लैंगिक संबंध व ‘ति’चंं सुख अन् आनंद !

2 8,461

       ‘मुलींना सेक्स करताना सगळ्यात जास्त काय करावे ज्याने त्यांना जास्त आंनद होईल? हा आपल्या वेबसाईट वर अनेकदा विचारला जाणारा व सगळ्यात जास्त वाचला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत माहिती देणारा हा सविस्तर लेख वाचकांसाठी देत आहोत. ज्यामधे काय टाळलं पाहिजे आणि अशा कोणत्या गोष्टी, युक्त्या आहेत ज्यामुळे लैंगिक संबंध अधिक आनंददायी आणि लैंगिक नाते अधिक निरोगी होईल यावर चर्चा केली आहे. चला तर पाहूया.

खरं तर सेक्स किंवा अशी कोणतीच क्रिया नाही ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतील. प्रत्येक व्यक्तीला कशाने छान वाटतं हे त्या व्यक्तीलाच माहित असतं. त्यामुळे सगळ्याच मुलींना सेक्समध्ये अमुकच एका गोष्टीने आनंद मिळेल असं सरसकट उत्तर देणं अवघड आहे. सेक्स किंवा प्रेम ही मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल बोलायला पाहिजे, मतांचा आदर ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या टाळायला पाहिजेत. सेक्समध्ये दोघांना आनंद मिळवायचा असेल तर हे आवश्यक आहे.

एक गोष्ट मात्र नक्की. आपण केवळ सेक्स करण्यासाठी वापरलं जाणारं, जोडीदाराची शारीरिक गरज भागवणारं शरीर आहोत, आपल्या भावभावनांचा, सुखाचा विचार सेक्समध्ये नाही अशी भावना मुलींच्या मनात येत असेल तर मात्र याबाबत पुरुष जोडिदारांनी जास्त संवेदनशीलपणे व जास्त गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. मर्जीविरुद्ध, जोडीदाराला इच्छा झाली म्हणून सेक्सची जबरदस्ती मुलींना आवडणार नाही, नव्हे ती कुणाला आवडतही नाही. एखाद्या फिल्ममध्ये पाहिलेली लैंगिक क्रिया मर्जीविरुद्ध करायला कुणालाच आवडणार नाही. हेच सगळं पुरुषाच्या  बाबतीतही तितकंच खरं आहे. उदा. अनेक मुलांना असं वाटतं की जोपर्यंत मुलीच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत तिला आनंद मिळत नाही. असले समज डोक्यातून काढून टाकलेच पाहिजेत.

पुरुषांच्या बाबतीत लैंगिक इच्छा झाल्यावर लिंगाला ताठरता येणे, नंतर विर्यपतन झाल्यावर अत्युच्य आनंद (ऑरगॅजम) जाणवणे हे ठळकपणे दिसते, कारण पुरुषांचे लैंगिक अवयव शरीराच्या बाहेर असतात. पण महिलांचे लैंगिक अवयव शरीराच्या आत असल्याने ऑरगॅजम व त्याबाबत पुरुषांमध्ये व समाजात बरंच अज्ञान पहायला मिळते. खूप लोकांना बाईला असा आनंद मिळतो हेच माहित नसते. स्वत:चे विर्यपतन झाले म्हणजे सेक्स झाला असाच समज पुरुषांचा दिसतो. बाईच्या ऑरगॅजमबाबत माहिती नसणं वा त्याबाबत असणा-या उदासीनतेबद्द्ल बोलणं आवश्यक आहे.

लैंगिक संबंध – महिलांना मिळणारे सुख व इतर मुद्दे :

ऑरगॅजम म्हणजे काय रे भाऊ?

जेव्हा एखाद्या स्त्रीला अत्युच्य आनंद (ऑरगॅजम) जाणवतो तेव्हा योनी व गुदाच्या आस-पास ओटीपोटाचा तळाच्या (Pelvic floor) मांसपेशीं एकसारख्या लयबद्ध पदधतीने आकुंचन व प्रसारण पावतात व सैलावतात. कधी कधी गर्भाशयही आकुंचन व प्रसरण पावते. काही मुली तर हा आनंद पूर्ण शरीरभर अनुभवतात. हा आनंद पूर्ण शरीराला रोमांचित करु शकतो.

सुख अनुभवू पुन्हा पुन्हा!

