समाजस्वास्थ्य: र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारं नाटक

0 1,332

जुनाट रूढी, चालीरिती, परंपरांचं दुकान भावनेच्या जोरावर चालतं. तिथं बुद्धीचा वापर करणाऱ्यांना प्रवेश नाही. अशाच लोकांची सत्ता असेल तर ‘ज्याची सत्ता त्याचा न्याय’ हा नियम असतो.
र. धों. कर्वे

या (वारंवार दुखावल्या जाणाऱ्या लोकांच्या) भावनेच्या अतिरेकानं मिथकांचा, पुराणकथांचा अभ्यासच करणं अशक्य होईल. मग एक दिवस या पुराणातील पुरुषांना हे लोक ऐतिहासिक पुरूष मानू लागतील. पुराणातील कल्पित गोष्टींना आपला इतिहास समजू लागतील. हे राजकारणच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नुकतंच अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ हे संततीनियमनाबद्दल बोलणाऱ्या र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारं नाटक प्रदर्शित झालं. या नाटकाविषयी जयंत पवार लिखित ‘समाजस्वास्थ्य: विवेकवादाच्या लढ्यातलं हत्यार’ या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ११ मार्च २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या लेखातील काही भाग वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

‘समाजस्वास्थ्य’ या नाटकात लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध, व्यभिचार या विषयांवर लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, संततिनियमनाचा प्रसार स्वतःच्या घरापासून करणाऱ्या, त्याविषयी विविध प्रयोग करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लिलतेचा आरोप ठेवून गुदरलेल्या तीन खटल्यांची प्रकरणं दिसतात. त्यातले दोन खटले ते हरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे मातब्बर वकिल दिमतीला असूनही हरतात. तिसऱ्या खटल्यातून तांत्रिक मुद्द्यावर कसेबसे सुटतात. आणि तरीही त्यांच्यावर चौथा खटला गुदरला जातोच. पण सुदैवाने वा दुर्दैवाने रघुनाथराव तेव्हा हयात नसतात. इतकं मोठं काम करणारा माणूस निधन पावला हे सरकारच्या गावीही नसतं. संस्कृतीरक्षक मात्र जिवंतच असतात आणि राहतात.

अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ हे नाटक १९३० ते ४० सालातलं असलं तरी ते आजचं वाटतं. पण आजच्या संदर्भात त्याचा बोध काय घ्यायचा? कर्मठ सनातन्यांची पिलावळ सर्वकाळात वळवळत राहील हा, की रधोंप्रमाणे सत्य धरून ठेवायचं हा? एक भगभगीत वास्तव आहे आणि दुसरं विशफुल थिंकिंग. दोन्ही गोष्टी नाटक बघताना समांतरपणे मनात तरंगत राहतात आणि कुठल्याही भाष्याविना पडणाऱ्या पडद्यानंतर मनात एक ठिणगी पेटवून जातात.

र. धों. कर्वे हा अट्टल सुधारक, सुधारकी परंपरेच्या महाराष्ट्रातही एकटा पडला, तोट्यात चालणारं एक मासिक सत्तावीस वर्षं एकहाती चालवून आणि थट्टेचा विषय होऊन काळाच्या पडद्याआड गेला, ही एक दारुण शोकांतिका आहे. त्यांच्या मागे डॉ. आंबेडकर, रियासतकार सरदेसाई, रँग्लर परांजपे, मामा वरेरकर आणि त्यांच्या पत्नी मालतीबाई अशी काही मोजकी माणसं होतीही. पण गांधीजींचं गारुड असण्याच्या काळात त्यांच्या ब्रह्मचर्याच्या कल्पनेला उघडपणे वेडगळ म्हणणारा आणि देवदेवतांच्या लीलांना व्यभिचार मानून व्यभिचार या कल्पनेचंच उघडपणे समर्थन करत सनातनी धर्मवाद्यांना अंगावर घेणारा हा माणूस एका महाप्रवाहाच्या विरोधात उभं राहण्याची एकाकी धडपड करत होता. हा सगळा प्रवास चरित्रनाट्याच्या रूपाने दाखवण्याऐवजी दळवी आणि पेठे यांनी कोर्टरूम ड्रामाचा डिव्हाईस वापरून या झुंजीचा एक आडवा छेद घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली ठेवला आहे.

अर्थात कोर्टरूम ड्रामा असला तरी कोर्टातल्या नाट्यमय चकमकी इथे नाहीत, धक्कादायक कलाटण्या नाहीत, फारशा उलट तपासण्या नाहीत आणि वकिलांचे वितंडवादही नाहीत. पण हे सारं नसूनही नाटकात नाट्यमयता मात्र आहे. ही नाट्यमयता व्यवस्था विरुद्ध एक माणूस या नाट्यात भरलेली आहे. व्यवस्थेच्या बाजूने पुराणमतवादी आहेत, परंपरावादी समाज आहे, उच्चजातीय हितसंबंधी आहेत आणि न्यायालय अर्थात सरकारही आहे. आणि आरोपीच्या पिंजऱ्यातल्या माणसाच्या बाजूने तर्कशुद्ध मांडणी आहे, धर्मचिकित्सा आहे, विवेकवाद आहे, बुद्धिप्रामाण्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्भीडता आहे. छोट्या छोट्या सहा-सात प्रसंगांमध्ये खटला आणि घरातले प्रसंग अशी मांडणी करत अजित दळवींनी समर प्रसंगांना टाळत विधानात्मक मांडणीवर भर देऊन संहितेची संपूर्ण रचना केली आहे. यातले संवादही खटकेबाज नाहीत. एका स्वाभाविक गतीने आणि संयत शैलीत, धीम्या लयीत नाटक पुढे जात राहातं. एक निश्चित परिणाम करत जातं.

