‘स्वीकार’ आधार गट

मतिमंद मुला-मुलींच्या पालकांसाठी

1,165

पालक बनणं हा अनेकदा अविस्मरणीय आनंदाचा अनुभव असतो. पण त्याबरोबरच नवनवीन जबाबदाऱ्या पेलण्याची कसरतही सुरु होते. त्यातही जेव्हा मुलांच्या काही विशेष गरजा असतात, तेव्हा त्यांना वाढवताना पालकांच्या क्षमता पणाला लागतात. विशेषतः मतिमंद मुलं-मुली वयात येताना पालकांना वेगवेगळे प्रश्न भेडसावू लागतात, काळजी वाटू लागते. कसं आणि कुणाला सांगावं? अशी स्थिती बनलेली असते. म्हणूनच ‘पालक’ म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी विश्वासाने मांडता येणारी, समजून घेणारी आणि मनाला उभारी देणारी एक जागा हवी असते. साधारणपणे एकाच अनुभवातून जाणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्या तर ‘नाजूक’ समजल्या जाणाऱ्या गोष्टी बोलतानादेखील आश्वस्त वाटतं, परस्परांचा आदर वाढीस लागतो, अडचणींवर विविध उपाय, पर्याय शोधले जाऊ शकतात. म्हणूनच वयात येताना मतिमंद मुला-मुलींच्या निर्माण होणाऱ्या गरजा, त्यानुसार पालकांना पडणारे प्रश्न, लैंगिकता शिक्षणाची गरज अशा अनेक विचारांच्या धर्तीवर या पालकांसाठीच्या आधार गटाची संकल्पना पुढे आली आणि ‘स्वीकार’ या नावाने गट साकारही झाला.

कोणतंही अपंगत्व असणाऱ्या, त्यामध्ये मतिमंद मुला-मुलींनाही लैंगिक भावना असतात आणि ते नैसर्गिक आहे, त्यात तिटकारा वाटावा असं काहीही नाही, या गोष्टीचा ‘स्वीकार’ पालक, शिक्षक आणि समाजानेही करणं गरजेचं आहे. म्हणूनच ‘स्वीकार’ गट या नावाने गटाचा प्रवास सुरु झाला. मतिमंद मुलं-मुली वयात येताना, आल्यानंतर… पालकांच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध ‘काळज्या’ मोकळेपणाने मांडण्याची, त्यावर लैंगिकतेच्या निरोगी, सकारात्मक, शास्त्रीय दृष्टीकोनातून चर्चा घडवून काही पर्याय शोधण्यासाठीची, निर्माण करण्यासाठीची पालकांसाठीची अशी एक ‘स्पेस’ तयार करण्याचा प्रयत्न ‘स्वीकार’ गटाच्या माध्यमातून करत आहोत.

स्वीकार गटाची उद्दिष्टे

 • किशोरवयातील बदलांविषयी शास्त्रीय माहिती, सकारात्मक दृष्टीकोन पालकांपर्यंत पोचवणं.
 • मतिमंद मुला-मुलींच्या लैंगिकता शिक्षणाचे विविध पर्याय शोधणं.
 • या मुला-मुलींना लैंगिक आणि इतर हिंसेपासूनही सुरक्षित राहता यावं, यासाठी पर्याय शोधणं.
 • याविषयी पालकांची समज आणि क्षमता वृद्धिंगत करणं.

 स्वीकार’ गटाची वैशिष्ट्ये

 • स्वीकार आधार गटाचे दोन स्वतंत्र गट कार्यरत आहेत. एक गट पुणे आणि परिसरातील मतिमंद मुला-मुलींच्या पालकांसाठी (आई-वडील, मतिमंद मुला-मुलींचा सांभाळ करणाऱ्या व्यक्ती) सुरु करण्यात आला आहे. दुसरा गट पुण्याजवळील तळेगाव येथे तळेगाव आणि आसपासच्या ग्रामीण भागातील पालकांसाठी सुरु केला आहे.
 • पालकांबरोबरच मतिमंद मुलांचे शिक्षक, समुपदेशक, कार्यकर्ते यांनाही या गटाशी जोडले जाण्याची संधी.
 • तज्ञ व्यक्ती, वेगळे आणि सकारात्मक मार्ग निवडणारे पालक, शिक्षक यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी.
 • ‘मतिमंदत्व आणि लैंगिकता’ या विषयाबरोबरच मतिमंदत्वाची कारणे, मुला-मुलींचे आर्थिक पुनर्वसन, कायदे व योजना, पालकत्व अशा संबंधित विषयांवरही मार्गदर्शन.
 • प्रत्येक महिन्यात साधारणपणे दोन तासांच्या सत्राचे आयोजन.
 • सत्राची तारीख, वेळ आणि ठिकाण पालकांच्या दृष्टीने सोयीचे ठरवण्याचा प्रयत्न.
 • नि:शुल्क सदस्यत्व. (फी नाही.)
 • कालांतराने पालकांच्या स्वयंप्रेरणेतूनच या गटाचे कार्य पुढे जावे असा मानस.

 

पुण्यातील ‘स्वीकार गट’ हा सप्टेंबर २०१६ मध्ये सुरु झाला आहे. मतिमंदत्वाची कारणे, मतिमंद मुला-मुलींचे सामाजिक, भावनिक, आर्थिक पुनर्वसन, शरीर साक्षरता, मानवी लैंगिकता, वयात येताना होणारे बदल; अशा विविध विषयांवर आत्तापर्यंत गटाची १० सत्रं घेण्यात आली आहेत. गटाच्या प्रक्रियेत ७० पालक, काही शिक्षक आणि समुपदेशक गटाशी जोडले गेले आहेत. २५-३० पालक नियमितपणे गटाला येतात आणि त्यांना गटातील चर्चेचा, सत्रांचा उपयोग होत आहे, असे दिसते. महाराष्ट्रातील विविध भागांत पालकांनी, शाळेतील शिक्षकांनी असे गट सुरु करण्याचा प्रयत्न करावा अशी मनीषा आहे. तथापितून गटासाठी आवश्यक मार्गदर्शन नक्कीच मिळू शकेल. स्वतःला मदत करतानाच इतरांनाही मदत करण्याची संधी हे गट आपल्याला देतात.

‘स्वीकार गट’ ही पालकांसाठी अशी ‘स्पेस’ असेल, जिथं ते आपलं मन मोकळं करू शकतात, इतर पालकांशी, तज्ञांशी संवाद साधू शकतात… मतिमंद मुला-मुलींचं वयात येणं आणि भावनांची अभिव्यक्ती निकोपपणे समजून घेऊ शकतात…

आधार देऊया… आधार घेऊया… स्वीकार गटाशी नातं जोडूया!

स्वीकारगटाशी जोडून घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर ०२०६५२२४८४९ / ९५२७२८५७९६ संपर्क साधा

Comments are closed.