एकल महिलांच्या लैंगिकतेचे मुद्दे ….

संगिनी महिला जागृती मंडळ, नाशिक

2,564

१५ ते १७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या ‘भाषा भवन’ मध्ये ‘७ वी महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद’ संपन्न झाली. सामाजिक, मानसिक, लैंगिक आरोग्याविषयी विविध क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या अनुभवांची आणि कामात येणा-या समस्या, आव्हानांची मांडणी केली.

यामध्ये नाशिकच्या माया भूजबळ या ताईनी केलेला एकल महिलांच्या लैंगिक आरोग्याचा, समस्यांचा अभ्यास सादर झाला. आपल्या समाजात विविध कारणांनी अनेक एकल महिला राहतात. या महिलांचे प्रश्न आणखी वेगळे आहेत.

त्याच मांडणीच्या आधारे हा लेख आपण आपल्या वाचकांसाठी तयार करून देत आहोत. आपल्या वेबसाईटवर लैंगिकतेच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं जातं हे आपण जाणताच. असाच एक मुद्दा आहे एकल महिलांच्या लैंगिकतेबद्दलचा.

        एकल म्हणजे ? 

एकल म्हणजे एकटया, जोडीदाराशिवाय एकट्या राहणा-या महिलांचा. या असतात आपल्याच घरात, शेजारी, कामाच्या ठिकाणी व आजूबाजूलाही. कोण असतात त्या? तर त्या असतात विधवा, नव-याने सोडून(?) दिलेल्या म्हणजेच परित्यक्ता, लग्न न झालेल्या प्रौढ स्त्रिया, नव-यापासून विभक्त राहणाऱ्या, घटस्फोटिता महिला, कोर्ट केसमुळे, एकमेकांशी पटत नाही वा इतर काही कारणास्तव नव-यापासून वा जोडीदारापासून दूर राहणा-या, जोडीदार नोकरी व्यवसायानिमित्त निमित्त उदा. आर्मी जवान, शिक्षक, इ. कारणास्तव दूर असलेल्या महिला, नव-याचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे, नवरा परदेशात असतो अन मुलांच्या संगोपनासाठी घरी असणाऱ्या महिला. लग्नाशिवाय जोडीदारासोबत एकत्र रहात असणाऱ्या आणि  नंतर एकल झालेल्या अशाही काही महिला असतात. ही यादी आणखी मोठी होऊ शकेल.

       एकल महिलांच्या समस्या :

आपल्या तथाकथित सनातन भारतीय संस्कृतीमध्ये या एकल महिलांचा विचारच मूळी विषमतापूर्ण पद्धतीने केला जातो. नवरा सोबत नाही याची पूरेपूर जाणीव बाईला लोकांच्या वागणूकीतून सतत होत असते. तिला डबल कष्टाची कामे लावली जातात. तिला एकसारखे टोमणे मारली जातात. घरात व बाहेरही सतत भितीची एक टांगती तलवार तिच्या डोक्यावर असते. मुलांसाठी आई-वडील अशा दोन्ही भूमिका तिला निभवाव्या लागतात. यातून त्या बाईच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. पण ते व्यक्त करणे एकल महिलांना खूपच अवघड जाते. यासोबतच घराची पूर्ण जबाबदारी असते. रोजच्या जगण्यावरच सर्व कमाई संपते, त्यामुळे स्वत:चे आजारपण, मनोरंजन हे विषय फक्त कल्पनेतच राहतात.

या व्यतिरिक्त एक महत्वाची गरज कुठल्याही माणसाला असतेच. ती म्हणजे लैंगिक सुखाची. पण जोडीदार जवळ नसल्याने लैंगिक सूख नाही, तसेच सर्वांच्या (तसल्या) नजरेतून स्वतःला वाचवावं लागतं. घरातल्या इतर पुरुषांपासूनही बचाव करावा लागतोच.

एकल महिलांच्या समस्या एवढ्यावरच थांबत नाहीत. तिला शारिरीक संबंधाची गरज आहे हे जवळच्या लोकांच्या लक्षातच येत नाही. आजपर्यंत मिळालेल्या “बाई काचेचे भांडे” या संस्कारी शिकवणीतून आपल्याला शारीरिक संबंधांची गरज आहे असे ती स्वतःही मानत नाही. अन जरी गरज लक्षात आली तरी ती कशी पूर्ण करावी हे कळत नाही. त्याबाबत माहितीच नसते किंवा माहिती असली तरी कुणाला कळालं तर? काही झालं तर? घराची आणि आपली बदनामी होईल अशा निरनिराळ्या शंका आणि भिती तिला वाटत असतातच.

