लेखांक १: पोर्नोग्राफीवरील संशोधन करताना…

2,662

‘पोर्नोग्राफी’ हा शब्द जरी ऐकला तरी आपोआपच् अनेकांच्या भुवया उंचवतात. बहुतेक जणांना पोर्नोग्राफीविषयी बर्याच गोष्टी माहिती असतात पण जणू काही पहिल्यांदाच ऐकलंय असे एक्स्प्रेशन तोंडावर दाखवतात. या सर्व गोष्टींचा अनुभव मला एम. एस. डब्ल्यू (मास्टर ऑफ सोशल वर्क) करत असताना  आला. कारण मी संशोधन करण्यासाठी पोर्नोग्राफी हा विषय निवडला होता. या विषयाबद्ल जेव्हा मी माझ्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा केली तेव्हा त्यांच्याही तोंडावर असेच काहीसे विचित्र हावभाव होते, त्यांच्यासाठी जणू काही हे सारं नवीनच होतं. मग काय त्यांनी मला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. जसे की, हा विषय मी का निवडला? आता मला उत्तरदाते कसे मिळतील? मी एक मुलगी आहे मग मला पुरुष उत्तरदाते मिळतील का?  आणि बहुतेकवेळा मुली पण पोर्नोग्राफी पाहतात पण त्या माझ्याशी बोलतील का? असे बरेच प्रश्न विचारले आणि मला मात्र उत्तर देता देता नाकीनऊ आणले.

कॉलेजमध्ये असताना अनेकदा मुलं कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या कट्ट्यावर बसलेली असतं. त्यावेळी  समोरून जर एखादी मुलगी आली की, तिचे बारकाईने निरीक्षण व्हायचं. मग कुणाला कडक, तर कोणी झकास, कोणी माल तर कोणी छमक छल्लो, तर कोणी आयटम अशा एक ना अनेक विचित्र कमेंट्स एकमेकांमध्ये पास होत असतं. मला असं वाटतं की, हा सर्व पोर्नोग्राफीमुळे बदलणारा दृष्टीकोन आहे. तसेच मला माझ्या अनेक जवळच्या मित्रांनी सांगितलेलं की, ते पोर्न पाहतात कारण त्यांना ते खूप आवडतं. आणि त्यातून आनंदही मिळतो. याव्यतिरिक्त सेक्स कसा करायचा हेही ज्ञानही मिळतं. मग हे ज्ञान नक्की आहे तरी काय?  या ज्ञानाचे काय परिणाम होतात? नेमके काय कारण असेल पोर्नोग्राफी पाहण्याचे अणि त्याचे काय परिणाम होत असतील? अशाप्रकारचे विचार माझ्या मनात निर्माण व्हायचे. मी एकदा न्युजपेपर वाचत असताना एक पोर्नोग्राफीवरचा लेख वाचला. त्यात असं लिहिलेलं की आता भारतात पोर्न बघण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. मग या सगळ्यांवरुनच मला असं वाटलं की, पोर्नोग्राफी हा विषय संशोधनासाठी निवडावा.  हे एक कारण आणि दुसरं महत्वाचं कारण माझ्या आयुष्याशी निगडीत होतं. मी आज इथे लेखाच्या माध्यमातून ते कारण सांगत आहे. माझा एक मित्र आणि मी आम्ही दोघे नात्यात होतो आणि तो मला सतत शारीरिक संबंधाबाबत विचारायचा. आमच्यात गप्पा, बाहेर भेटणं, काळजीने काही विचारणं हे कधीच व्हायचं नाही. फक्त तो सतत मला सेक्सची मागणी करायचा आणि मला सतत पोर्न क्लिप्स पाठवत असायचा. क्लिपमध्ये आहे तसंच करायला हवं असा नेहमी त्याचा आग्रह असायचा. शेवटी काय हे नातं टिकणं अवघडच होतं. या सर्व गोष्टींमुळे मी त्या नात्यातून लवकरच बाहेर पडले. हे माझ्यासाठी नक्कीच सोप्प नव्हतं. मला त्याचा प्रचंड त्रास झाला आणि मग मी एका समुपदेशकाची मदत घ्यायला सुरवात केली. अजूनही मदत घेत घेत मी ह्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.  या सर्व गोष्टींचा विचार केला असता मला असं जाणवलं की, त्याच्यासारख्या कितीतरी व्यक्ती असतील की जे सेक्सचं यांत्रिकीकरण करत आहेत. पोर्नोग्राफीमधून सेक्स म्हणजे नेमकं काय असायला हवं हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण  फक्त लिंग योनीत घालणं इतकाच सेक्सचा अर्थ आहे का?  किंवा पोर्नोग्राफी मुलीकडे कशाप्रकारे उपभोगाच्या दृष्टीकोनातून पाहायला लावते? तसेच का त्या मुला-मुलींना हे करावंसं वाटतं?  या सर्व मनातील प्रश्नांमधून मी हा रिसर्च करायचे ठरवले.

