सातनंतर…घराबाहेर!!!

770

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीमध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार आणि गंभीर मारहाणीची घटना घडली, त्यात त्या मुलीचा जीव गेला. या आणि यानंतर व आधीही घडलेल्या अनेक घटनांमधून भारतात स्त्रिया आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का या प्रश्नाची चर्चा पुन्हा नव्याने घडली. रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि खरं तर घरंदेखील स्त्रियांसाठी सुरक्षित नाहीत हे स्त्री संघटना आणि स्त्री चळवळीने कायमच अधोरेखित केलं आहे, त्याबद्दल आंदोलनं, निदर्शनं होत आली आहेत तरीही मुली आणि स्त्रियांना रस्त्यावर, घराबाहेर हिंसेचा सामना करावा लागतोच आहे.

भारतीय घटनेने स्त्रियांना समान अधिकार दिले असले तरी संस्कृती, सामाजिक चाली-रितींच्या नावाखाली स्त्रियांना मोकळेपणाने संचार करण्याची घराबाहेर पडण्याचीही परवानगी दिली जात नाही. काय कपडे घालायचे, कुठे जायचं, कधी परत यायचं याचे अलिखित नियम मुलींसाठी केले जातात. एकीकडे स्त्रिया आणि मुली वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येत असताना सुरक्षेचा प्रश्न मात्र आहे तसाच आहे. पुणे, बंगलोर इथे झालेले आयटी कंपनीतील स्त्रियांचे खून हेही याच मानसिकतेतून झालेले दिसतात. जिथे समाजातला एक हिस्सा स्वतःच्या मर्जीने बाहेर पडू शकत नाही, स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेऊ शकत नाही तो देश स्वतंत्र कसा मानायचा?

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हिंसेसाठी सुद्धा अनेकदा मुलींनाच जबाबदार धरलं जातं. पुण्याच्या अनेक महाविद्यालयांमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या मुलींसाठी खूपच कडक नियम लावले जातात. 8 च्या आधी परत येणं, फोन करण्यावर बंधनं आणि एकूणच त्यांच्या संचारावर मोठ्या प्रमाणावर बंधनं घातली गेलेली आहेत. उलट जी मुलं छेडछाड करतात, हिंसा करतात, त्यांच्यासाठी मात्र असे कोणतेही नियम नाहीत. ते उशीरा परत येऊ शकतात, कोणत्याही वेळी बाहेर जाऊ शकतात. हा विरोधाभास कशासाठी? दिल्लीच्या एका संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये ९०% मुली आणि स्त्रियांना लैंगिक छळ सहन केल्याचं पुढे आलं. गंभीर बाब ही की ४०% सहभागींना छेडछाड म्हणजे टाइमपास किंवा मजा वाटते. त्याचे मुलींच्या आयुष्यावर काय गंभीर परिणाम होऊ शकतात याची त्यांना जराही कल्पना नाही.

घर, दार, पार, रस्ते सगळं जितकं मुलांचं आहे तितकंच मुलींचंही आहे. त्यामुळे गरज आहे आपली नजर बदलण्याची. विचार बदलण्याची आणि पाऊल उचलण्याची.

चला, बाहेर पडू या. घड्याळाकडे न पाहता सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, पारावर, कट्ट्यावर बसू या, गप्पा मारू या…मुलं-मुली एकत्र, वेगवेगळे, गटात किंवा एकटे…

कदाचित हळू हळू त्यातूनच बदल घडेल.

Comments are closed.