मुलं मोठी झाली असतील तर त्यांचाही वेगळाच ताण असतो. जास्तीत जास्त स्त्रिया मुलांसाठी गप्प बसतात, मुलांना काय वाटेल? हा प्रश्न त्यांना सारखा सतावत असतो. त्यामुळे दुसरं लग्न करण्याची मनाची तयारी नसते. पण एकल महिलांना दुसरं लग्न सोडून आणखी कुठलाही समाजमान्य मार्ग शारीरिक सुखाच्या पूर्ततेसाठी उपलब्ध नाही व दुसरं लग्न करण्यासाठी लागणारे अनुकूल वातावरणही आपल्याकडे उपलब्ध नसते. बाईने कसं वागलं पाहिजे हे संस्कार लहानपणापासून बाईला बाळकडू म्हणून पाजले जातात, त्यामुळे संधी मिळाली तरी स्त्रिया दुस-या लग्नाचा निर्णय घेताना दिसत नाहीत.

नवरा सैन्यात शहिद झालेला असल्यास वा दिवंगत पतीला समाजात प्रतिष्ठा, मान असल्यास अशा पुरुषांच्या पत्नी एकल राहिल्या तर त्याचे गौरवीकरण होते. नव्हे त्यांनी तसेच रहावे यासाठी समाजाचा खूप मोठा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव असतो. शिवाय जर पती निधनानंतर भरपाई म्हणून काही अनुदान, रक्कम किंवा इतर सुविधा मिळाल्या असतील तर अशा बाईला तिचे सासरचे किंवा अगदी माहेरचे कुटुंबीयही दुसऱ्या लग्नाची परवानगी देतील याची शक्यताच नसते. संपत्ती आपल्या हातून जाऊ द्यायची नसते हे कारण अगदी उघड आहे. एखादी बाई बाळ पोटात असतांना विधवा झाली तर बाळाला एकटीनं मोठं करण्याचं फार मोठं राष्ट्रकार्य करण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त होतं हे वेगळंच! नाही का?

        लैंगिकता आणि एकल महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य : 

या सगळ्या समस्यांची यादी अजून बरीच मोठी होऊ शकेल. या सगळ्याचा परिणाम एकल महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे होतो. सततच्या ताण-तणावांचा परिणाम शरीरावरही दिसू लागतो. तीव्र अशक्तपणा, रक्तपांढरी (अनिमिया), वजनात अत्याधिक घट किंवा वाढ होते, एकटं वाटतं, भिती वाटते. चीडचीडेपणा वाढतो, चिंता आणि नैराश्य येते. त्यांना सतत वाटत की आपल्याला काही तरी त्रास होतो आहे पण मेडिकल रिपोर्ट मात्र काही नाही हेच सांगत असतो. कारण मनाच्या आजारांची काहीच दाखल कोणी घेतलेली नसते.

कुणाशी असुरक्षित शारीरिक संबंध आल्यास लिंगसांसार्गिक आजार व एड्स होण्याचीही भिती नाकारता येत नाही. अन जर अशा एकल महिला एचआयव्हीसह जगत असतील तर त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आणि त्यांना मिळणारी वागणूक आणखीनच विषमतेची आणि अन्यायपूर्ण असते.

         काही पर्याय :

सुरक्षित लैंगिक आनंदासाठी कृत्रिम अवयव/खेळणी (सेक्स टॉईज़) हे एक योग्य माध्यम आहे. परंतू आपल्या देशात लैंगिक खेळणी, उपकरणं तयार करण्यास, विकण्यास कायद्याने बंदी आहे. ही सर्व खेळणी अश्लील वाङ्मयाखाली मोडत असल्यामुळे त्यांची निर्मिती करणं भा.दं.सं. २९२ खाली गुन्हा आहे. त्यामुळे अशी उपकरणे दुकानात विकत मिळत नाहीत. पण ऑनलाईन पद्धतीने मागवता येतात. या वस्तू दुस-यांना दाखवणं, देणं, विकणं, पाठवणं गुन्हा असला तरी एखाद्या व्यक्तीने खाजगीत अशा गोष्टी बाळगणे गुन्हा नाही. तेव्हा एकल महिला या वस्तूंचा उपयोग नक्की करू शकतात. पण online market वरच या गोष्टी उपलब्ध आहेत हे माहित नसल्याने वा तिथपर्यंत पोहोच नसल्याने त्या मिळण्यास मोठी अडचण येते.

