लेखांक २ : पोर्नोग्राफीवरील संशोधन करताना…

रुचा वसुमती सतिश

0 2,063

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे हा अभ्यास करण्यामागचा माझा मुख्य उद्देश पोर्नोग्राफी पाहण्यामागचा लोकांचा दृष्टीकोन काय असतो, त्याचे होणारे परिणाम काय असतात हे तपासणे हा होता. या अभ्यासात पोर्नोग्राफी चांगली की वाईट, त्याचे होणारे सांस्कृतिक-सामाजिक परिणाम, त्यातल्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, पोर्नोग्राफीच्या बाजाराबद्द्ल असणारा तरुणांचा दृष्टीकोन यावरही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न मी केला. शिवाय तरुण मुलं नेमकं कोणत्या कारणांनी पोर्नोग्राफी पाहतात, त्याबाबतची तथ्यं काय आहेत, पोर्नोग्राफीबद्दल दिली जाणारी मतं काय आहेत आणि ती तशी का असतात याचाही मला या माध्यमातून अभ्यास करता आला. या अभ्यासात मला जवळपास ६० तरुण-तरुणींची मतं घेता आली, त्यांच्याशी बोलता आलं. त्यावरून पुढील निष्कर्ष समोर आले.

समोर आलेले निष्कर्ष

अभ्यासातून एकंदरीतच असं दिसून आलं की, पोर्नोग्राफिक साहित्य मुलांच्या खूप लहान वयातच हातात पडतं. त्यातही मुलग्यांचं प्रमाण मुलींपेक्षा जास्त असतं. याच्या कारणांचा विचार केला असता स्वस्त दरातलं इंटरनेट आणि मोबाईलच्या सहज उपलब्धतेमुळे हे होत आहे हे दिसून आलं. पोर्नोग्राफी पाहण्याची सवय ही मित्र-मैत्रिणींच्या माध्यमातून होते आणि ती पुढे वाढतच जाते. लहान वयात हातात पोर्नोग्राफीक साहित्य पडल्याने, त्याचे अनेक परिणाम दिसून येतात. पोर्न व्हिडिओ नाही पहिले तर अस्वस्थता येणे, लैंगिक ताण वाढणे, आपल्या जोडीदारानेही पोर्न व्हिडिओ पाहायला पाहिजे असा आग्रह धरला जाणे, असे व अशाप्रकारचे अनेक परिणाम होतात. यातील लैंगिक क्रिया पाहून तरुणांना न्यूनगंडही निर्माण होतो.

पोर्नोग्राफी आणि काही अनुत्तरीत प्रश्न

पोर्नोग्राफी खरंतर हा एक मोठा उद्योगच बनला आहे ज्यात प्रचंड नफा तयार होतो. अधिक नफा मिळवण्यासाठी या उद्योगात रोज नवनवीन माल तयार करावा लागतो आणि बाजारात आणावा लागतो. पोर्न चे अनेक प्रकार आहेत ज्यात जबरदस्ती व हिंसाही मोठ्या प्रमाणावर असते. मग तरीही असे पोर्न लोकांना का आवडते? खरंतर आपल्या पितृसत्ताक समाजात लैंगिकतेवर मोकळेपणे बोलले जात नाही. सतत लैंगिक भावना दाबून ठेवल्या जातात व त्या तशाच ठेवायच्या असतात हेही शिकवले जाते. वयात येताना मुलांमध्ये अनेक बदल होत असतात, मनात अनेक प्रश्नांचे कुतूहल असते. अशा वेळी जर ते प्रश्न अनुत्तरीत राहिले तर त्याबद्दलचे हे कुतूहल अधिकच वाढते. अशातच मित्र मदतीला येतात अन पोर्न क्लिप्स हातात पडतात. त्यातून लैंगिक भावनेचा निचरा होतो, अन मग असे साहित्य आणखी पाहावेसे वाटते.

