भारतीय तरुणांची लैंगिक आक्रमकता वाढत आहे का?

3,965

दिवसेंदिवस भारतातल्या तरुणांमध्ये लैंगिक आक्रमकता वाढत आहे असा चिंताजनक निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनाने काढला आहे. आयसीआरडब्ल्यू या संस्थेने इतर दोन संस्थांच्या समवेत रवांडा, मेक्सिको, क्रोएशिया, चिली आणि भारत या ५ देशात केलेल्या  या अभ्यासातून असे निष्कर्ष समोर आले आहेत. १८-५९  वयोगटातल्या एकूण २००० पुरुषांचा या सर्वेक्षणात सहभाग होता.  बलात्कारासंबधी काही प्रश्न सहभागींना विचारले गेले. त्यासोबतच बाल शोषण, लिंगभेद, हिंसेचा अनुभव अशाही काही मुद्दयांवरही काही माहिती गोळा केली गेली. लैंगिक हिंसेचा पुरुषांवर काय परिणाम होतो आणि त्यासंंबंधी त्यांची मतं काय आहेत हे या अभ्यासाने शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात दिल्ली आणि विजयवाडा या दोन ठिकाणी अभ्यास करण्यात आला होता. त्यामुळे देशातल्या सगळ्याच तरुणांची परिस्थिती अशीच असेल असं म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. तरीही या अभ्यासाने पुढे आणलेल्या काही बाबी विचार करायला लावणाऱ्या आहेत.

या अभ्यासातले काही ठळक निष्कर्ष

  • भारतातल्या सर्वेक्षणातील सहभागी तरुणांपैका जवळ जवळ २५% तरुणांनी कधी ना कधी लैंगिक स्वरुपाची हिंसा केल्याचं मान्य केलं आहे. ही हिंसा बहुतेक वेळा आपल्याच जोडीदारावर करण्यात आल्याचं दिसतं.
  • भारतातल्या ज्या सहभागींनी लहानपणी लैंगिक शोषण सहन केलं आहे त्यातल्या ३४% सहभागींनी कधी ना कधी लैंगिक हिंसा केल्याचं कबूल केलं. ३७% सहभागींनी लहानपणी प्रेम मिळालं नाही आपल्याकडे लक्ष दिलं गेलं नाही असंही सांगितलं. लहानपणी मुलांवर प्रेम आणि त्यांची काळजी किती महत्त्वाची आहे हे यातून परत एकदा अधोरेखित केलं आहे. लहान मूल आपल्या आजूबाजूला पाहून मूल्यं आणि दृष्टीकोन शिकत असतं. त्याच्या आसपास काय होतंय याचा मुलाच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो.
  • दारू किंवा अमली पदार्थांचं सेवन हा बलात्कारासाठी कारणीभूत असणारा अजून एक महत्त्वाचा घटक असल्याचं या अभ्यासातून पुढे आलं आहे. दारूच्या अंमलामुळे आपण काय करतोय, त्याचे काय परिणाम होतील, योग्य-अयोग्य काय हे समजत नाही. तसंच उगाच धाडस करण्याची वृत्ती तयार होते. त्यामुळे बलात्काराच्या अनेक घटनांचा आणि दारू किंवा अंमली पदार्थांच्या सेवनाचा कुठे ना कुठे संबंध लागतो असं चिली आणि भारत या दोन्ही देशांमध्ये दिसून आलं आहे.
  • शिक्षण, वैवाहिक स्थिती, नोकरी किंवा रोजगार किंवा वय या घटकांचा बलात्काराशी ठोस संबंध आहे ही धारणा या अभ्यासाने खोडून काढल्याचं दिसतं. नवरा आणि बापाकडून बलात्कार होण्याची शक्यता भारतात जास्त असल्याचं हा अभ्यास दाखवतो.
  • जे आपल्या जोडीदाराला मारहाण करतात ते त्यांच्यावर लैंगिक हिंसा करण्याची शक्यता जास्त असल्याचं भारत आणि रवांडा या देशात दिसून आलं आहे.
  • या अभ्यासाचा अजून एक आगळा वेगळा निष्कर्ष म्हणजे जे पैसे देऊन लैंगिक संबंध ठेवतात ते लैंगिक हिंसा करण्याची शक्यता जास्त असते असं पाचही देशांच्या अभ्यासात दिसून आलं आहे. यातही भारतामध्ये हे प्रमाण सर्वात जास्त म्हणजेच सर्वेक्षणातले ३६.५% सहभागी इतकं आहे.

(संदर्भ – टाइम्स ऑफ इंडिया, 30 ऑक्टोबर 2015, पान 15, पुणे आवृत्ती)

या अभ्यासाने वाढत्या लैंगिक हिंसेचा विचार वेगळ्या पद्धतीने केला आहे. तरुण मुलांच्या मनात नेमकं काय घडतंय, स्त्रिया आणि मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन असा का झाला आहे, लैंगिक क्रिया ही वस्तूप्रमाणे पैसे देऊन किंवा हिसकावून घेता येते असं बहुतेकांना वाटतंय का तसंच स्त्रिया, मुली किंवा लहान मुलं म्हणजे उपभोगाच्या वस्तू आहेत असा दृष्टीकोन वाढीस लागतो आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे.

मात्र अभ्यासासाठी केवळ हेच देश का असा प्रश्न पडतो तसंच लैंगिक आक्रमकतेच्या पलिकडे जाऊन बलात्कार आणि लैंगिक हिंसेचा मुद्दाम वापर कसा केला जातो याचाही विचार होणं आवश्यक आहे. धार्मिक दंगलींमध्ये दुसऱ्या धर्माच्या स्त्रियांवर होणारे बलात्कार असोत किंवा दलित, आदिवासी स्त्रिया आणि मुलींवर मोठ्या प्रमाणावर होणारे लैंगिक हल्ले याचं उत्तर कशात शोधायचं? एखाद्या समूहाला, समाजाला, कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी बलात्काराचं अस्त्र फार पूर्वीपासून वापरण्यात आलं आहे. आणि त्यातून पुरुषही सुटलेले नाहीत हे काँगोसारख्या देशामधून दिसून आलं आहे. त्यामुळे बलात्कार म्हणजे फक्त लैंगिक हिंसा असं कसं मानायचं?  त्याला अजूनही वेगळे कंगोरे आहेत.

तुमची मतं मोलाची आहेत. नक्की कळवा.

Comments are closed.