लॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……

3,034

लॉकडाऊन आता शिथिल होत आहे, घराबाहेर पडता येते आहे, इतरांना भेटता येते आहे.  पण कोविड चे संकट अजुनही टळलेले नाही. लॉकडाऊनमुळे  प्रदीर्घ लांबलेल्या भेटी आता घडायला लागल्या आहेत.  ज्यांचे जोडीदार घराबाहेर आहेत त्यांना आता टेंशन आहे की, सध्याच्या काळात लैंगिक संबंध करावेत की नाही? अन  जर आपल्या जोडीदारांसोबत लैंगिक संबंध  करावेत तर काय काळजी घ्यायला हवी? 

आपल्याला हे माहिती आहेच की, कोविड १९ विषाणू हा संक्रमित व्यक्तीने खोकताना तोंडातून आणि नाकातून छोट्या मोठ्या थेंबांच्या वाटे बाहेर पडतो व श्वास घेताना आपल्या शरीरात येतो. संक्रमित व्यक्तीच्या ६ फूट किंवा २ मीटरच्या आत संपर्क आल्यास आपल्याला कोरोनाव्हायरसचा आजार होण्याची शक्यता असू शकते. संसर्गाचे आणखीही काही मार्ग आहेतच.

काही अभ्यासांतर्गत कोविड १९  विषाणू मानवी विष्ठेमध्ये, विर्यामध्येही आढळलेला आहे, पण या मार्गे संसर्ग झालेला आहे याचा अजुन तरी पुरावा मिळालेला नाही. त्यासाठी आणखी संशोधन  होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात लैंगिक संबंध करावेत की नाही हे समजुन घेताना हे आधी लक्षात घेऊयात की, कोविड -१९ हा लैंगिक संबंधातून पसरणारा आजार नाही आहे.  सेक्स करताना किस केल्याने, जास्त जवळ आल्याने  होऊ शकतो.

१. आपल्याला वा आपल्या जोडीदाराला सतत कोरडा खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा कोविड -१९ ची  लक्षणे दिसत असल्यास किस करु नये वा संबंध ठेऊ नयेत.

२. लक्षणे नसतील तर आपल्यासोबत नियमित एकाच घरात राहणा-या जोडीदारासोबत त्याच्या संमतीने संबंध ठेवायला काही हरकत नाही.

३. जोडीदारांपैकी कुणीही वारंवार कामामिमित्त घराबाहेर जावे लागत असल्यास, तसेच घरात म्हातारे लोक, मधुमेह, उच्च रकतदाब, हार्ट पेशंट, दमा, कॅन्सर असणारे हाय रिस्क गटातील लोक असतील तर लैंगिक संबंध टाळावेत.

४. आपण कुटुंब नियोजनाचा विचार करत असल्यास आपल्याकडे गर्भनिरोधकांचा पुरेसा पुरवठा/साठा असल्याची खात्री करा.

आपण ज्याच्यांबरोबर नियमित राहत नाही, अशा एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवत असल्यास कोविड -१९ विषाणूच्या धोक्याची जास्त संभावना आहे. या विषाणूच्या संसर्गाचा किंवा पसरवण्याचा धोका कमी करण्यासाठी काही खबरदारीचे उपाय पाहूयात ….

१. एकापेक्षा जास्त व्यक्तींशी संबंध  टाळा.

२. कुणालाही किस करु नका, थोडक्यात लाळेची देवाण घेवाण टाळा.

३. वीर्य व मुत्राचा संपर्क येईल असे लैंगिक संबंध टाळा, योनी वा गुदमैथुनासाठी निरोध व मुखमैथुनासाठी डेंटल डॅम अवश्य वापरा.

४. शक्य झाल्यास संबंधांच्या वेळेस मास्क वापरा.

५. लैंगिक संबंधांच्या आधी व नंतर साबण-पाण्याने हात व शरीर धुवा, साबण लाऊन आंघोळ करा.

६. जर सेक्स टॉईज वापरणार असाल तर आधी व नंतर साबणाने धुतल्याशिवाय वापरु नका.

७. ज्या जागेवर लैंगिक संबंध करत आहात ती जागा साबणाने किंवा अल्कोहोल वाईपने स्वच्छ करा

लैंगिक सुख मिळवण्याचे इतर मार्ग आहेतच की…

शारीरिक संबंधांशिवाय इतर जोडीदाराचा स्पर्श टाळून लैंगिक सुख मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत, जसे की स्वत: स्वत:चे  केलेले हस्तमैथुन, लैंगिक खेळणी, सेक्सचॅट, फोन किंवा वेबकॅम सेक्स यातुन लैंगिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करा. या  मार्गांंनी  (ऑनलाईन) सुख मिळवताना आपल्या जोडीदाराच्या इच्छेचा सन्मान करा, मनाविरुद्ध काहीही करण्यासाठी दबाव आणू नका.

तेव्हा विनाकारण घराबाहेर पडू नका, नेहमी मास्क वापरा, साबणाने वा सॅनिटायझरने नियमित हात स्वच्छ ठेवा.  बाकी आपण सुज्ञ आहातच.  ही पण वेळ निघुन जाईल, खूप शुभेच्छा !!

माहितीचा संदर्भ दुवा:  https://www.avert.org/coronavirus/covid19-sex

Comments are closed.