मुलांना वाटते की, पोर्नोग्राफी लैंगिक शिक्षण देते, लैंगिक संबंधाचे ज्ञान देते. मुळात पोर्नोग्राफी  असे काहीच करत नाही. स्त्रियांना त्रास होत आहे आणि त्यातून त्यांना आनंद मिळत आहे असं दाखवणं, जबरदस्ती करून सुख मिळते अशी लैंगिक सुखाची परिभाषा अधोरेखित करणं तसेच लैंगिक संबंध हे यांत्रिकरीत्या केले जावेत असं ज्ञान मिळत असल्यास ते कितपत योग्य आहे? तसेच पोर्नोग्राफी इंड्स्ट्रीच्या वास्तवापासून तरुण-तरुणी कोसो दूर आहेत. त्यांना तिथं काम करणा-या कामगारांचे शोषण व त्यांच्यावर होणारे शारीरिक व मानसिक परिणाम याबाबत खूपच कमी माहिती आहे. थोड्क्यात काय तर लैंगिक संबंधाचे ‘साचे’ करण्याचे काम पोर्नोग्राफी करते.

जरा हे ही विचारात घेऊयात का?

पोर्नोग्राफी हे लैंगिक शिक्षणाचे माध्यम असू शकत नाही. मुलांना ते तसे वाटत असेल तर तेही चुकीचे आहे. यावर त्यांच्याशी योग्य वेळीच संवाद साधला जाणं, शिवाय त्यांना योग्य ते लैंगिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी गरज आहे, लैंगिक विषयांवर चुप्पी तोडून खुल्या मनाने त्याविषयी बोलण्याची. तरुण मुला-मुलींना पोर्न पाहण्यापासून दूर ठेवण्यापेक्षा पालकांनी त्यांच्याशी संवाद साधून पोर्नोग्राफीमधील काल्पनिक जगाची जाणीव करून देण्याची जास्त गरज आहे.

काय करावं लागेल?

कांतीला उजळपणा देणा-या मलमांच्या जाहिराती आणि व्यायाम न करता वजन कमी करणा-या औषधांच्या जाहिराती जशी खोटी आश्वासनं देत असतात त्यातलाच हा प्रकार आहे, हे त्यांच्या मनावर ठसवायला हवं. इंटरनेटवर दिसणा-या पोर्नस्टार्सचं सौष्ठव हे ब-याचदा प्लास्टिक सर्जरीची किमया असते. त्यांची बराच वेळ चालणारी कामक्रीडा ही कॅमे-याची बनवाबनवी असते, हे त्यांना पटवून द्यायला हवं. नाहीतर पोर्नच्या इतर संभाव्य दुष्परिणामांबरोबरच त्यांच्या मनात स्वत:च्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण होण्याचीही शक्यता आहे. तसेच पोर्नोग्राफी शिवाय दुसरं काहीच सुचत नसल्यास मानसोपचार तज्ञाकडे नेऊ शकतो. अशा व्यक्तीला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करायला हवी. त्यांचे इतर छंद असतात ते जोपासण्याठी प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच जर कोणी पोर्नोग्राफी बद्दल बोलत असेल तर त्याचा बाऊ न करता त्याच्याशी चर्चा करायला हवी. ती चर्चा वैयक्तिक पातळीवर असू शकते किंवा मग महाविद्यालयीन पातळीवर एकत्र असू शकते. लहानपणापासूनच स्त्री-पुरुष समानतेची मूल्य रुजवायला हवीत. शाळांमध्ये शिक्षकांच्या लैंगिकतेवर कार्यशाळा घ्यायला हव्यात आणि महत्वाचे असे की जी काही बाजारू व्यवस्था आहे त्याच्या विरोधात आपण संघटीत होऊन लढा देण्याचे काम करायला हवे. पुरुषांनी संस्कृतिरक्षकांची आणि व्यभिचार-विरोधकांची भूमिका पूर्णत: नाकारली पाहिजे. स्त्रियांनी ‘पोर्न ते घाण’ या सर्वंकष नकारात्मक मानसिकतेतून जाणीवपूर्वक बाहेर पडले पाहिजे. लैंगिक व्यवहाराबद्दल मौन आणि पापभावना यांचा आपल्या मनावर एवढा प्रभाव आहे की या पूर्वग्रहांतून बाहेर पडणे सोपे नाही; त्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर विशेष प्रयत्न करावे लागतील. पोर्न पाहणे आणि त्यांच्यावर चर्चा करणे हा या कार्यक्रमाचा एक आवश्यक भाग असला पाहिजे. त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, एक नवा विचार मांडण्याची गरज आहे.

संदर्भ :  http://aisiakshare.com/pop_index

मागील लेख :

लेखांक १: पोर्नोग्राफीवरील संशोधन करताना…

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.