महिला एकावेळी एकापेक्षा जास्त वेळा ऑरगॅजम अनभवू शकतात, ज्यामधले अंतर खूप कमी असू शकते. हे संभव होऊ शकते कारण ऑरगॅजम नंतर 10 ते 15 सेकंदामध्ये शिश्निका तिच्या सामान्य आकारात येते आणि पुन्हा उत्तेजनेसाठी तयार होते. पण पुरुषांना विर्यपतनानंतर पुन्हा लिंगाला ताठरता येऊन पुन्हा विर्यपतन व ऑरगॅजम येण्यासाठी यापेक्षा जास्त काळ लागतो.

जमणार ना! पण कसं?  

बोटाने किंवा जिभेने स्पर्श करुन, शिश्निकेला कुरवाळून. कारण जास्तीत जास्त महिलांना फक्त योनीमैथुन करुन ऑरगॅजम मिळत नाही, कारण योनी तुलनात्मक रुपाने कमी संवेदनशील असते आणि योनीमध्ये लिंग आत बाहेर जाऊन शिश्निकेला हवे तेवढी उत्तेजना मिळत नाही. तेव्हा बोटाने किंवा जिभेने शिश्निकेला स्पर्श केल्याने जास्त उत्तेजना मिळते. काही महिलांना मुखमैथुन केलेले आवडू शकते. पण मुखमैथुन करताना काळजी घ्यायला हवी, त्यासाठी सोबतची लिंक पहा https://letstalksexuality.com/dental-dam/ .

जी-स्पॉट

काही मुलींमध्ये जी-स्पॉट अस्तित्वात असतो. हे योनीच्या 3 ते 5 सेमी आत वरच्या भागावर नाण्याच्या आकाराचे क्षेत्र असते. काहींसाठी हे खूप संवेदनशील असते. या भागाला बोटांनी किंवा लैंगिक संबंधांदरम्यान काही आसनांद्वारे उत्तेजित केले जाऊ शकते. 

सुख म्हणजे नक्की कुठे असतं?  

खरं तर आपलं पूर्ण शरीर आपल्याला लैंगिक आनंद देऊ शकते. पण काही जागा ह्या स्पर्शाने जास्त आनंद देतात. मुलींमध्ये हा आनंद बाह्यांग, योनी व शिश्निका येथे स्पर्श केल्याने मिळतो. तसेच मान, हात, स्तन व नितंबही संवेदनशील अंग असतात. तुमच्या जोडिदाराला आवडणा-या व आनंद देणा-या जागा तुम्हीच शोधून काढा. त्यात जास्त मजा येईल.

स्तन, सेक्स आणि सुख

स्तनामध्ये खासकरुन स्तनाग्र हे स्पर्शाच्या प्रती जास्त संवेदनशील असतात. हे उत्तेजित झाल्यावर कडक व मोठे होतात. स्तनाग्रांच्या सभोवतीची जागा फुलून येते व त्याचा रंग अधिक गडद होतो व तिथली कातडी जास्त ओबडधाबड दिसायला लागते. ब-याच महिलांना लैंगिक संबंधांच्या वेळी स्तनांना व स्तनांग्रांना स्पर्श केलेला आवडतो. जेव्हा स्तनांना स्पर्श केला जातो तेव्हा त्याचा परिणाम योनीमध्ये होतो म्हणजेच योनीत ओलसरपणा येतो. जो संभोगामध्ये महत्वाची भूमिका बजावतो.

राजसा जवळी जरा बसा

महिलांपेक्षा पुरुषांना लवकर ऑरगॅजम मिळतो, असं तुम्हाला वाटंत असेल तर हे अगदी सामान्य आहे, जास्तीत जास्त वेळा पुरुष महिलांपेक्षा लवकर ऑरगॅजम अनुभवतात. तेव्हा एकमेकांसोबत ऑरगॅजम यावा म्हणून काही युक्त्या आहेत, जसे की. 

– लैंगिक संबंधात घाई नको, जे आवडते ते मनमोकळेपणाने आपल्या जोडीदाराला सांगा. एकमेकांशी बोला, कशाने सुख मिळतंय आणि कशाचा त्रास होतोय ते शोधा

– पुरुष जोडीदारांनी संभोगादरम्यान थोडं थोडं थांबावं, संभोगावरुन आपलं लक्ष इतर अवयवांकडे किंवा दुस-या गोष्टींकडे द्यावं, काही काही वेळाने लिंग योनीच्या बाहेर काढावं अन लिंगाच्या खालच्या भागाला बोटांनी जोरात दाबावे.

