ती सध्या काय करतेय?

0 930
हे पत्र कुणाला लिहितोय माहित नाही. तरी लिहिणार आहे. सगळीच पत्रं पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्रं लिहून सुद्धा आपल्यापाशीच जपून ठेवायची असतात. दडवून ठेवलेल्या नोटा एका रात्रीत कागदाच्या तुकड्या सारख्या होऊन जातात. पण तिच्याबद्दल लिहिलेला कागदाचा तुकडा सुद्धा नेहमीच लाखमोलाचा असतो.
गुलजारच्या ओळी आहेत ना..
लिखते रहें हैं तुम्हें रोजही मगर
ख्वाहीशों के खत कभी भेजेही नहीं.
तिला कधीच मनातलं काही सांगू शकलो नाही. कधी वाटायचं कविता लिहावी एखादी तिच्यावर. पण सुचली नाही एकदाही. कदाचित काळजात खूप टोचत असावं ते सहजासहजी सुचत नसावं.
ती दारात ओट्यावर आरसा ठेवून वेणी घालायची. रिबीनची गाठ मारायची तेंव्हा आपण रिबीन असतो तर असं वाटून जायचं. ती हलकेच टाकून द्यायची केसांचा गुंता. त्या हवेत उडणाऱ्या गुंत्याचा पाठलाग करावा असं वाटायचं. एवढे तिचे केस सुंदर होते. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. शाळेत सुद्धा गुरुजींनी प्रश्न विचारला की काजवे चमकावेत तसे तिचे डोळे चमकायचे. चुटकीसरशी फळ्यावर गणित सोडवायची. ती गणित सोडवण्याच्या निमित्ताने समोर उभी राहील म्हणून सुद्धा बऱ्याचदा आम्ही गुरुजीना मला उत्तर येत नाही असं सांगायचो.
ती हुशार होती. पण बाकीच्या हुशार मुलींसारखी नव्हती. शाळेत असताना हुशार मुली नाकतोड्यासारख्या वाटायच्या. पण ती प्रेमळ होती. एकदा शाळेत जात असताना वाटेत तिला झाडाच्या चिंचा दिल्या होत्या. तर शाळेतून परत येताना तिनी भूगोलाची वही दिली. म्हणाली उद्या पूर्ण करून दे. तू शाळेत काही लिहीतच नाही. रात्रभर ती वही धरून बसलो होतो समोर. एवढ सुंदर अक्षर होतं शंभर वेळा तरी वाचून काढली भूगोलाची वही. त्यावर्षी मी गुरुजीला सुद्धा भूगोल शिकवू शकलो असतो एवढा पाठ झाला होता.
एकदा गहू निवडताना एक खडाच तोंडात टाकला होता तिनी. आणि नेमकं मी बघितलं. काय लाजली होती. तिचं हे सिक्रेट मी आजपर्यंत जपून ठेवलं होतं. उन्हाळ्यात वावटळ आली आणि तिच्या दारातले वाळत घातलेले पापड उडून गेले तेंव्हा आम्ही दोघं मागं मागं पळालो होतो. पापडाच्या. कसलं भारी वाटलं होतं. गोल गोल फिरत जाणारी वावटळ. डोळ्यात जाणारा पालापाचोळा आणि बेभान होऊन धावणारे आम्ही दोघं. दम लागल्यावर थांबलो तेंव्हा तिचे केस पार विस्कटून गेले होते. लिंबाचं पिवळ झालेलं पान तिच्या गालाला चिटकून बसलं होतं. आमच्या गोष्टीतलं तेवढं एकच पान आता शिल्लक आहे. माझ्याजवळ आहे.
तशा फार भेटी झाल्या नाही. घराजवळ रहायची म्हणून दिसायची फक्त. कधी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाताना. कधी दळणाचा डबा नेताना. एकदा लाईट गेली होती तिच्या घरची. बल्ब बदलायला मला बोलवून घेतलं. मी बल्ब लावला आणि तिच्याकड बघितलं. किती घाबरली होती. काळजी वाटत होती तिला. तिला मी बावळट वाटत होतो म्हणून का तिला मी आवडत होतो म्हणून ते काही कळल नाही. आणि तिला काही विचारायची सोयच नव्हती. माझ्यासारखा पन्नास टक्के मिळवणारा मुलगा तिच्यासारख्या नव्वद टक्के मिळवणाऱ्या मुलीला काय विचारणार ? फार फार तर गणितातली शंका विचारू शकतो असं वाटायचं मला. आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच येत नसणार याची खात्री होती. कारण दिवसभर कामं असायची घरात तिला. त्यात नववीचं वर्ष. पुढच्या वर्षी दहावी. सारखी पुस्तकात डोकं खुपसून बसायची. तिला ओट्यावर अभ्यास करताना बघून आई सारखं म्हणायची तिच्याकड बघ जरा. आता आईला काय माहित मी तिच्याकडेच बघतो सारखं.
तिला कुणी विचारलं की ती सांगायची मला डॉक्टर व्हायचंय. आणि आमच्या गुरुजीना पण वाटायचं की ती नक्की डॉक्टर होणार. तिचा बाप पण म्हणायचा माझी लेक डॉक्टर होऊन आली की ​बॅड  लावून मिरवणूक काढीन. मला वाटायचं ही डॉक्टर झाली तर आपलं कसं होणार? पुढे पुढे तिचं हुशार असणं एवढ मनावर बिंबवल गेलं की प्रेम वाटण्यापेक्षा आदरच वाटत गेला तिचा. आपल्या वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी. एवढच डोक्यात राहिलं. गुंड मुलगा आणि हुशार मुलगी यांच्या कुणी नादी लागत नाही. तसं काहीसं. असो.
दरवर्षी प्रमाणे उस तोडणीचा हंगाम आला. यावर्षीपण तिचे आई वडील उस तोडायला जाणार. आजी आणि तीच असायचे घरी. नेमकं त्यावर्षी आजी वारली तिची. नववीतली पोरगी एकटी कशी सोडून जायचं? आणि परक्या गावात तरी कसं न्यायचं? तिथं आधीच बारा गावचे लोक. काय करायचं?

अचानक एक दिवस…

बॅड चा आवाज यायला लागला. तिच्याच दारात. नववीतच लग्न झालं तिचं. तिला दहावीची परीक्षा द्यायची होती. पण नवरदेव दहावी नापास होता म्हणून घरचे नाही म्हणाले. तिला शेवटचं बघितलं ते हळदीत. शाळेच्या फ्रॉक मध्ये पाहायचो. साडीत बघून हैराण झालो. खूप दूरची कुणीतरी वाटली. ओळख नसलेली.

नंतर कधी एखाद्या डॉक्टरकडे गेलो की आठवतं, तिला पण डॉक्टर व्हायचं होतं. आता दोन लेकरं घेऊन फिरतेय? का कुणाच्या शेतात काम करतेय? कधी वावटळ आली की प्रश्न पडतो, ती सध्या काय करतेय?
लेखन : अरविंद जगताप
संदर्भ : हे पत्र ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील कार्यक्रमात वाचण्यात आले होते.
Image courtacy: http://populationgrowth.org/wedding-busters-betting-on-child-marriage-free-zones/#!prettyPhoto

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.