लग्नापूर्वीचा प्रणय – भाग ३ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

5,712

मुळात आपल्याकडे ‘सेक्स’ या विषयवार मोकळेपणाने संवाद घडून येण्याची नितांत गरज आहे. या विषयाला नेहमीच एक प्रकारचा ‘taboo(कलंक या अर्थाने)’ लागलेला असतो. या विषयावर बोलणारे ‘संस्कृतीभक्षक, चाबरट, चावट’ हा विचार बदलला पाहिजे. माझ्या सहावी-सातवीतील भाचा-भाचीना ‘मोठी माणसं (वयाने) एकमेकांची ‘तशी’ पप्पी का घेतात, ‘तसे’ का वागतात, बाळ कसं जन्माला येतं? (तेही लग्न झाल्यावरच!)’ असे प्रश्न पडतात, म्हणून लहान मुलं ‘काहीतरीच’ विचारतात, ‘असलं विचारायचं नाही किंवा तुम्हांला मोठं झाल्यावर कळेल,’ असं म्हणून हा विषय दाबल्यामुळे, टाळल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना ‘आपोआप’ उत्तरं मिळणार नाहीत. मग उत्तरं मिळविण्याच्या जिज्ञासेने मुलं चुकीची माहिती मिळविणं किंवा चुकीच्या गोष्टी करणं याची शक्यता नाकारता येत नाही. (मोठया व्यक्तींच्या अशा कृतींचा अर्थ न समजल्यामुळे लहान मुलं-मुली एकमेकांशी या गोष्टींचं अनुकरण करतात, याचं उदाहरण माझ्या पाहण्यात आहे. मोठं झाल्यावर आपण ‘त्या’ गोष्टी नात्यातल्याच कुणाशीतरी केल्या, हे समजल्यावर मनाला छळणारी, अस्वस्थ करून सोडणारी आयुष्यभराची ‘चुटपुट’ मागे लागते, नात्यात दुरावा आणते.) त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्या शंकांचे निराकरण करता आले पाहिजे (हं, मात्र त्यासाठी आपल्या ‘व्यस्त’ दिनक्रमातून पालकांना वेळ काढता आला पाहिजे.), जे थोडे कठीण वाटले तरी अशक्य नाही. आजकाल चुंबनाची किंवा तत्सम दृश्ये आपल्या घरातल्या टीवी संचावर सामान्य झाली आहेत. पण अशी दृश्ये येताच मुलांसमोर अथवा कुटुंबातील इतरांसमोर च्यानल बदलण्याची मानसिकता अजूनही गेलेली नाही. मग ‘जे पाहू नये, करू नये असे काय असते,’ ते इतर मार्गांनी (इंटरनेट वापरणाऱ्या मुला-मुलींचे सर्फिंग पाहिल्यास अथवा फेसबुक अकाऊंट/मोबाईलमधील सेक्सविषयक विडीओ क्लिप पाहिल्यास आपणास लक्षात येईल की आपला पाल्य हे सगळं जाणून घ्यायला उत्सुक आहे. आणखी एक सत्य, वेश्यावस्तीत शाळकरी/विद्यालयीन मुलेही जातात. ‘ती आमची नसतात,’ असे आपण जरी म्हटले तरी ती कुणाचीतरी असतात, हे नक्की. ) समजून घेण्याची पाल्यांची वृत्ती बळावते, जे पाल्यासाठी नुकसानकारकही ठरू शकते. त्यापेक्षा अशा दृष्यांबाबत घरातही खेळकरपणे चर्चा व्हावी. अपत्यांच्या लैंगिकतेच्या शंकांचे निरसन योग्य पद्धतीने करावे, जेणेकरून त्यांची जिज्ञासा मिटेल आणि त्यांना आयुष्याबाबतचे निर्णय घ्यायला मदत होईल. या विषयाबाबतीत संकोच बाळगून उपयोग नाही. अपत्याच्या जन्मा अगोदरपासून त्याच्या/तिच्या भवितव्यासाठी जमापुंजी ठेवणारे पालक पाल्याच्या वयापरत्वे दृढ होणाऱ्या लैंगिकतेविषयी विचार करणं, संवाद साधणं मात्र गरजेचं समजत नाहीत. आणि तेच भविष्यकालीन विसंवादाचं मूळ कारण ठरतं. हा विषय आपण ‘लैंगिक शिक्षण’ म्हणून शालेय शिक्षणात टाकला तरी संपूर्ण समाजातच या विषयावर मौन पाळण किंवा ‘झाकून किंवा घाण/अश्लील’ बोललं जात असल्या कारणाने पालक आणि शिक्षकही हा विषय टाळत असतानाचे चित्र आपणाकडे आहे. किशोरवयातील लैंगिक भावनांचा अर्थ न समजल्यामुळे, त्यांचे समायोजन न झाल्यामुळे पाल्यांचे व्यक्तिमत्व खुंटण्याची, गंभीर लैंगिक आजारांना बळी पडण्याचीच दाट शक्यता असते. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनाइजेशनच्या आकडेवारीनुसार, भारतात देशाच्या लोकसंख्येचा २५% हिस्सा असणारा १५-२९ हा वयोगट मात्र देशाच्या एकूण एचआयव्ही एड्स पोझीटीव्ह टक्केवारीपैकी ३१% इतकी जास्त टक्केवारी व्यापतो. लैंगिकतेबद्दलची समज वाढल्याने पाल्य किंवा समाज बिघडत नाही तर अधिक प्रगल्भ होतो. एकीकडे आपणाकडे कामसुत्र, खजुराहो लेणी अशा सांस्कृतिक कलाकृती असतानाही (पाहूनही) आपण प्रत्यक्ष व्यवहारात प्रणय या गोष्टीकडे ‘संस्कृती’ नष्ट करेल, असे म्हणून डोळेझाकच करतो. अशा गोष्टीनी संस्कृती भ्रष्ट किंवा नष्ट होण्याचा प्रश्नच नाही कारण ती कधीच स्थिर नसते, मानवाच्या गरजेनुसार ती बदलते.

