बाई मनाचा पुरूष – योगेश गायकवाड

आपण असे का आहोत म्हणून स्वत:शी संघर्ष, तृतीयपंथी म्हणून समाजाशी संघर्ष करावा लागतो. आणि हे सगळं कशासाठी तर फक्त तिला बाईसारखं जगावं वाटतं म्हणून. दुसरीकडे आपण मात्र त्यांना विशिष्ट लेबल देऊन चिडवत राहातो. हिणवत राहातो.ते का?

1,303

सामाजिक कार्यकर्ती असलेली माझी मैत्रीण अनिता पगारे आणि मी या पुरवणीच्या  एकाच पानावर असतो. जगता जगता या माणूसपणावर साचत जाणारे थर खरवडून काढण्याकरिता आम्ही अधून-मधून भेटतही असतो.

यंदाच्या व्हॅलेण्टाइन्स डेला असेच आम्ही भेटलो ते अनिताताईच्या संस्थेनं आयोजित केलेल्या एका कार्याक्रमाच्या निमित्तानं. तरुणांशी गप्पा मारायला आम्हा चौघांना तिनं बोलावलं होतं. त्यातल्या दोन माझ्या जुन्या मैत्रिणी होत्या; पण चौथी अनोळखी व्यक्ती फारच इंटरेस्टिंग होती. तिचा उल्लेख मित्र म्हणून केलेला तिला आवडेल की मैत्रिण? असा जरासा विचित्र  प्रश्न  आयुष्यात पहिल्यांदाच मला पडला होता. ती व्यक्ती दिसायला पुरुष पण मुलींसारखा शृंगार केलेला, छान साडी नेसलेला आणि नाव प्राची असलेला. हो! अशा व्यक्तींना आपण ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी, किन्नर किंवा हिजडे म्हणून ओळखतो. (खरं तर हिणवतो )

शिक्षण पूर्ण करून प्राचीनं आज एक उत्तम चित्रकार  म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलेली आहे. वयात येत असताना तिला मुलींचे कपडे घालावेसे वाटायचे, केस वाढवून लिपस्टिक लावून बघावीशी वाटायची, मुलांबद्दल आकर्षण वाटायचं. अर्थातच हे सगळं घरी समजल्यावर तिला खूप मार खावा लागला.  बायल्या म्हणून अवहेलना सहन करावी लागली. घर सोडून किन्नर समाजाची दीक्षा घेऊन आसरा मिळवावा लागला.

प्राचीनं निसर्गाचा हा निर्णय मान्य केला आणि त्याची लाज न बाळगता शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपल्या आतल्या आवाजाचं ऐकत एक बाई म्हणून स्वाभिमानानं जगायला सुरुवात केली. प्राची स्वत:बद्दल घडाघडा बोलत होती आणि समोर बसलेली कोवळी पोरं आ वासून ऐकत होती.

बाप्याच्या शरीरात बाईचं मन बसवलं गेलं आणि दिलं सोडून त्या बाळाला या प्रतिकूल जगात एकट्यानं जगायला. आपण असे का आहोत म्हणून स्वत:शी संघर्ष, मुलींसारखं जगावं वाटलं तर घरच्यांशी संघर्ष आणि शेवटी ट्रान्सजेंडर म्हणून समाजाशी, कायद्याशी संघर्ष. आणि हे सगळं कशासाठी तर फक्त तिला बाईसारखं जगावं वाटतं म्हणून.

सिग्नलवर, रेल्वेच्या बोगीत, बदनाम गल्लीच्या अंधारात या लोकांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो, का? तर निसर्गानं आपल्याला दोन पायांच्यामध्ये एक निश्चित अवयव दिलाय म्हणून? असल्या घाणेरड्या वृत्तीच्या समाजाचा आपणही एक भाग आहोत याची इतकी लाज मला याआधी कधीच वाटली नव्हती. आपलं माणूसपण विवेकाच्या पॉलिश पेपरनं सतत घासणा-या आपल्यापैकी अनेकांच्या मनात अशी अपराधी भावना असेल. पण त्या भावनेचं पुढे करायचं काय? नेमकं उत्तर देण्याची माझी पात्रता  नाही. पण आमच्या फिल्म इंडस्ट्रीनं यावरची उत्तरं केव्हाच शोधली आहेत.

सध्या मी एक डान्स रिअँलिटी शो करतो आहे. शूटिंगच्या धावपळीत नृत्य कलाकारांना पटापट धोतरं किंवा साड्या बदलाव्या लागतात. त्यासाठी मदतनीस म्हणून  ‘ड्रेपर्स’ लागतात. आमच्या युनिटमध्ये हे काम प्राचीच्या कम्युनिटीमधल्या दोघीजणी करतात. कमीतकमी वेळात पुरुषांना धोतरं नेसवण्यात आणि बायकांना नऊवार नेसवण्यात या दोघींचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यांची शरीरं पुरुषांची असली तरी मनानं त्या शंभर टक्के महिला आहेत. म्हणून संवेदनशील असणा-या फिल्म इंडस्ट्रीनं त्यांना स्वीकारलं आहे. या दोघी मुलींच्या चेंजिंग रूममध्ये अगदी मुलींसारख्या वावरतात आणि कोणालाच त्याचं काहीच वाटत नाही. इतरांप्रमाणे त्या दोघीदेखील आमच्या युनिटच्या सन्मानीय सदस्य आहेत आणि हक्कानं आपली रोजीरोटी कमावत आहेत.

विचार बदला. उपाय दिसतील.

आपल्या बाजूनं एक छोटीशी सुरुवात म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी प्राचीला आपली व्हॅलेण्टाइन बनवून आम्ही तो प्रेमाचा दिवस साजरा केला. स्टेजवरच्या सजावटीतला लाल रंगाचा हृदयाच्या आकाराचा फुगा आम्ही तिला दिला आणि जाहीर केलं की, ‘आम्ही सर्वजण तुझ्यातल्या  स्त्रीत्वाचा सन्मानपूर्वक स्वीकार करतो. आजवर आम्ही (विशेषत: पुरुष) तुम्हा लोकांशी जे वागलो त्याबद्दल माफी मागतो.

मनाला वाटेल तसे कपडे घालायचा, शृंगार करायचा, संबंध ठेवण्याचा तुम्हाला अधिकार आहे, तो अधिकार बजावत उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.’

ओलावल्या डोळ्यांनी प्राची आमचे आभार मानत होती. आमच्या बरोबर सेल्फी क्लिक करताना म्हणाली,   ‘हा फुगा मी आयुष्यभर जपून ठेवीन.’  मी गमतीनं म्हटलं,   ‘दोन दिवसात त्यातली हवा निघून जाईल.’ त्यावर प्राची म्हणाली, ‘चालेल. हा विचार घेऊन ती हवा सगळीकडे पसरेल आणि कदाचित समाज आम्हाला माणूस म्हणून स्वीकारेल आणि फुग्याची ती उरलेली चिंधी पण मी वहीत जपून ठेवीन.  कारण फाटलेल्या मनाला ठिगळ लावायला अशा प्रेमाच्या चिंध्याच कामी येतात!’

(लेखक सामाजिक विषयांवरील फिल्ममेकर आहेत.) 

yogmh15@gmail.com

बातमीचा स्रोत : http://www.lokmat.com/sakhi/story-men-who-want-live-woman/

Comments are closed.