बरं झालं, मी पुरुष झालो! -योगेश गायकवाड

बा निसर्गा ! बरं तरी तू पुरुषांची बाजू घेतलीस. नाहीतर आम्हाला पण बायकांसारखं बसून शू करायची वेळ आली असती तर किती गोची झाली असती? असला काही त्रास नसलेल्या पुरुषाच्या देहात जन्माला घातल्याबद्दलचे तुझे ऋण मी कधीच फेडू शकत नाही.

1,059

परवा रात्री मी घाबरून झोपेतून जागा झालो. वाईट स्वप्न पडलं होतं. शहराच्या गर्दीच्या भागातून मी बाइकवरून फिरत होतो. पोटाचा खालचा भाग जड होऊन दुखायला लागला होता. स्पीड ब्रेकरचा धक्का पण अगदी नकोसा वाटत होता. जवळपास कुठेही मुतारी दिसत नव्हती. आता बांध फुटेल की काय असं वाटत असतानाच मॉलमध्ये शिरलो. पार्किंगवाल्या मुलीनं सुट्या पैशांवरून वाद घालत घालवलेला एक एक सेकंद मला एकेका युगासारखा वाटत होता. ‘ठेव तुलाच ते सगळे पैसे’, म्हणत मी धावतच शौचालय गाठलं. तर तिथे ‘नो सर्व्हिसचा बोर्ड वाकुल्या दाखवत दारावर लटकत होता. कुठे जाऊन मोकळं व्हावं अशा विवंचनेत असतानाच एक ओळखीची सुंदर मुलगी समोर आली आणि कॉफी घेऊयात का, म्हणून विचारू लागली. कुठल्याही क्षणी फुगा फुटेल अशी परिस्थिती असताना त्यात अजून भर घालायच्या कल्पनेनंच मला घाम फुटला आणि मी दचकून जागा झालो. किलकिल्या डोळ्यांनी अर्धवट झोपेत मी स्वत:ला समजावून सांगू लागलो की ते स्वप्न होतं. प्रत्यक्षात आपल्यावर अशी परिस्थिती येऊच शकत नाही. पुरुषाच्या जन्माला घातल्याबद्दल निसर्गाचे मनोमन आभार मानत मी पुन्हा निवांत झोपून गेलो.

खरंच, पुरुषाचा जन्म मिळाला म्हणून निसर्गत:च मला उभ्यानं शू करण्याचं मोठं वरदान मिळालं आहे. त्यात माझा जन्म भारतासारख्या अशा देशात झालाय जिथे पुरुष म्हणून मला फारशी सामाजिक बंधनं नाहीत. इतकं भाग्यशाली वगैरे वाटावं, इतका लघुशंका हा महत्त्वाचा विषय आहे का? तुम्हाला जोराची लागली असेल तर आहे अन्यथा नाही, इतकं साधं त्याचं उत्तर आहे. पण मला पुरुष म्हणून तो विषय इतका गंभीर वाटतंच नाही. कारण मला कुठेही, उभ्या उभ्या शु करण्याची सोय आहे. नाही म्हणायला सार्वजनिक ठिकाणी पुरुषांसाठी मुता-या असतात. गलिच्छ असतात पण आपलं काम भागून जातं. नाकावर रूमाल ठेवला की त्या घाणीचा तसा आपल्याला त्रास होत नाही. आपल्याला कुठे त्या घाणीत बसावं लागतं? आणि समजा नसेल जवळपास मुतारी उपलब्ध तरी काय बिघडतं? ‘होल वावर इज अवर’च्या अधिकारानं आपण कुठेही बिनधास्त जाऊ शकतो. ‘बा निसर्गा ! बरं तरी तू पुरुषांची बाजू घेतलीस. नाहीतर आम्हाला पण बायकांसारखं बसून शू करायची वेळ आली असती तर किती गोची झाली असती?’ कॉफी शॉपसारख्या ठिकाणी जिथे स्त्री आणि पुरुषांसाठी एकच प्रसाधनगृह असतं, तिथे कमोडच्या बसण्याच्याच जागेवर पिवळट डाग पडलेले असतात. तशा त्या कमोडवर बसून शू करण्याची वेळ तू माझ्यावर येऊ दिली नाहीस म्हणून तुझे आभार.

