आडवळणावर सापडलेली लैंगिकता…_अच्युत बोरगावकर

1,064

तसं पहायला गेलं तर प्रिय श्रावणाला अजून सुरुवात व्हायची होती. पण त्याच्या अगोदरच आषाढाची भलत्याच रोमँटिक अंदाजात जमिनीशी सलगी करूनही झाली होती. मागच्या तीन चार वर्षाची विरहीणी माती या आठवड्या दोन आठवड्याच्या धसमुसळ्या मिलनाने तृप्त दिसत होती. मावळचा खडा पहारेकरी ‘तिकोना’ आपल्या अंगाखांद्यावर हिरवा गुलाल घेऊन स्वागताला उभा होता.

सर्वदूर पसरलेली जलमय, ओली शेतं; समोर तुडुंब भरत चाललेला पवनेचा जलाशय आणि  त्याच्या मागे स्पष्ट दिसणारे तुंग चे निमुळते टोक आणखी एका साहसासाठी आम्हाला खुणावत होते. जणू म्हणत होते की, आणखी एक राउंड होऊन जाऊ द्या. मागच्या दोन चार दिवसातील थोडी उघाड पाहून तिकोना भेटीला गेलेलो ऑफिसातील आम्ही आठ-दहा जण परतीच्या उताराला जेव्हा लागलो, तेव्हा हे दृश्य पाहून चढाईचा आणि दिवसभराच्या पायपीटीचा सारा शीण उतरला. उताराला लागलेली आमची मंडळी जरी बोलत नसली तरी दुसऱ्या चढाईसाठी मनोमन तयार होती. एक नवा उत्साहच जणू संचारला होता. रक्तात संप्रेरकं उसळी मारून म्हणत होती, “काय मित्रांनो दमलात?”

‘तिकोना’ तसा किल्ला कमी आणि एक मोठी टेकडी अधिक. या किल्ल्याचा उपयोगही मावळावर लक्ष ठेवण्यासाठी अधिक व्हायचा. अर्धा अधिक किल्ला उतरून झाला तेव्हा एका वळणावर मोडून पडलेली एक पाटी आम्हाला उजवीकडे वळण्याची खुण करत असताना दिसली. कसली तरी गुहा की काय असावी असं त्या पाटीवरून वाटत होतं. तिशी संपत आलेली असतानाही माझं थोडं वांड आणि भटकं असलेलं मन सांगत होतं, ‘पाहून ये काय आहे.’ मी एक दोघांना तयार केलं तर चार पाच जण तयार झाले. हार्मोन्स, आणखी काय? आम्ही एक दीड किलोमीटर वर असलेल्या गुहेकडे निघालो. मनात असंही वाटत होतं की, हे मध्येच भलतं वळण कशाला? पण झपाझप चालत मी बराच पुढं गेलो तेव्हा रस्त्यात परतीवर असलेली काही मुलं-मुली भेटली. त्यांना विचारलं, “काय आहे रे तिकडे? काही मुर्त्या, कोरीव काम वगेरे?”. “काही नाही काका, दगडात कोरलेल्या एक-दोन रूम आहेत आणि बाकी चिखल आणि वटवाघळांचा वास. एक मूर्ती दिसली पण कशाची आहे ते माहित नाही” ते म्हणाले. ‘काका’ म्हणायची काही गरज नव्हती असं मनातल्या मनात म्हणत मी थांबलो. क्षणभर वाटलं ‘निघा परत, एवढी पायपीट कशाला एक-दोन  खोल्यांसाठी? सोबतींची वाट पाहत काही क्षण थांबलो आणि ते आले तसं “आता एवढं आलो आहोत तर पाहून घेऊ” असं म्हणून गेलोच.

तिकोन्याला अडगळीत पडलेली ही तीन-चार खोल्यांची गुहा, चिखलाने आणि वासाने भरलेली असली तरी मावळ परिसरात असलेल्या बौद्ध कालीन गुहांप्रमाणेच एक उत्तम नमुना वाटली. आडबाजूला पण तिथून एक मोठा भूभाग नजरेला पडेल अशी ही जागा. बांधतानाच पाण्यासाठी काही नियोजन केल्याच्या खुणाही दिसत होत्या.

त्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे मी आणि माझा सोबती ‘त्या’ मूर्तीला शोधत होतो ‘जिचा’ उल्लेख त्यांच्या बोलण्यात आला होता. आणि काय आश्चर्य. एका कोपऱ्यात ती सापडली. एका दगडात ती मूर्ती कोरली होती पण अर्धवट वाटत होती. तो तुटल्यासारखा दिसणारा दगड तिथे कोणीतरी आणून उभा करून ठेवल्याप्रमाणे दिसत होता. नीट लक्ष देवून पहिले असता, मूर्तीच्या वरच्या भागात मैथुनरत स्त्री आणि पुरुष दिसत होते. ती गुद-मैथुनाची स्थिती होती. त्याच खाली आणखी काही अस्पष्ट अशा आकृत्या होत्या.

फोटो, शुटिंग वगैरेचे सोपस्कर पार पडल्यानंतर आम्ही माघारी फिरलो ते हे विचार डोक्यात घोळवतच की, ही तशी या जागची न वाटणारी मूर्ती इथे कशी? तत्सम काहीही इतर खुणा इथे कशा नाहीत? ही मूर्ती कोणी आत्तापर्यंत नष्ट कशी केली नाही अथवा पळवली कशी नाही? पण मुख्य म्हणजे आम्हाला याचाच आनंद की आपली पायपीट फुकट गेली नाही. शिवाय त्या मुलांच्या अज्ञानाबद्दलही (की तथाकथित लाज) दया आली.

काहीही असो, पण ही अशी आडवळणावर सापडलेली (की हरवलेली ?) लैंगिकता  आम्हाला एका अर्थाने सुखावून गेली. भारताची संस्कृती, तिची प्राचीनता, विशेषतः लैंगिकतेबद्दलचा एके काळचा मोकळा आणि सदृढ दृष्टीकोन; मधल्या काळातील ब्राह्मणी, आक्रमण, जाती विषमता  आणि त्यातून एकूणच लैंगिकता विषयाला अस्पृश्य ठरवून त्या भोवती निर्माण केलेल्या ‘अश्लील, अपवित्र’ वगेरे इमेजेस; विशेषतः स्त्रियांच्या लैंगिकतेला दिला गेलेला नकार ई. सर्व विषयांवर आमची चर्चा झाली. मौजमजेसाठी निघालेली ही ट्रीप आम्हाला इतिहासाकडे आणि लैंगिकतेकडे अधिक मोकळ्या मनाने पाहण्याचा एक धडाही देऊन गेली.

नोट : परत आल्यानंतर गुगल वगेरे सर्व इंटरनेट धुंडाळलं. मुर्तीचा फोटो सोडून एका अक्षराची माहिती मिळाली नाही आणि सर्वव्यापी गुगल व आपल्या संचित ज्ञानाच्या मर्यादा लक्षात आल्या. कृपया कोणाला या मूर्तीबद्दल अधिक माहिती असेल तर जरूर कळवा…   

2 Comments
 1. Swapnil Jirage says

  I come across to your post while I am collecting information to write an article on Tikona fort. I am really amazed about this carving. Can you send me more pics about that cave so that I can include in my article. once the article is published I will send you the link of it.
  Pl. send me photo of only cave and surrounding area on my mail id
  swapji_krd@rediffmail.com

  1. I सोच says

   We had a video about it. We will see if we can find it and try to mail you. Please send your article on tathapi@gmail.com

Comments are closed.