आपणाकडे लग्न झालेली जोडपीही सार्वजनिक जीवनात शारीरिक निकटता टाळतानाच दिसतात. चालतानाही नवरा कोसभर पुढे आणि बायको मागे असे चित्र ग्रामीण भागात अजूनही आहे. गाडीवर बसतानाही चुकून बायकोने कमरेभोवती हात ठेवला तर ते आवडणारे नवरे कमी आहेत. आणि अशी शारीरिक जवळीकता (एकमेकांचा हातात हात घेतला तरी) स्वीकारलेल्यांकडे ‘काय चळ लागली आहे बघा,’ असे कुत्सितपणे इतर म्हणताना दिसतात (जे काही करायचं ते ‘चार भिंतीच्या आत आणि रात्री’ अशा विचासारणीतले सगळे). जोपर्यंत हा विषय सार्वत्रिक आणि सन्माननीय (पेक्षा त्याला चिकटलेलं ‘घाण’पण जात नाही.) होत नाही तोपर्यंत यातील समस्या कमी होणार नाहीत. हा विषय सार्वत्रिक होणं म्हणजे ‘अश्लीलता, पाप/व्यभिचार बोकाळणं’ असा समज करून घेण्यापेक्षा याकडे निकोपपणे पाहता आलं पाहिजे. शाळा-कॉलेजमधील व्यासपीठावर या विषयाला धरून चर्चा, समुपदेशन अशी संवादकेंद्रे निर्माण व्हायला हवीत. सामाजिक संस्था, युवक मंडळे, युवक गट, महिला मंडळे यातून या विषयावर चर्चा व्हायलाच हव्यात. विविध प्रकारची साहित्य निर्मिती, सिनेमा/मालिका निर्मिती होणे गरजेचे. प्रत्येक प्रकारच्या आणि प्रत्येकाच्या लैंगिकतेचा आदर करायला हवा, ही वृत्ती जोपासली जायला हवी. लग्नाअगोदरील समुपदेशन सर्वमान्य गरज बनायला हवी. प्रत्येकाला आपल्या खाजगी आयुष्यातील शरीर संबंधांबाबत इतरांशीही मोकळेपणाने बोलता, व्यक्त होता आलं पाहिजे (आपणाकडे लग्न झालेली जोडपीही ‘असा’ संवाद करत नाहीत, त्यामुळे ‘आम्हांला दोन मुले झाली तरी ‘शरीर संबंधातले प्रेम’ म्हणजे काय असते ते अजून कळले नाही, असं बायका सांगतात, तेंव्हा खरंच गंमत वाटते.). त्यावर निर्भेळ संवाद साधता येण्यासारखी परिस्थिती तयार झाली पाहिजे, केली पाहिजे. कंडोम किंवा इतर गर्भनिरोधकांची माहिती सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवी. (खरं तर यात सरकारनेही सकारात्मक पुढाकर घेण्याची अत्यंत गरज आहे. असं करणं म्हणजे ‘व्यभिचाराला’ प्रोत्साहन देणं नव्हे तर नैसर्गिक लैंगिक आविष्काराचं काळजीपूर्वक