योग्य संवादाची गरज

सुप्रभाताई सावंत

1,357

 

तथापिने पिंपरी – चिंचवड भागामध्ये पालक, शिक्षकांसोबत शाळांच्या माध्यमातून संवाद सुरु केला आहे. ‘साई संस्कार’ शाळेतील मा. सुप्रभाताई सावंत यांच्याशी त्यांना या क्षेत्रातील असलेला कामाचा प्रदीर्घ अनुभव तसेच मतिमंद मुलांच्या गरजा, त्यांचे लैंगिक प्रश्न, आर्थिक पुनर्वसन या अनुषंगाने केलेली चर्चा आपणा समोर मांडत आहोत.

 सुप्रभाताई या क्षेत्रामध्ये येणं हा तसा योगायोगच होता असं त्या म्हणाल्या. पण गेली कित्येक वर्षे शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि आता सेक्रेटरी अशी जबाबदारी निभावताना, या मुलांसोबत केलेल्या आणि करत असलेल्या कामाचा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. कामयानी या विशेष मुलांच्या शाळेमध्ये त्यांना ४० वर्षे कामाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला आहे. सध्या ‘साई संस्था’ या शाळेमध्ये त्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.

१. या क्षेत्रातील प्रदीर्घ कामाचा अनुभव पाहता मतिमंद मुलांच्या कोणत्या गरजा तुम्हाला महत्वाच्या वाटतात?

उत्तर- खरंतर विशेष मुलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं आणि त्यांचा स्वीकार केला तर त्यांनाही सहजतेने आयुष्य जगण्यास मदत होईल. ही मुलं स्वतंत्र होऊ शकतात आणि स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात. त्यांच्यासोबत योग्य पद्धतीने बोलणं आवश्यक आहे. जसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गरजा आहेत तशाच या मुलांच्याही आहेत. यामध्ये लैंगिक गरजेचा कुठेही विचार केला जात नाही. परंतू याविषयी मुलांशी संवाद साधन आणि त्यांना समजून घेणं गरजेचं आहे.

२. वयात येताना मतिमंद मुलांमध्ये शारीरिक, मानसिक बदल होतात/ त्यांना लैंगिक भावना जाणवू लागतात याबद्दल तुमचे काही अनुभव आहेत का?

उत्तर- लैंगिक भावना या नैसर्गिक आणि महत्वाच्या आहेत. मुला-मुलींमध्ये आकर्षण निर्माण होतं. पण त्यामुळे या वयात त्यांना वेगळ करणं चुकीचं आहे. उलट त्यांना एकत्र घेऊन खेळ, नृत्य, खेळ, गाणी, ट्रीप असे उपक्रम केले पाहिजेत. त्यांना वेगळ करून आपणच बऱ्याचदा समस्या निर्माण करतो असे मला वाटते. जर एखादया मुलाने त्याला/ तिला एखादी व्यक्ती आवडते म्हणून गुलाबाचे फुल दिलं किंवा आय लव्ह यु म्हंटलं तर त्यामध्ये आपण अवडंबन करता कामा नये. अशा काही कृतींमधून ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. यावेळी चुकीचे विचार मनात न आणता मुलांशी योग्य पद्धतीने बोलून समजून सांगितले तर इतर प्रश्न निर्माण होत नाहीत. म्हणून मुलांसोबत लैंगिकतेवरील संवाद महत्वाचा आहे.

३. स्वतःच्या शरीराबद्दल आणि लैंगिकतेसंदर्भातील शास्त्रीय माहिती आणि सकारात्मक दृष्टीकोन या मुलांपर्यंत पोहचण्यासाठी काय प्रयत्न व्हायला पाहिजेत असे तुम्हाला वाटते?

उत्तर- हा संवेदनशील आणि महत्वाचा मुद्दा आहे. याबाबत समाजाने अधिक प्रगल्भ होणं आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मुलांच्या कलाने, त्यांना समजेल अशा प्रकारे मुलांशी संवाद साधावा. यामध्ये विशेषतः शिक्षकांची जबाबदारी फार महत्वाची असते. पालकांमध्ये सुद्धा याविषयी जागृती करणे फार गरजेचे वाटते.

४. या मुलांच्या पुनर्वसनाची काय स्थिती आहे व त्या दृष्टीने कोणते बदल होणे अपेक्षित आहेत असे तुम्हाला वाटते?

विशेष मुलांची जबाबदारी ही फक्त कुटुंबाचीच नाही तर पूर्ण समाजाची सुद्धा आहे. परंतू समाजाकडून जो प्रतिसाद मिळायला पाहिजे तो मिळताना दिसत नाही. सामान्य मुलाला देखील जगताना किती फाईट करावी लागते तर विशेष मुलांचा विचार करता त्यांचा संघर्ष कित्येक पटीने जास्त आहे याची जाणीव होते. ही मुलं प्रत्येक गोष्टीसाठी बऱ्यापैकी इतरांवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्या प्रती सहसा विश्वासचं दाखवला जात नाही. उदा. कंपनीसाठी किंवा मशिनवरील काम असेल तर पालक मुलांना काही धोका पोहचेल म्हणून घाबरतात. परंतू यातील धोके मुलांना व्यवस्थितपणे सांगितले आणि काही दिवस त्यांच्यासोबत काम केले तर ही मुलं छान पद्धतीने काम करू शकतात. समाजातून सुद्धा त्यांना काम देण्याची मानसिकताच नसते. शासनाने देखील या मुलांच्या दृष्टीकोनातून कोणताही ट्रेनिंग पॅटर्न विकसित केलेला नाही. विशेष मुलांना सामावून घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सामाजिक आणि शासकीय पातळीवर अधिक प्रयत्न व्हायला पाहिजेत.

५. पालकांना काय संदेश दयाल?

उत्तर- विशेष मुलांच्या पालकांच्या जबाबदाऱ्या या अधिकच असतात तसेच त्यांच्या पातळीवर ते समस्यांचा सामना करतच असतात. परंतू आपल्या विशेष पाल्याच्या बाबत कोणत्याही गोष्टीसाठी पहिले पाऊल हे पालकांनीच टाकणे आवश्यक आहे. कारण शाळा किंवा संस्थांना काही पातळीवर मर्यादा आहेत. यासाठी पालकांनी संघटीत होणं, एकत्र येऊन येणाऱ्या समस्यांवर मार्ग काढणं आणि स्वतःला येणारा ताण, मनावरील ओझं कमी करण्यासाठी इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं आहे.

(शब्दांकन: सुषमा खराडे)

Comments are closed.