दुसरा मार्ग आहे हस्तमैथुनाचा. स्वतःच स्वतःला लैंगिक आनंद देण्याचा हा खरे तर एक सुरक्षित आणि सहज मार्ग आहे. (आपल्या वेबसाईटवर आपण यावर ब-याच वेळा यावर लिहिले आहे. लेखाच्या खाली दिलेल्या लिंक नक्की पहाव्यात). हस्तमैथुनासाठीही ब-याच वेळा महिलांना स्वत:ची खाजगी जागा नसणे, स्वत:साठी मोकळा वेळ नसणे अशा अडचणी येतातच. पण यावरही मार्ग काढता येईलच की.

        हे करायलाच हवं !

समाज बदलेल तेंव्हा बदलेल पण गरज आहे बाईनं अधिक खंबीर होण्याची, माणूस म्हणून आपल्या स्वतःच्या गरजा स्वीकारण्याची आणि त्या दृष्टीने पावलं उचलण्याची. आपण स्वतःच स्वतःला ही संधी द्यायला हवी. स्वतःचा, स्वतःच्या शरीराचा विचार करणारी स्त्री ही चांगल्या चारित्र्याची नाही हे जग सांगतच राहणार आहे. एकल महिलांनी माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मागितले पाहिजेत. विचार करण्याचे, इच्छा करण्याचे, ती इच्छा व्यक्त होण्याचे, आवडीनिवडी जपण्याचे, छंद जोपासण्याचे स्वातंत्र्य आपल्या सर्वांनाच आहे.

लेख वाचून तुम्हाला काय वाटलं? तुमच्या आजूबाजूचे काही अनुभव असतील तर आम्हाला खाली कमेंट्स मध्ये जरुर लिहा. आपल्या प्रतिक्रिया, प्रतिसादाची आम्ही वाट पाहू.
7 Comments
 1. Prachi says

  प्रत्येक एकल स्त्रीला, for that matter, प्रत्येक स्त्रीला स्वत्वाची जाणीव असणे, ती नसेल तर करून देणे हे फार फार गरजेचं आहे. त्याशिवाय हे पुढचे कुठलेच प्रश्न सुटणार नाहीत. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते आसपासच्या लोकांना जाणीव करून देणं की एकल आहे म्हणुन लगेच तिला देवी बनवायची गरज नाही किंवा ती दयेस पात्र पण नाही. To add more to it, please ती एकटी आहे म्हणुन लगेच नजरा तिरक्या करून शंकेने बघू नका!!

  माझ्या नात्यातली एक जण आहे, तिचा नवरा काही वर्षांपूर्वी गेला. वय पण जास्त नव्हतं. ती आता त्यातून बाहेर पडलीय,स्वतंत्र आहे, नोकरी करते, मुलासोबत राहते. एकंदरीत छान चाललंय! पण कधी चुकून एखादा पार्टीतला, छान तयार झालेला, dark लिपस्टिक लावलेला फोटो fb किंवा watsapp ला टाकला तर लगेच comments चालू होतात ‘हिला काय गरज एवढं नटायची!! बघितले का फोटो!! कुणी म्हणेल का विधवा आहे म्हणुन!! लाज सोडलीय बाईनी!!( तिथे sex तर तिच्यासाठी पापंच) !!तोच एखादा विधूर असेल तर त्याच्यासाठी ढीगभर स्थळ सुचवतील!!तो कुठेही गेला, कुणासोबत ही फिरला तरी काही फरक पडत नाही!! ती विधवा झाली म्हणजे तिच्या जगण्याचा हक्कच हिरावून घ्यायला बघतात लोकं!! This view definitely has to change somewhere.Social stigma attached to a ‘single woman’ has to be removed. Next talking about sex in open should be considered as normal as we discuss about politics or any other social issue.

 2. Arvind says

  Very nice information and article.

 3. sameet says

  फार छान लेख आहे .. कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मला एक विचारायचे होते खरंच अशा स्त्रिया असतात कि ज्यांना सेक्स बद्दल मोकळेपणे बोलायला आवडते किंवा त्या स्त्रीची गरज म्हणून म्हणजे अगदी शरीरसंबंध ना ठेवताही?

  1. let's talk sexuality says

   ज्यांच्या सोबत comfortable वाटतं त्यांच्यासोबत बोलायला कुणाची ना नसावी, शेवटी हा देखील व्यक्तीगत मुद्दाच आहे. व्यक्तीगणिक वेगवेगळी मते असू शकतात.

   1. sameet says

    मला तरी असे कोणी इतके कम्फरटेबल असे भेटलेच नाही त्यामुळे कोणाबरोबर शेअर करायची हिम्मतच नाही झाली..पण मोकळे होणे गरजेचे आहे नाहीतर मनात दबून राहते

 4. Kavita Bhosale says

  Nice information

  1. let's talk sexuality says

   Thanks !!!

Comments are closed.