‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे जातीव्यवस्थेच्या अंतास मदत होईल का?- प्राजक्ता धुमाळ

943

वेगवेगळ्या अर्थाने ‘सैराट’च्या यशाची चर्चा अजूनही सुरु आहे. ‘सैराट’ने सर्वांसमोर आणलेलं जातीव्यवस्थेचं भयानक वास्तव विचारात घेता ‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे जातीव्यवस्थेच्या अंतास मदत होईल का? हा प्रश्न वेबसाईटच्या वाचकांसाठी विचारण्यात आला होता. एक महिन्यात एकूण ४९८ व्यक्तींनी त्यांची मतं नोंदवली आहेत. ‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे जातीव्यवस्थेच्या अंतास मदत होईल, असं मत ५६% व्यक्तींनी नोंदवलं आहे. तर ‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे जातीव्यवस्थेचा अंत होण्यास मदत होणार नाही, असं मत ३५% व्यक्तींनी नोंदवलं आहे. उर्वरित व्यक्तींचं या दोन्ही बाबतीत ठाम मत नाही.

‘सैराट’सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून जातिव्यवस्थेचा अंत होण्यास मदत होऊ शकते, असं काहींना   वाटू शकतं तर चित्रपटांच्या माध्यमातून जातिव्यवस्थेचा अंत होण्यास मदत होणार नाही असं काहींना वाटू शकतं. मुळात जातिव्यवस्थेचा अंत व्हावा, असं वाटणं महत्वाचं आहे. काही वेळेला कोणत्याही चित्रपटाकडे तितकसं गंभीरपणे न पाहण्याची मानसिकताही समाजात दिसून येते. चित्रपटाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहायचं हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. कुणाला असं वाटेल की सैराट म्हणजे उच्चजातीय समाजावर केलेली टीका आहे, तर कुणाला असं वाटेल की, जातीसाठी काहीही करायला तयार असलं पाहिजे, पण कुणीतरी असाही विचार करेल की, इतकं वाईट टोक गाठण्यापेक्षा जात-पात संपवलेली बरी! सगळेच चित्रपट केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने केलेले नसतात, संवेदनशील विचार मांडणारे, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने नेणारे चित्रपटही असतात. ‘सैराट’ हा त्यापैकीच एक आहे असं वाटतं.

जाती, पोटजाती, धर्म, पंथ, प्रांत अशा माणसाला एका साच्यात अडकवणाऱ्या या गोष्टींमुळे माणूस समानतेच्या दिशेने नाही तर भेदभावाच्या दिशेने वाटचाल करत राहतो. जातीमुळे, धर्मामुळे निर्माण केलेल्या मान-पानाच्या, इज्जतीच्या संकल्पना या अगदी उथळ आहेत, पण त्यामुळे मारहाण, खून, दंगली अशा टोकाच्या हिंसक प्रकारांना समाज वर्षानुवर्षांपासून बळी पडत आला आहे. अर्थातच भेदभाव निर्माण करणाऱ्या, वाढवणाऱ्या या गोष्टींमुळे माणूस स्वतःला, कुटुंबाला आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला कळत-नकळतपणे अधोगतीकडे नेत असतो. म्हणजेच समानता हा आपल्याबरोबर इतरांनाही उन्नत करण्याचा एक मार्ग आहे, हे लक्षात घेऊन समानतावादी मूल्ये कृतीत उतरवण्याची गरज निर्माण झालेली आहे. सामान्यपणे म्हणायचं झालं तर, रोटी व्यवहार बऱ्यापैकी मोडीत निघाला आहे, बेटी व्यवहारावर असलेला मनाचा, इज्जतीचा निर्बंधही दूर करता येईल. ‘सैराट’मुळे आपल्या घरातल्या, आजूबाजूला घडलेल्या किंवा कधी ना कधी तरी आपल्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या वास्तवाचा वेध घेतला आहे, या निमित्ताने लोकांनी कुटुंबाशी, स्वतःच्या मुला-मुलींशी, अगदीच कुठेही नसेल तर स्वतःच्या मनाशी तरी चर्चा केली असेलच. जातीची बिरूदं वर्षानुवर्षे चिकटवून घेऊन आपण काय गमावलं, काय कमावलं याचा हिशोब केला असला तर यात गमावलेल्या गोष्टींचीच यादी  लांबलचक झाली असेल. आपण हे समजून घेऊया की, माणसा-माणसात फूट पडणाऱ्या या गोष्टी माणसानेच निर्माण केल्या आहेत आणि माणूसच या गोष्टी नष्ट करू शकतो. सुरुवात स्वतःपासून करूया…      

 

Comments are closed.