– महिला तेव्हाच पूर्णपणे लैंगिक सुख अनुभवू शकतात जेव्हा आजूबाजूचे वातावरण त्यासाठी अनुकूल असेल. त्यासाठी तिचा मूड तयार करावा लागेल.

– एकमेकाला स्पर्श करुन आनंद घ्या, मध्येच अचानक थांबू नका, तुम्हाला आलेली उत्तेजना एकमेकाला दिसू द्या, दुस-याची उत्तेजना पाहूनही उत्तेजना येते.

– एकमेकाला आश्वस्त करा, लैंगिक क्रिया ही आनंद देण्यासाठी आहे, सोबत असण्यात आहे. इथे फक्त सुख अनुभवायचं आहे, बस्स! ही काही रेस नाही जी जिंकायची आहे.

– लैंगिक क्रियेत दोन्ही जोडीदारांचा सहभाग तेवढाच महत्वाचा असतो, तेव्हा प्रत्येकाने एकमेकाला संधी दिली पाहिजे, एकमेकाला जाणून घेण्याची.

– दरवेळी एकाच प्रकारची लैंगिक क्रिया करायचा नंतर नंतर कंटाळा येतो. नवनवीन आसने शोधावी, एकमेकाला जी आवडतील ती एकमेकाच्या संमतीनेच करावीत.

– शेवटी जे काही कराल ते हलके हलके, आरामात, काहीही नुकसान न होऊ देता करा. उद्देश हाच की दोघांना मजा यावी. साधारणत: महिलांना ऑरगॅजम यायला थोडा वेळ लागतो, हे नेहमी लक्षात ठेवा. वर म्हटल्या प्रमाणे एकदा ऑरगॅजम आल्यावर महिलांना पुन्हा पुन्हा ऑरगॅजम येतो, तो त्यांना अनुभवू द्या, त्यासाठी नक्की प्रयत्न करा.

तर तुम्ही भाग्यशाली आहात

तुम्ही जर एकाच वेळी ऑरगॅजम अनुभवलात तर तुम्ही भाग्यशाली आहात. कारण एकाच वेळी ऑरगॅजम अनुभवणं एवढं सोप्पं नाहिये. पुरुषांच्या बाबतीत जर तुमच्या जोडीदाराच्या नंतर लगेच तुम्हाला ऑरगॅजम आला तर ते अधिक रोमांचकारी असतं.

झालं आता पुढे काय? (आफ्टर प्ले)

संभोग केल्यानंतर एकमेकांबरोबर पहुडणे, एकमेकांना थोपटणे, प्रेमाच्या गप्पा मारल्याने चांगले वाटते. ब-याच मुलींना संभोगानंतर केल्या जाणा-या या कृती खूप महत्वाच्या वाटतात.

आता हे तुमच्या “अच्छे दिन” साठी

खरं तर महिलांना मिळणारा ऑरगॅजम समजणं सुरवातीला जरा किचकट आहे पण नंतरचा आनंद आणि सुखापुढे ते काहीच नाही. ब-याच वेळा ऑरगॅजम नक्की असतो कसा हे कळतंच नाही, पण त्याने जास्त फरक पडत नाही. तुमच्या स्त्री जोडीदाराला ज्यातूनही तो अत्युच्च आनंद मिळतो ते करणं महत्वाचं.

थोडक्यात काय तर संभोगाचा अर्थ प्रत्येक व्यक्ती प्रमाणे वेगवेगळा असतो. कारण प्रत्येकाला आलेल्या अनुभवामधून त्याला कुठे व कशी उत्तेजना मिळते यावर ते अवलंबून असते. त्या जागा शोधा, आनंद तुमचाच आहे, अन तो तुमचीच वाट पाहतो आहे. Go and Feel…

तुमच्या लैंगिक आयुष्यात ‘अच्छे दिन’ यावेत ही सदिच्छा!

लेखाचा काही भाग https://lovematters.in/hi येथुन संपादित केला आहे.

2 Comments
  1. Asmita says

    खरंय.. प्रत्येकाच्या मनःस्थिती नुसार पण फरक पडू शकतो. यात म्हटल्याप्रमाणे या बाबतीतले गैरसमज दूर करून निःसंकोचपणे याकडे पाहायला हवं.

    1. Shubham khandare says

      100% right

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.