माझी निर्मिती करताना ही सोय तू केली नसतीस तर भारतासारख्या देशात प्रवासाला जाताना माझी किती पंचाईत झाली असती? म्हणजे शू लागलेली असो वा नसो, घरातून निघताना बळजबरी जाऊन यावं लागलं असतं. प्रवासात चहा प्यायला थांबायचं म्हटलं तरी बरोबरच्या बायका ‘स्वच्छ शौचालय बघून थांबू’, असा आग्रह धरतात तेव्हा जाम डोकं फिरतं राव. एक्स्प्रेस हायवेवर सापडतात अशी ठिकाणं पण जरा आडवाटेनं प्रवास करायची वेळ आली तर त्यांचा हा फालतू हट्ट पुरवताना आपली तारांबळ उडते. तुझ्या कृपेनं पुरुष मंडळींची हायवेला कधी अडचण होत नाही. जरा प्रेशर वाढतंय वाटलं की गाडी बाजूला घ्यायची आणि हुश्श व्हायचं; पण चुकून तू मला बाईच्या जन्माला घातलं असतं तर अर्धा जन्म फक्त या ‘शू’ विचारातच गेला असता माझा. कोणत्याही कारणानं घराबाहेर पडताना पहिला विचार काय करायचा तर मुतायला जागा मिळेल का? मिळाली जागा तर ठीक; पण नाही मिळाली तर कितीतरी तास निसर्गाची हाक दाबून ठेवायची? आणि मूत्राशयाच्या आजारांना बळी पडायचं? रोज वेगळी आव्हानं स्वीकारत फिल्डवर्क करायला मला आवडतं; पण बाहेर प्रसाधनगृहांची सोय नसल्यानं मला नाइलाजानं ऑफिस जॉब घ्यावा लागला असता. एक आडोसा आणि टमरेलभर पाण्यासाठी संपूर्ण करिअरशी तडजोड करावी लागली असती यार. बरं झालं निसर्गराजा तू मला पुरुषाच्या जन्माला घातलंस. तुझे पुन: पुन्हा आभार मानावेसे वाटतात की तू मला मुलीच्या आणि तेसुद्धा एखाद्या वयात येणा-या मुलीच्या अवस्थेत टाकलं नाहीस. नाहीतर दर महिन्याच्या त्या चार दिवसात मला लाचार होऊन स्वत:ला ‘स्लो डाउन’ करावं लागलं असतं. आणि फक्त सार्वजनिक ठिकाणी नॅपकिन बदलायला सोयीची जागा नाही म्हणून दर महिन्याच्या त्या चार दिवसांचं नियोजन मला शौचालयाभोवतीच करावं लागलं असतं. असला काही त्रास नसलेल्या पुरुषाच्या देहात जन्माला घातल्याबद्दलचे तुझे ऋण मी फेडू शकत नाही.

बराच वेळ चाललेलं माझं हे आभार प्रदर्शन निसर्गराजा शांतपणे ऐकत होता; मात्र त्याची बायको अचानक खवळली. झाडं सळसळली, लाटा उसळल्या आणि अचानक आकाशवाणी झाली, ‘ हे स्वार्थी पुरुषा ! तू तर फक्त कल्पना करूनच इतका घाबरलास. पण एका साध्या नैसर्गिक क्रियेसाठी प्रत्यक्षात इतका झगडा करावा लागणा-या बायकांचं काय होत असेल? केवळ मूत्नविसर्जनाची पुरेशी सोय नसल्यानं पुढील जन्मी त्यांनी पण नर देहाची मागणी निसर्गाकडे केली तर तू जन्माला तरी येशील का रे? पुढच्या जन्मीचं विसर, याच जन्मात त्या सर्व बायकांनी पुरुषांच्या शौचालयाला दोन तासांकरिता कुलपं घातली तरी तुमची अक्षरश: जागीच ओली होईल. आमच्या यांनी तुम्हाला एक अवयव वेगळा काय दिला त्याच्या जोरावर तुम्ही इतका माज करताय? पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली सगळी सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. आणि आपल्या मूलभूत अधिकारासाठी महिलांना भीक मागायला लावताय? लक्षात घे नर मानवा! ज्या जागेच्या सोयीसाठी त्यांना एवढा संघर्ष करावा लागत आहे त्या पवित्र जागेचा तुझ्या जन्मात आणि तुझ्या एकूणच अस्तित्त्वात खूप मोठा सहभाग आहे. तेव्हा तुला पुरुषाचा जन्म लाभला म्हणून आनंद व्यक्त करण्याबरोबरच बाईचं जगण सोपं होईल यासाठी पण प्रयत्न कर. उपकार म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून ! ‘आणि काय हो! तुम्ही काय शांतपणे बघत बसला आहात? पुरुषाची जात मेली इथून तिथून सारखीच.’ आपला मोर्चा नवा-याकडे वळवत निसर्गाची बायको अंतर्धान पावली आणि मी पुन्हा झोपेतून जागा झालो. यावेळी मात्न माझे डोळे पूर्णपणे उघडले गेले होते.

(लेखक सामाजिक विषयांवरील फिल्ममेकर आहेत.)

yogmh15@gmail.com

लेखाचा स्त्रोत : दुवा http://www.lokmat.com/sakhi/thank-god-i-became-man/

Comments are closed.