‘The World before her’ च्या निमित्ताने…. ले. शकुंतला भालेराव

1,011

निशा पहुजा दिग्दर्शित २०१२ मध्ये प्रकाशित झालेला ‘The World before her’ हा माहितीपट दोन वेगवेगळ्या अंगाने जातो आणि शेवटी एकाच प्रश्नावर येऊन थांबतो. समाजातील स्त्री स्वातंत्र्याचे भयानक वास्तव यातून चित्रीत केलं आहे. लहानपणापासूनच जाती-धर्मावरुन माणसा-माणसांत पाडली जाणारी फू्‌ट, स्त्री-पुरुष भेदभाव, स्त्री शरीराचा अनादर, स्त्री स्वातंत्र्याविषयीचा संकुचित विचार असे अनेक धागे-दोरे या माहितीपटातून उलगडतात.

“बिकीनी घालायला कम्फर्टेबल वाटत नाही कारण पाहणाऱ्यांच संपूर्ण शरीरावर आणि प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रीत होतं. पण सौंदर्यस्पर्धांसाठी असणाऱ्या ट्रेनिंगचा हा एक भाग असल्याने तो करावाच लागतो.” असं म्हणणारी रूही आणि “हिंदू धर्म वाचवण्यासाठी जर कुणाला जीवाने मारायची वेळ आली तर मी तेही करेन.” असं म्हणणारी प्राची या दोन भिन्न प्रकारच्या तरुण स्त्रिया या माहितीपटात दिसतात.

‘तुम्ही लहान दिसता परंतु येणाऱ्या काळात शस्त्र उचलावीच लागणार आहेत,’ ‘शेर बनने की प्रक्रिया यहाँ से शुरू होती है…’ या पद्धतीने दुर्गावाहिनीची हजारो शिबीरं घेण्यात येतात आणि अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना हिंदू धर्माच्या रक्षणाचे आणि इतर धर्मांच्या कटुतेचे प्रशिक्षण दिले जाते. ‘स्त्री-पुरुष समानता राज्यघटनेने दिली परंतु निसर्गाने दिलेला दुबळेपणा लपवता येतो का?’ असे अशास्त्रीय, फालतू प्रश्न याच शिबिरांमध्ये अपर्णा तिर्थीकर या बाई विचारतात. या शिबिराची नेता असलेल्या प्राचीला तिच्या वडिलांनी मुलगी असून वाढवलं हेच मोठे उपकार आहेत असं वाटतं. विश्व हिंदू परिषदेमध्ये आयुष्य झोकून द्यावं असं तीला वाटत पण यासाठी वडिलांचा विरोध आहे असं ती निराश होऊन सांगताना दिसते. मुलीने लग्न करावं, संसार करावा हे वडिलांचे मत. या माहितीपटाचा शेवट हा दुर्गावाहिनीच्या शिबिरांती काढलेल्या एका मोर्चा-मिरवणुकीत दाखवला आहे. हातात बंदुका घेऊन चाललेल्या मुली, ‘दुध मांगो तो खीर देंगे, काश्मीर मांगो तो चीर देंगे’ यांसारख्या हिंसक घोषणा देत असतात. माहितीपटात दाखवलेल्या या मोर्चातून किशोरवयीन मेंदूमध्ये हिंदू धर्माच्या संवर्धनासाठी पेरलेली समज दिसून येते. हेच भयानक चित्र आता स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या पुण्यातही दिसत आहे.

सौंदर्यस्पर्धेत टिकण्यसाठी चेहऱ्याचे तीन भाग पाडून, त्याचे मोजमाप घेऊन या मापात जर ०.१ मिमी. ची पण तफावत दिसली तर ऑपरेशन करून ती अडजेस्ट करावी लागते, कारण या आधुनिक जगात स्त्रियांकडे सौंदर्याशिवाय दुसरं काही नाही. सौंदर्यस्पर्धेमध्ये पाहिलं येणं हे अंतिम ध्येय मानणाऱ्या अनेक जणी या माहितीपटात दिसतात. सौंदर्याचा एक साचा तयार करून त्यामध्ये स्त्रियांना बसवण्यासाठी केलेले किळसवाणे प्रकार हे हादरून टाकणारे आहेत. माहितीपटाचा शेवट माझ्यासाठी आनंदी होता, कारण दोघीही त्यांच्या ध्येयात अयशस्वी ठरतात. पण या निमित्ताने समाजातील स्त्री स्वातंत्र्याविषयीचे संकुचित विचार आणि त्यात भरडल्या जाणाऱ्या तरुणींचे वास्तव समोर आले.

 

Comments are closed.