेगवेगळ्या जाहिरातींमधून वा चित्रपट माध्यमातून कमी कपड्यात दाखविल्या जाणाऱ्या स्त्रिया त्यांच्यासोबत काहीतरी मेसेज देत दाखविल्या जातात. म्हणजे त्यांच्या कमी कपड्याचा संबंध नग्नतेशी अजिबात नसतो. त्या काहीतरी विकत असतात, आणि तुम्हाला खरेदीसाठी प्रलोभन देत असतात. हे प्रलोभन अर्थातच तिच्या देहाच्या ‘उपभोगमूल्याशी’ जोडलेलं असतं. नग्नतेला जोडलेलं उपभोगमूल्य स्त्रीदेहाला वस्तुकरणाकडे नि पर्यायाने ‘उपभोग घेण्या योग्य’ या मानसिकतेकडे घेऊन जातं. नग्नतेला अजिबात विरोध नाही, कारण ती अजिबात हानिकारक वा उत्प्रेरक नाही. ती सुंदरच आहे, पण तिला बाजारकेंद्री उपभोगमूल्य प्राप्त होताच ती उपभोगाची वस्तू बनते हे लक्षात घ्यायला हवं. आणि अशा वस्तुकरणाला त्यामुळेच विरोध व्हायला हवा.

– एकनाथ ढोकळे.

लेख साभार – अॅड एकनाथ ढोकळे यांच्या FB वाॅल वरून

चित्र साभार – https://www.dailyo.in/politics/70th-independence-day-womens-rights-jyoti-singh-marital-rape-dalit-feminism/story/1/18979.html

3 Comments
 1. Shankar says

  खूपच महत्वपूर्ण मांडणी.

  1. I सोच says

   Thank you…

 2. Pravin Kale says

  तथाकथित समाजरक्षकांच्या मते जर खरोखरच बलात्कार स्त्रियांनी कमी कपडे घातल्यामुळे होत असतील तर, आजपर्यंत एक दोन वर्ष्यांच्या मुलीपासुन ते अगदी सत्तर वर्षांच्या महिलांवरही बलात्कार झाले आहेत. मग याला काय म्हणता येईल???

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.