‘सेक्स चॅट विथ पप्पू अॅण्ड पापा’ या वेबसिरीज विषयी_ त्रिशूल द.नि.

2 1,684

“आई बलात्कार म्हणजे काय गं?” हा प्रश्न संपायच्या आतच आईची एक संतप्त प्रतिक्रिया आली, “गप्प बस रे असलं ’काहीही’ विचारू नकोस”. मी चौथीला असताना, दूरदर्शनवर चालणाऱ्या दामिनी मालिकेतील कोणतातरी प्रसंग पाहून विचारलेला प्रश्न होता तो. ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली गेली, त्यानंतर कधीच कोणताही लैंगिक प्रश्न विचारण्याची हिंमतच झाली नाही. शाळेतही लैंगिकतेसंदर्भात विषयावर माहिती दिल्याचं आठवत नाही. जी काही माहिती मिळाली ती सेक्स मॅगझिन्स आणि पॉर्न क्लिप्स पाहूनच. अशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने सगळ्याच पालकांची, मुलांचीआणि सगळ्यांचीच आहे.

तुम्हाला, मला आणि खरंतर सगळ्यांनाच असे प्रश्न पडत असतात. पण लैंगिक गोष्टींसंदर्भात अजिबात बोलायचंच  नाही आणि बोलूही द्यायचं नाही, असा समाजाचा अलिखित नियमच आहे. (शिव्या मात्र सगळ्या लैंगिक अवयवांवरुन किंवा लैंगिक क्रियेशी संबंधीतच असतात.) लहान मुलांना लैंगिकतेसंदर्भात माहिती मिळूच नये असा प्रयत्न पालक कसोशीने करताना दिसतात. सिनेमातील कोणताही बोल्ड सीन आला की, चॅनल बदलणं किंवा अशावेळी लहान मुलांना काहीतरी वस्तू घेवून यायला सांगणं; असे प्रकार होताना दिसतात. येनकेन प्रकारे त्यांनी ’तसला’ प्रश्न विचारलाच तर उत्तर देणं सोडाच पण तुला हा प्रश्न पडलाच कसा? यावरच चर्चा आणि मारामाऱ्या चालू होतात. सेक्स, योनी, लिंग, वीर्य, मासिक पाळी किंवा हस्तमैथुन कोणत्याही ’शब्दाचं’देखील एक्स्पोजर मुलांना द्यायचं नाही, अशी स्थिती कित्येक घरात अजूनही दिसते. आपल्या आई-वडिलांना पण त्यांच्या पालकांनी असंच वागवलेलं असतं आणि मग आपले पालकही त्याच जुनाट परंपरांचं ओझं वाहत बसतात. आता वेळ आपली आहे. आपल्याला या टाकाऊ परंपरांचं ओझं अजून किती वाहायचं हे ठरवण्याची. आज मुलं फक्त टि.व्ही आणि रेडियो पाहत, ऐकत नाहीत. आजची माध्यमं अत्यंत जलद आणि सहज उपलब्ध आहेत. ज्यांच्याकडे ही जलद माध्यमं नाहीत त्यांची स्थिती फार चांगली आहे असं नाहीये. किंचितशा फरकाने सगळे तिथेच आहेत.

मुलं एकदम निरागस असतात. कुठंही(?), कसलेही(?) प्रश्न विचारातात. मग पंचाईत होते मोठ्या माणसांची.. म्हणजेच पालकांची! कदाचित अलिखित नियम ते पाळत असावेत किंवा त्यांना देखील याविषयी फारशी माहिती नसावी. काही पालकांना मात्र माहिती असून देखील कसं सांगावं हा मोठा प्रश्न पडतो. मुलांना समजेल का? मुलांनी या माहितीचा वापर ’चुकीच्या’ कामासाठी केला तर? मुलं बिघडतील, असं काहिसं मनात चालू असतं.

नेमका हाच धागा पकडून नुकत्याच प्रसारीत करण्यात आलेल्या ‘सेक्स चॅट विथ पप्पू अण्ड पापा’ या वेबसिरीजमध्ये अशा प्रश्नांना हात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पप्पूला पडणारे प्रश्न अगदीच स्वाभाविक आणि त्याल्या विविध माध्यमातून मिळणार्‍या माहितीच्या आधारावर असतात. पप्पूच्या पप्पांना या गोष्टींची कल्पना असते की ’मोगँबोनो’ (पप्पूचे आजोबा) त्यांना या प्रश्नांची उत्तरं दिली नव्हती. इकडनं तिकडनं मिळालेली माहिती शास्त्रीय नव्हती. त्यामुळं पप्पूच्या पप्पांनी ठरवलं की, आपल्या पप्पूला जे काही प्रश्न पडतील त्यांची उत्तरं त्याला दिलीच पाहिजेत. पप्पूचे पप्पा त्यांच्या पप्पांच्या चुकीच्या परंपरेला फाटा देत, पप्पूशी मनमोकळा संवाद साधताना दिसतात.

‘माणूस हा सामाजिक प्राणी आहे’, हे वाक्य लहानपणापासून ऐकलेलं, वाचलेलं, पाहिलेलं आहे. आता आपण मोठे झाले आहोत. आता आपण हे देखील म्हणायला हवं की, ‘माणूस हा सामाजिक आणि लैंगिक प्राणी आहे’. अर्थात माणसाने स्वतःसाठी काही लैंगिक मूल्यं तयार केली, जी इतर प्राण्यांमध्ये दिसत नाहीत. वयाच्या ठराविक टप्प्यानंतर शरीरात आणि मनात विविध बदल व्हायला लागले की त्यासोबतच काही प्रश्नही निर्माण व्हायला लागतात. प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग शोधतो. माणूस असण्याचं ते एक लक्षण आहे.

टीप: ‘सेक्स चॅट विथ पप्पू अण्ड पापा’ ही  वेबसिरीज you tube वर उपलब्ध आहे.

2 Comments
  1. Prasun says

    Excellent website with helpful information!

    1. I सोच says

      Thanks for your reply…

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.