मी स्यूझेट जॉर्डन…पार्क स्ट्रीट बलात्कार पीडित ही माझी ओळख नाही…

3,497

‘बलात्कार म्हणजे आयुष्याचा शेवट’, ‘अशा मानहानीपेक्षा मरण का नाही आलं’, ‘बलात्कारात गंभीर जखमी झालेली स्त्री म्हणजे ‘जिंदा लाश’’, ‘बाईची इज्जत म्हणजे काचेचं भांडं, एकदा फुटलं की जोडता येत नाही’…अशी किती तरी विधानं आपण सतत ऐकत आलो आहोत. बलात्कार हा अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्याचे शरीरावर, मनावर आणि व्यक्तीच्या आत्मविश्वासावर मोठे आघात होतात. पण बलात्कार म्हणजे काही आयुष्याचा अंत नाही. बलात्कारानंतर झालेल्या बदनामीमुळे जीव दिलेल्या अनेक मुली आणि स्त्रिया आहेत पण स्वतःला बळी न मानता बलात्काराची घटना मागे टाकून पुढे जाणाऱ्या, स्वतःचं आयुष्य ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्याही अनेक जणी आहेत. त्यातलीच एक होती स्यूझेट जॉर्डन.

कलकत्त्याच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू भागामधल्या पंचतारांकित क्लबमधून रात्री घरी परतत असताना काही जणांनी तिच्यावर सामूहिक हल्ला चढवून बलात्कार केला. त्यानंतर मोठं रण माजलं. ‘इतक्या रात्री दोन मुलींची ही आई क्लबमध्ये का गेली होती’, ‘तिने दारू कशाला प्यायली होती’ असे लोकांचे सवाल असोत किंवा ‘हा सगळा बनाव आहे’ अशी खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेली टिप्पणी असो, स्यूझेटच्या चारित्र्यावरच आक्षेप घ्यायला सुरुवात झाली. बलात्काराची तक्रार द्यायला गेल्यावर झालेली योनीमार्गाची तपासणी, शरीरावरच्या खुणा, वळ पाहण्यासाठी नग्न अवस्थेत केलेली तपासणी, काही पोलिसांचे घाणेरडे कटाक्ष हे परत एकदा बलात्काराचा अनुभव देणारे ठरले. काही मान्यवरांनी तिची संभावना ‘वेश्या’ अशी केली, जणू काही वेश्येसोबत असं काहीही केलेलं चालतं. ती एकटी तिच्या मुलींना मोठं करत होती. पण यासाठी कौतुक तर सोडाच ‘तिचा नवराच तिला सोडून गेला असेल’ असाही आरोप तिच्यावर करण्यात आला.

या सगळ्याचा परिणाम म्हणजे बलात्कारानंतरचे पुढचे 15 महिने ती अगदी कोषात गेली, स्वतःला लपवत राहिली. पार्क स्ट्रीट बलात्कार पीडित अशीच तिची ओळख बनून गेली. स्वतःची ओळख परत मिळवण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. स्यूझेट सांगायची, ‘मी किती तरी ठिकाणी नोकरीसाठी अर्ज पाठवले, पण एकाचंही उत्तर आलं नाही. माझा आत्मविश्वास संपत चालला होता. मी नैराश्य आणि चिंतेसाठी गोळ्या घ्यायला लागले होते. मला रात्री स्वप्नं पडायची, मी दचकून उठायचे. माझे आई-वडील आणि माझ्या मुली माझ्यासोबत नसत्या तर मी नक्कीच जीव दिला असता.’

कुठेच काम मिळत नाही हे पाहून शेवटी तिच्या मैत्रिणीने तिला हेल्पलाइनमध्ये काम दिलं. घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या स्त्रियांना मदत करता करता स्यूझेटही आतून बरी होऊ लागली.

सामूहिक बलात्काराविरोधातल्या एका मोर्चात जाताना तिला तिची मूळ ओळख सापडायला लागली. तिची मैत्रीण तिला म्हणाली, ‘तू का चेहरा लपवतियेस, ज्यांनी गुन्हा केला त्यांनी त्यांचं तोंड लपवायला पाहिजे.’ मोर्चामध्ये ती उघडपणे सहभागी झाली आणि तेव्हाच तिला तिचा गेलेला आत्मविश्वास परत मिळाला. आणि तिच्या असण्यामुळे मोर्चातल्या बाकी स्त्रियांना बळ मिळालं ते वेगळंच.

तिचं आयुष्य हळू हळू पूर्वपदावर यायला लागलं. पण मेंदूज्वराच्या संसर्गाने जुलैमध्ये स्यूझेटचा मृत्यू झाला. बलात्कार पीडीत ही ओळख धुडकावून स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगण्याची हिंमत दाखवणारी स्यूझेट जॉर्डन म्हणूनच आपली हिंमत वाढवते.

7 Comments
 1. संजना says

  स्यूझेट जॉर्डन यांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग वाचला आणि फार वाईट वाटल. तिच्यावर बलात्कार होवून सुद्धा समाज तिच्याकडे कशा नजरेने पाहतोय ? आणि तिला मदत करणे तर दूर उलट तिच्यावर आरोप केले जात आहेत.

  1. I सोच says

   खरं आहे संजना… मात्र हेच समाजाचं वास्तव आहे… छेडछाड किंवा लैंगिक छळ यासाठी नेहमी स्त्रीलाच जबाबदार धरले जाते…

 2. प्रियांका says

  जिच्यावर बलात्कार झालाय तिला समाजाने तिला मदत करण्यापेक्षा तीच जगण कठीण केलंय. आणि दुसरीकडे बलात्कार करणारे मात्र निवांत जगत आहेत. किती विरोधाभास ………………………………

  1. I सोच says

   समाजातील सद्यस्थितीही यापेक्षा फार वेगळी नाही…

 3. मेघना says

  बलात्कार झालेल्या स्त्रियांची समाजात इतकी मानहानी होते की, तिला जगण्यापेक्षा मरण योग्य वाटतं. पण समाजात बलात्कार होवू नयेत यासाठी पुरुषी मानसिकता बदलणे गरजेचे आहे हे कोणीच लक्षात घेत नाही व यासाठी कोणीच काही प्रयत्न करत नाही…………………… मला अस वाटत आपल्यापासूनच सुरवात करूयात का ?

  1. I सोच says

   खरं आहे… बलात्काराची सुरुवात मेंदूपासून होते त्यामुळे बदलही मेंदूत आणि मानसिकतेत झाला पाहिजे…

 4. I सोच says

  प्रतिक्रियेबद्दल तुमच्या सर्वांचे आभार…. असंच लिहित रहा… वेबसाईट वरील इतर लेखही अवश्य वाचा… तुमचे विचार, सूचना आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत..

Comments are closed.