 

थोडक्यात काय तर आजकाल पोर्नोग्राफी पाहण्याचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारत हा पोर्नोग्राफी पाहण्यात अग्रेसर असून जगात पाचव्या क्रमांकावर आहे. आज १२५ करोड लोक पोर्नोग्राफी पाहतात. ह्या आकड्यांवरून निश्चितच कळते की,  तरुण मुला-मुलींची पोर्नोग्राफी पाहण्याची संख्या वाढत चालली आहे आणि त्याचा परिणाम समाजातल्या प्रत्येक घटकांवर होत आहे असं वाटतं. मुख्यत्वे, स्त्रियांचे दुयमत्व अधोरेखित होत आहे. म्हणूनच मला पोर्नोग्राफी पाहण्यामागचा दृष्टीकोन काय असेल, त्याचे होणारे परिणाम काय असतील? हे शोधून काढणं महत्वाचं वाटलं. पॉर्न चांगलं की वाईट, पॉर्नग्राफीची काळी बाजू, त्याचे होणारे सांस्कृतिक-सामाजिक परिणाम तसेच त्यातल्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, पोर्नोग्राफीच्या बाजाराबद्द्ल असणारा तरुणांचा दृष्टीकोन या सर्व विषयांवर संशोधनात मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर लैंगिकता शिक्षणाचे महत्व आणि उपयोग याचीही मांडणी केली आहे. एकंदरीत तरुण मुली-मुले जे पोर्नोग्राफी पाहत असतात तर ते पाहण्यामागील कारणे तसेच याबाबत असणारी तथ्य या संशोधनातून कळतील. तसेच तरुण मुलंमुली स्वतः व्यक्त होतील. पोर्नोग्राफीबद्दल जी मत दिली जातात, बोललं जातं ते  मला या संशोधनाच्या माध्यमातून पडताळून पाहता येईल. जर कोणी पुढे जाऊन याबाबत संशोधन करणार असेल तर त्या व्यक्तीला या अहवालाचा नक्की उपयोग होईल.

मी माझ्या रिसर्चमध्ये स्नोबॉल या तंत्राचा वापर केला असून त्याचा अर्थ असा आहे की, ज्यांना मी ओळखते किंवा जे माझे मित्र-मैत्रिणी आहेत ते मी उत्तरदाते म्हणून निवडू शकते. यामध्ये मला असे वाटते की, ज्यांना मी ओळखते अशा व्यक्तींकडून जर प्रश्नावली भरून घेतली तर उत्तरे ही पुर्वग्रह दुशित असू शकतील. माझ्या संशोधनाच्या प्रश्नावलीची प्रत मी या लेखाच्या शेवटी जोडत आहे. त्यामध्ये एकूण ६० प्रश्न समाविष्ट आहेत. उत्तरदाते स्वतः प्रश्नावली भरत असताना मला काही अनुभव ते मला इथे शेयर करावं असं वाटलं, यामध्ये काही लोक माझ्याकडे खूप कुतूहलानंपाहत असतं की ही एक मुलगी असून याविषयावर रिसर्च कसा काय करू शकते? तर काही जण माझं कौतुकही करत असतं. तर काही जण प्रश्नावली न पाहताच् घाबरून निघून जातं. काही मुलींनी मात्र आत्मविश्वासाने माझ्यासमोर संपूर्ण प्रश्नावली भरली. काही मुलं मात्र मुद्दाम खोचक प्रश्न ही विचारत तर काही जण प्रश्न न वाचता सगळीकडे नाही असे लिहून मोकळे होत असतं. या सर्व गोष्टींमागे मला असं वाटलं की एकूणच लैंगिकता आणि लैंगिक संबंधाबाबत आपल्या समाजात असलेली गुप्तता आणि नकारात्मकता याचा विचार करता याविषयी समाजात जनजागृती करणे आणि त्यातही तरुण मुला-मुलींनी मनमोकळेपणाने संवाद करणं गरजेचं आहे. ज्या समाजात हेच मानल गेलं की सेक्स ही केवळ पुरुषांची मक्तेदारी आहे.  त्याठिकाणी विचित्र प्रतिक्रिया येणं अगदी स्वाभाविक आहे. मला साधारण ३ महिन्यानंतर वेगवेगळ्या कॉलेज अणि क्लासेसमधून मला ३० विद्यार्थी आणि ३० विद्यार्थीनी मिळाल्या. त्यांच्याकडून प्रश्नावली भरुन घेत मी माझा पुढील रिसर्च पूर्ण केला. त्यातील काही महत्चाच्या प्रश्नांची मांडणी पुढील लेखांमधून मी करणार आहे. प्रश्नावली पाहण्यासाठी लिंकवर नक्की क्लिक करा.

प्रश्नावली लिंक : https://docs.google.com/document/d/1W4bRmttzzc86gpdxFBEg7KCKbJ5i-3o8QrhXF971MfY/edit

Comments are closed.