नाटकामध्ये रघुनाथराव न्यायाधीशांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात, ‘धर्माचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजे काम. कामवासनेचं आकर्षण माणसाला धर्माच्या आज्ञा मोडण्याचं सामर्थ्य देतं म्हणून धार्मिकांचा काम या गोष्टीवर राग. म्हणून ते सर्वात वाईट पाप.’ अशा नेमक्या दोन-अडीच वाक्यांत लेखक प्रतिपक्षाचं स्वरूप नेमकं उभं करतो. हे अल्पाक्षरीत्व दळवींनी नाटकभर राखलंय आणि ते रघुनाथरावांच्या व्यक्तिमत्वाला टोकदार करण्यात कामी आलंय.

अतुल पेठेंनी या नाटकाद्वारे एक दिग्दर्शकीय विधान केलं आहे. ते विवेकवादाच्या लढाईतलं एक हत्यार म्हणून या नाटकाला परजतात हे तर लक्षात येतंच, पण आपलं विधान आक्र्रस्ताळेपणा टाळून शांतपणे आणि ठामपणे करण्यातच त्याची परिणामकारकता दडली आहे, हे जाणतात हे नाटकाचा एकूण सूर पाहून लक्षात येतं. पात्रांच्या ज्यादा हालचाली टाळत शब्दांवर एकाग्र होण्याचा त्यांचा निर्णय नाटकाला एक ठामपणा देतो. उदाहरणार्थ, खटल्याला जोडूनच रघुनाथरावांचा विल्सन कॉलेजमध्ये प्रिन्सिपलना सामोरं जाण्याचा सीन येतो, त्यात रघुनाथरावांना आरोपीच्या पिंजऱ्यातून हलवलेलं नाही. तिथे उभे राहूनच ते प्रिन्सिपलना सफाई देतात. जणू ते शिक्षणसंस्थेच्या नजरेतही आरोपीच आहेत. नाटकाचा शेवट आरोपीच्या रिकाम्या पिंजऱ्यावर करून व्यवस्थेवरचं भाष्य भेदक केलं आहे. हा पिंजराही मग प्रतिकात्मक होऊन गेला आहे, जो यापुढेही अबाधित राहणार आहे. प्रयोगाची ध्वन्यता आणि दृश्यात्मकता यातून नाटकाचा एक पोत निश्चित होत जातो आणि तो लक्षणीय आहे.
गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेले रघुनाथराव हा या नाटकाचा कणा आहे. अत्यंत स्वाभाविक गतीने आणि संथ लयीत सरकणाऱ्या या प्रयोगात कुलकर्णींनी नाट्यमय संवाद हाताशी नसतानाही केवळ शब्दोच्चारातून, विरामांतून नाट्यमयता निर्माण केली आहे. रंगमंचावर उच्चारल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाला स्वतःचं एक वजन असतं आणि कलावंताला ते अचूक उमगावं लागतं, हे भान गिरीश कुलकर्णींच्या ठायी जाणवलं. वयाच्या ४९व्या वर्षी कर्वे पहिल्यांदा खटल्याला उभे राहिले, ५८व्या वर्षी ते तिसऱ्यांदा सामोरे गेले. या काळात त्यांचं आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्याही खचत जाणं, निराश होत जाणं कुलकर्णींनी त्यांच्या चालण्यातून, खांद्यातून, गालांच्या पोकळीतून ठसवत नेलं. या भूमिकेद्वारे रंगभूमीवरची एक उत्तम खेळी कुलकर्णी खेळून गेले आहेत. त्यांना राजश्री सावंत-वाड यांची मालतीबाईंच्या भूमिकेत तितकीच तोलामोलाची साथ मिळाली. अर्थात संहितेतून मालतीबाईंचं व्यक्तिमत्व एका मर्यादेपलीकडे खुलत नाही. तीच गोष्ट मामा वरेरकर आणि डॉ. आंबेडकरांचीही. मात्र या भूमिका अनुक्रमे अभय जबडे आणि अजित साबळे यांनी उत्तम केल्या. अहिताग्नी राजवाडे झालेले रणजीत मोहिते आणि शेटे वकिलाच्या भूमिकेतले कृतार्थ शेगांवकरही छाप पाडून गेले.

आपल्या विरोधातले आवाज बंद पाडण्याचा काळ अधिकाधिक गडद होत चालला असताना विवेकवादाच्या बाजूने उठलेला ‘समाजस्वास्थ्या’चा हा संयत, समंजस सूर धीर देणारा आणि लिहिणाऱ्या-बोलणाऱ्यांना बळ देणारा आहे. नाटकाच्या शेवटी दिसणारा आरोपीचा पिंजरा रिकामा नाही, याचीही जाणीव करून देणारा आहे.

 

साभार: जयंत पवार लिखित ‘समाजस्वास्थ्य: विवेकवादाच्या लढ्यातलं हत्यार’ या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ११ मार्च २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या लेखातील काही भाग. मूळ लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/samwad/samajswathya-play-about-ra-dho-karve-and-his-work-of-family-planning/articleshow/57591996.cms

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.