उत्सर्जन व्हायला मदत करणं, हे समजून घ्यायला हवं. पण आपली मुलं ‘बिघडतील’ म्हणून डान्सबार बंद करून ‘नैतिकता’ जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारकडून गर्भानिरोधकांच्या प्रचाराचं मुख्य केंद्र ‘कुटुंबनियोजन’ असंच राहतं. आणि लैंगिकतेबद्दलच्या सार्वत्रिक ‘मोकळ्या संवादाच्या’ भूमिकेअभावामुळे सरकारमधले मंत्री, खासदार वगैरे मंडळी अधिवेशन चालू असताना ‘चोरून’ ब्लू फिल्म पाहताना छुप्या कॅमेऱ्याकडून पकडले जातात.) गर्भनिरोधक खरेदी करतानाचा आणि अर्थातच विकताणाचाही संकोच आणि टेन्शन दूर पळालं पाहिजे (लग्न करून शरीरसंबंध ठेवण्याचे ‘लाईसेन्स’ मिळविणारी जोडपीही गर्भनिरोधक खरेदी करण्याची लाज वाटते, म्हणून इच्छा नसताना ‘आई-बाप’ बनतात, मग इतरांच्या संकोचाची काय कथा!).  हे सगळं परिवर्तन लगेच होणार नाही याची मला जाणीव आहे, पण प्रयत्न मोठया प्रमाणात व्हायला हवेत. समाज नक्कीच बदलत आहे; लैंगिकतेसंबंधातील काही विचार, परंपरा खोलवर रुजल्यामुळे वेळ थोडा जास्तच लागतोय. पण तरुण पिढीनेही युरोपीय देशांप्रमाणे एकदम सगळं बदलावं, अशी अपेक्षा करणं आणि तिथल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत वागण्याचा ‘अट्टाहास’ धरणं सामाजिक परिवर्तनाला खीळही घालू शकतं (युरोपातही सेक्सला दिलेल्या अतिरिक्त महत्वाचे तोटेच जास्त दिसून येतात हेही तितकेच खरे !). कधी समाजाच्या कलाने, कधी बंडखोरीने; हळुवार एक एक पाऊल टाकण्याने होणारे परिवर्तन दीर्घकाळ टिकणारे असते. युरोपियन देशातही हा विषय सार्वजनिक आणि सामान्य (common) व्हायला काही काळ नक्कीच गेला. आपणाकडेही संपूर्ण समाजाच्या पातळीवर स्थित्यंतर व्हायला बराच कालावधी जाईल, पण सर्व पातळ्यांवरून प्रयत्न झाल्याखेरीज हा विषय ‘बोलका’ होणार नाही.  प्रत्येकजण यासंदर्भात निर्णय घ्यायला सक्षम होईल आणि त्या निर्णयाचा इतरांकडून सन्मान होईल, मग शरीरसंबंध- लग्नापूर्वी की नंतर हा प्रश्न कुणालाच पडणार नाही, हो ना?

(साभार: सदर लेख ‘मिळून साऱ्याजणी’ मध्ये प्रकाशित झाला होता)

Comments are closed.