शरीर साक्षरता मुलांसाठी!

0 1,763

शरीराबद्दलचा मोकळा व निकोप दृष्टीकोन मुलांमध्ये तयार करू पाहणारा पुस्तक संच

‘शरीर साक्षरता मुलांसाठी’ ह्या पुस्तकाचे ३ संच ‘तथापि’ ट्रस्टने प्रकाशित केले आहेत. लैंगिक शिक्षण हा कायमच वादाचा ठरलेला विषय, मुलांना ही माहिती द्यावी की नाही, किती, कोणत्या वयात आणि कशी अशा अनेक प्रश्नांमध्ये आपण सगळेच गोंधळून गेलेलो असतो. या पार्श्वभूमीवर, लैंगिकता, वयात येणं आणि खरंतर संपूर्ण शरीराबद्दल एक मोकळा निकोप दृष्टीकोन तयार करण्याच्या दृष्टीने हा संच तयार करण्यात आलेला आहे. हा संच १० वर्ष आणि त्यापुढील मुला-मुलींसाठी आहे.

शरीर साक्षरता हा ३ पुस्तकांचा संच तयार करताना १० वर्ष आणि त्या पुढील मुला-मुलींच्या मनाचा आणि त्या वयातील दृष्टिकोनाचा विचार करण्यात आलेला आहे. ह्या वयातील मुलांना पडणारे प्रश्न जसे : माझा जन्म कसा झाला? मी खाल्लेलं सगळं अन्न कुठे जातं? माझ मन कुठे आहे? माझ हृद्य किती मोठ आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयास या संचात करण्यात आलेला आहे. या पुस्तकामध्ये ही माहिती देण्यासाठी वेगवेगळे भाग करण्यात आलेले आहेत. जसे : मी आणि माझे शरीर, मुलगा-मुलगी काय फरक पडतो, वयात येताना, शरीराचे कोडे अशा प्रकारच्या भागामध्ये ही माहिती विभागण्यात आलेली आहे.

मनुष्याचा विकास हा मरेपर्यंत होत असतो. या प्रवासामध्ये तो सतत नवनवीन गोष्टी शिकत असतो. वयात येतानाचे बदल, त्या वयातील आपल्या आवडी-निवडी, त्या बदलांमागची शास्त्रीय कारणे आणि माहिती मुलांना या संचात चित्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

शरीराच्या सर्व कृती, हालचाली आणि भावना या शरीर आणि मन या दोहोंकडून व्यक्त होत असतात. या संचामध्ये ‘मी आणि माझे शरीर’ या भागामध्ये शरीराच्या विविध अवयवांच्या जादुई जगाविषयी लिहिण्यात आलेले आहे. मुलांना माहितीचे आकलन होण्याकरिता या संचात सुंदर चित्रांच्या माध्यमातून आणि सोप्या अशा भाषेत माहिती दिलेली आहे. शिवाय मुलांना त्याच्या प्रतिक्रियाची नोंद करायला रिकाम्या जागाही ठेवण्यात आलेल्या आहेत.

शरीरशास्त्र जेवढं किचकट पद्धतीने सांगितले जाते तसे न दाखवता फार गमतीशीर पद्धतीने ह्या संचामध्ये सर्व भागांच सादरीकरण करण्यात आलेले आहे. ‘वयात येताना’ या भागात प्रत्येक प्राण्याची जन्माची अवस्था, शरीराची वाढ होत असताना होणारे बदल आणि वयात येताना होणारे बदल याचा समावेश करण्यात आला आहे. मुलांना माहितीचे आकलन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नोत्तर-रकान्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

या संचाचा उपयोग मुलांना संपूर्ण शरीरशास्त्र समजून घेण्यासाठी, समाजातील कोणकोणते घटक शरीराच्या आणि मनाच्या वाढीवर कशाप्रकारे परिणाम करतात हे समजण्यासाठी, निकोप वाढीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत याचं ज्ञान ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मुलांना मिळू शकणार आहे आणि त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागण्यास मदत मिळणार आहे.

ह्या संचाची रचना सहभागी सोबत व संवाद साधत प्रशिक्षण देता येईल अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. प्रशिक्षकाला या ३ संचाचा वापर करून सहज पद्धतीने मुलांना प्रशिक्षण देता येईल अशी पुस्तकांची मांडणी करण्यात आलेली आहे. शिवाय पालक आणि शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. त्याचा वापर प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येऊ शकेल.

‘शरीर साक्षरता मुलांसाठी’ या पुस्तकाचे संच इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषामध्ये उपलब्ध होऊ शकतील. ह्या संचाचे एकूण देणगी मूल्य १८० रुपये ठेवण्यात आले आहे. आणि पुस्तकाच्या प्रति ‘तथापि’च्या ऑफीसमध्ये उपलब्ध होऊ शकतील. यासाठी तुम्ही संपर्क करू शकता tathapi@gmail.comया मेलआयडीवर किंवा ०२०-२४४३११०६ / २४४३००५७ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.