मैत्रिणी प्रेमात पडलीयेस, सेक्सबद्द्ल काय विचार करतीयेस…

2,774
विवाहपूर्व शरीर संबंध

विवाहपूर्व शरीर संबंध ही एक आजकाल सर्वसामान्यपणे आढळून येणारी घटना आहे. हे नाकारण्यात अर्थ नाही. त्याबाबत खुलेपणाने विचार विनिमय व चर्चा होणे फार गरजेचे आहे ते मात्र घडत नाही. विवाह करण्याचे नक्की ठरलेले आहे, परंतु घराची सोय नाही, शिक्षण चालू आहे, अशा काही कारणांनी विवाह लांबतो, अशावेळी दोघांच्या संमतीने शरीरसंबंध आला, तसेच गर्भधारणा न होण्याच्या दृष्टीनेही काळजी घेतली गेली असे बऱ्याच जोडप्यांच्या बाबतीत घडत असावे.

तथापि मुलीची इच्छा नसतांना, याच मित्राशी विवाह करावा की नाही अशी द्विधा मन:स्थिती असल्यामुळे वा विवाहाची शक्यता कमी असल्यामुळे मुलगी शरीरसंबंधास राजी नसेल, अशावेळी जर तिचा मित्र शरीर संबंधासाठी तिच्यावर दबाव आणत असेल तर ते गैर आहे.

तुमच्या बाबतीतही हे घडू शकते.
  • तुम्ही तुमच्या मित्राबरोबर एकटया फिरायला गेलात, तुम्ही एकत्र कॉफी घेतलीत किंवा सिनेमा पाहिलात की लगेच तो पुढची अपेक्षा धरतो. तुम्ही शरीरसंभोगाला तयार आहात असे तो गृहीतच धरतो.
  • तुम्ही नकार दिला तर त्याला अतिशय राग येतो. तुम्हाला सोडून जाण्याची धमकी तो देतो. संभोगास नकार, म्हणजे माझ्यावर तुझे प्रेम नाही असे तो म्हणतो. प्रेम सिध्द करायचे असेल तर माझ्याबरोबर चल अशी गळ तो घालतो.
  • तू माझ्याबरोबर इतक्या वेळा एकटी आलीस, मला झुलवलेस, खेळवलेस असे आरोप तो करतो. परंतु लक्षात ठेवा या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. तुमची इच्छा ही सर्वात महत्वाची आहे. तुमचे शरीर तुमचे आहे. त्यावर फक्त तुमचा अधिकार आहे.
त्यामुळे अगदी चुंबनापर्यंत तुमचे संबंध पोहोचले असले, तुम्ही त्याला तोपर्यंत कधीही नकार दिलेला नसला तरी शरीरसंबंधाला तुम्ही नकार देऊ शकता. तुम्ही नकार देऊन देखील त्याने तुम्हाला एकांतात गाठले व तुमच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध घडला तर तो बलात्काराचा गुन्हा आहे.

समजा तुम्ही स्वेच्छेने शरीरसंबंधाला तयार झालात तर त्याने निरोध वापरायलाच हवा, या पूर्वअटीवर तुम्ही ठाम रहायला हवे. तो याबाबतीत बेफिकीर राहील व कधीतरी अधून मधून संबंध ठेवल्याने लगेच गर्भधारणा होत नाही असे तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करेल. पण या सांगण्यास अजिबात भुलू नका, बळी पडू नका. एकाच संभोगातूनही गर्भसंभव होऊ शकतो आणि अशी गर्भधारणा झाली तर तुम्हालाच असह्य मनस्ताप व त्रास सहन करावा लागेल. शेवटी निर्णय तुमचाच आहे.

आपली मते मांडण्यास कधीही घाबरु नका

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः स्वत:च्या शरीराकडे कशा पाहता, स्वत:ला व्यक्ती म्हणून महत्व देता की फक्त स्वतःचे स्त्रीत्व गोंजारत, जोपासत बसता, याबाबत आत्मपरीक्षण करा. तुम्ही स्वतःच्या स्त्रीत्वाचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या फायद्यासाठी करुन घेता कामा नये. याचा फायदा म्हणजे समाज, पुरुष, बरोबरीचे मुलगे देखील तुमच्याकडे व्यक्ती म्हणून व आदराने पाहू लागतील. हा नुसता विचार नसून व्यवहारातही हे सिध्द झालेले आहे हे लक्षात घ्या. स्वत:चे वागणे बदला, अधिक ठाम बना, तुमचा स्व जागृत ठेवा, स्वाभिमानी असा, दबून राहू नका, आपली मते मांडण्यास कधीही घाबरु नका.

संदर्भ : पुस्तक “मी माझीच” – मीना देवल

 

Comments are closed.