सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज

11,974

सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज

कौमार्य

आपल्याकडे लग्नाआधी मुलीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे यावर फार मोठा भर दिला जातो. एखाद्या मुलीने किंवा मुलाने एकदाही लैंगिक संबंध ठेवले नसतील तर तिचं किंवा त्याचं कौमार्य अबाधित आहे असं मानलं जातं. मुलींच्या बाबतीत कौमार्याची अजून एक व्याख्या आहे. मुलींच्या योनिमार्गात एक पडदा असतो. त्यामध्येही व्यक्ति-व्यक्तिंमध्ये वेगवेगळे प्रकार आढळत असून तो  पातळ किंवा जाड असू शकतो. हा पडदा जर फाटलेला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असं समजलं जातं. पण कधी कधी खेळताना, सायकल चालवताना, पाळीमध्ये टॅम्पोनचा वापर केला तर अशा विविध कारणांनी हा पडदा फाटू शकतो. त्यासाठी केवळ लैंगिक संबंधच व्हायला पाहिजेत असं नाही. अनेक मुलांचा असा समज असतो की लग्नाच्या पहिल्या रात्री संभोगानंतर मुलीच्या योनिमार्गातून रक्त आलं नाही तर ती व्हर्जिन नाही. पण हे खरं नाही. लैंगिक उत्तेजनेमुळे योनिमार्ग ओलसर होतो आणि लिंग आत सहजपणे जाते व रक्तस्राव होत नाही.

कौमार्याच्या बाबत काही प्रश्नांवर नक्की विचार करा. मुलांसाठी कौमार्याची परीक्षा कशी घेणार? कसं कळणार की मुलगा व्हर्जिन आहे का नाही?

सुहाग रात

मित्र-मैत्रिणींनी हसत हसत नवऱ्या मुलाला खोलीमध्ये ढकललंय. पलंगावर नववधू चेहऱ्यावरती पदर ओढून बसली आहे. तो हळूच पदर वर उचलतो. ती लाजेने चूर होते. एकेक दागिना उतरत जातो आणि खोलीचे दिवे मालवले जातात. सुहाग रात, लग्नानंतरची पहिली रात्र अशी सिनेमा-टीव्ही-पुस्तकांमधून आपल्या डोळ्यासमोर पक्की बसली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री लैंगिक संबंध होणारच आणि ते झाले नाहीत तर दोघांपैकी कुणामध्ये तरी काही तरी कमी आहे असा फार मोठा समज आहे.

पण खरंच लग्नाच्या पहिल्या रात्री सगळं घडायलाच हवं असं काही नाही. लग्नाआधीपासून मुलगा मुलगी एकमेकांना ओळखत असतील, त्यांच्यामध्ये मोकळेपणा असेल तर कदाचित ते प्रणय करतील, शरीराने जवळ येतील आणि संभोगही करतील. मात्र जर ठरवून केलेलं लग्न असेल, मुला-मुलीची फारशी ओळख नसेल, स्वभाव आवडी निवडी, कम्फर्ट माहित नसेल तर लग्न झाल्या झाल्या लगेच शारीरिक जवळीक करावीशी वाटेलच असं काही नाही. लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यात नक्की काय होतं हेही धड माहित नसतं. अशा वेळी एका जोडीदाराने फारच पुढाकार घेतला तर दुसरी व्यक्ती भांबावून जाऊ शकते. लग्नानंतर जेव्हा तुम्ही जवळ येता तेव्हा दोघंही जण कम्फर्टेबल असणं, मोकळे होणं गरजेचं असतं. आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच सगळं व्हायला पाहिजे असं नाही.

2 Comments
 1. सुधीर says

  लिंग जास्त वेळ आणि जास्त प्रमाणात ताठ ठेवण्यासाठी काय करू.?
  संभोग करण्याची उत्सुकता असली तरी लिंग ताठ नाही होत आणि जरी झाले तर जास्त वेळ नाही राहत. उपाय सांगा टेन्शन येते खूप.

  1. let's talk sexuality says

   टेंशन घेऊ नका. असा प्रश्न अनेक पुरुषांना भेडसावत असतो.

   सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात.

   लिंगाच्या ताठरतेबाबत व उपायाबाबत आपल्या वेबसाईट वर सविस्तर लेख दिलेला आहे. सोबतची लिंक पहा.

   https://letstalksexuality.com/penis-erection/

Comments are closed.