तथापिचे नवीन प्रकाशन – ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’ (मतिमंद मुला-मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी)
मागील १५ वर्षांपासून ‘शरीर साक्षरता’ हा तथापिच्या कामाचा गाभा बनला आहे. किशोरवयीन मुलं-मुली, पालक आणि शिक्षकांसाठी शरीर साक्षरतेच्या माध्यमातून लैंगिकता शिक्षणाचा एक महत्वपूर्ण उपक्रम तथापि राबवत आहे. किशोरावस्था हा एक संवेदनशील असा कालखंड प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो. सामान्य मुला-मुलींप्रमाणेच अंध, मूक-बधीर, मतिमंद असं कोणत्या ना कोणत्या कारणाने अपंगत्व असणारी मुलं-मुलीही वयात येत असतात. किशोरवयातील शारीरिक, भावनिक बदल अनुभवत असतात. या बदलांबद्दलच्या प्रश्नांचे गोंधळ त्यांच्याही मनात असणार. पण एकूण किशोरावस्थेबद्दल पालक आणि समाजामध्येही अजून तितकी जागरूकता आणि मनाचा मोकळेपणा सामान्य मुलांच्या बाबतीतही आलेला दिसत नाही. मग अपंग मुला-मुलींबाबत तर त्यांचं किशोरवय, त्यांची लैंगिकता, सुरक्षितता हे विषय दुर्लक्षिलेच गेले आहेत असं दिसतं. पण स्वतःचं शरीर, मन, लैंगिकता समजून घेण्याचा हक्क अपंग मुला-मुलींनाही आहे, असला पाहिजे. या विचारांच्या पार्श्वभूमीवर तथापिने २०१४ मध्ये किशोरवयीन अंध मुला-मुलींसाठी ‘गोष्ट शरीराची… मनाची…’हा ब्रेल पुस्तक, सीडी, पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शिका असणारा संच प्रकाशित केला आहे.
तसंच २०१५ पासून तथापिने मतिमंद मुलांच्या ‘शरीर साक्षरता आणि लैंगिकता शिक्षणा’चा विषय हाती घेतला असून या प्रक्रियेतूनच ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’ (मतिमंद मुला-मुलींच्या शिक्षक व पालकांसाठी) या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. यात मतिमंद मुला-मुलींचे पालक, शिक्षक, समुपदेशक, कार्यकर्ते यांच्याबरोबर कोल्हापूर, यवतमाळ, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, औरंगाबाद या महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे आणि आसपासच्या मतिमंद मुला-मुलींसाठी कार्यरत असणाऱ्या शाळांमध्येही काही गटचर्चा घेण्यात आल्या. या चर्चांमधून पुढे आलेले मुद्दे, पालकांचे अनुभव या पुस्तकाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण ठरले. शरीराची ओळख, वयात येताना मुला-मुलींमध्ये होणारे बदल, मतिमंद मुला-मुलींचं वयात येणं, लैंगिक भावना व्यक्त करण्याच्या पद्धती, लैंगिकता व्यक्त करण्यासाठीचे पर्याय, लैंगिक शोषण आणि त्यापासून सुरक्षितता हे विषय पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. शिक्षक आणि पालकांचे अनुभव आणि मते देखील विचारात घेतली आहेत. या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचे लेख, मुलाखती हा ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’ या पुस्तकाचा महत्वपूर्ण भाग आहे. तसंच पुस्तिका तयार करताना शिक्षकांच्या वेगळ्या अनुभवांना, कार्यकर्त्यांच्या एखाद्या वेगळ्या प्रयत्नालाही महत्व दिलं गेलं आहे.
मतिमंद मुलांच्या ‘शरीर साक्षरता आणि लैंगिकता शिक्षणा’चा विचार करताना पालक आणि शिक्षकांची भूमिका मोठी आणि महत्वाची आहे. म्हणूनच प्रथम पालक आणि शिक्षकांसाठी संसाधन विकसित करण्याचा तथापिचा हा एक प्रयत्न आहे. ‘अपंगत्व आणि मुला-मुलींसाठी शरीर साक्षरता शिक्षण’ या विषयावरील कामासाठी श्रीमती विमलाबाई (जीजी) नीलकंठ जटार ट्रस्टतर्फे सहाय्य मिळाले आहे.
या प्रक्रियेचा पुढचा टप्पा मतिमंद मुला-मुलींसाठी शरीर साक्षरता शिक्षणाचं एक वेगळं संसाधन विकसित करण्याचा असणार आहे. चित्रं किंवा अनिमेशनरुपी माध्यम निवडून असं संसाधन विकसित करता येवू शकतं का अशी विचार प्रक्रिया सुरु आहे. अर्थात या संपूर्ण प्रक्रियेत पालकांचे, अनुभवी शिक्षकांचे, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि सहभाग आवश्यक आहे.
‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’ या पुस्तकाची किंमत २०० रु. आहे आणि तथापि ट्रस्टच्या कार्यालयात पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुस्तक वाचून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
अधिक माहितीसाठी :
तथापि ट्रस्ट, फ्लॅट क्र. १, ७३,
संगम सोसायटी, बिबवेवाडी, सातारा रोड, पुणे ४११०३७
फोन – ०२० ६५२२४८४९ ईमेल: tathapi@gmail.com
वेबसाईट: www.tathapi.org