जगभरातील गृहिणींच्या कामाची किंमत ७००,०००,०००,०००,००० रुपयांहून अधिक

881

गृहिणींच्या कामाची किंमत

‘तुला नाही कळणार माझ्या कामाची किंमत’ हे वाक्य प्रत्येकाने कधी ना कधी गृहिणी असणाऱ्या आपल्या आईकडून ऐकलेच असेल. मात्र आता जगप्रसिद्ध ‘ऑक्सफॉम’ या संस्थेने गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिलांचे काम किती मोलाचे आहे यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. जगभरामध्ये गृहिणी म्हणून काम करत आपल्या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या स्त्रीयांच्या कामाचे मुल्य दहा ट्रिलियन डॉलर म्हणजेच ७००,०००,०००,०००,००० रुपये इतके आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास ही रक्कम जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅपल कंपनीच्या उत्पन्नाच्या ४३ पट आहे.

भारतामध्ये गृहिणी म्हणून काम करुन आपल्या मुलांचा संभाळ करणाऱ्या महिलांच्या कामाचे मुल्य हे देशाच्या जीडीपीच्या ३.१ टक्के इतके आहे. भारतामधील शहरी भागांमधील गृहिणींची रोजची ३१२ मिनिटे म्हणजेच पाच तास १२ मिनिटे घरकाम आणि मुलांना संभाळण्यात जातात. तर ग्रामीण भागात हाच कालावधी दिवसाला २९१ मिनिट म्हणजेच चार तास ५१ मिनिटे इतका आहे. या उलट शहरी भागातील पुरुष घरातील कामांमध्ये दिवसातील २९ मिनिटे घालवतो तर ग्रामीण भागातील पुरुष ३१ मिनिटे वेळ घरकामासाठी देतात.

‘वर्ल्ड इकनॉमिक फोरम’च्या वार्षिक बैठकीमध्ये ‘ऑक्सफॉम’ने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये महिला आणि पुरुषांमधील आर्थिक दरी वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भारतामध्ये महिला आणि पुरुषांमधील आर्थिक दरी मोठी असून देशामध्ये आर्थिक मोबदल्याशिवाय काम करणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही केवळ नऊ महिलांचा समावेश आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो. भारतामध्ये स्त्री-पुरुषांच्या पगारामधील अंतर हे ३४ टक्के असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. महिलांना कमी पगारात काम करावे लागत असल्याने घरातील कामांची जबाबदारी महिलेचीच असल्याचे भारतामध्ये मानले जाते असंही या अहवालात म्हटले आहे. जात, आर्थिक स्तर, धर्म, वयावरुनही महिलांशी भारतामध्ये दुजाभाव केला जातो.

आर्थिक कमाईमधील अंतरानुसार भारत जागतिक स्तरावर १०८ व्या क्रमांकावर असल्याचे ‘ऑक्सफॉम’चा अहवाल सांगतो. शेजराच्या चीन आणि बांगलादेशही या यादीमध्ये भारतापेक्षा वरचढ आहेत. भारतामध्ये महिलांविरुद्धाच्या अन्यायाबद्दल अनेक कायदे आहेत मात्र त्या कायदे अधिक प्रभावीपणे अंमलात आणले जात नाही. महिलांबद्दलच्या अत्याचारांमध्ये कायद्याची उदासिनता असण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतामध्ये आजही पितृसत्ताक कुटुंब पद्धती असल्याचे हा अहवाल सांगतो.

२०१३ साली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दलचा कायदा संमत करण्यात आला मात्र त्यानंतर या वर्षी #MeToo मोहिमेमुळे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडल्यानंतर कायदे केवळ कागदावरच असतात हे भीषण वास्तव समोर आल्याचे ‘ऑक्सफॉम’चे म्हणणे आहे.

भारतामधील अनेक क्षेत्रांमध्ये महिला मोठ्या कंपन्यांमध्ये काम न करता अनैपचारिक पद्धतीच्या लहान क्षेत्रातील कंपन्या, संस्थांमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांचा लैंगिक छळ होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा लैंगिक छळाला कंटाळून महिला काम सोडून देतात नाहीतर अत्याचार सहन करत त्याच ठिकाणी काम करतात.

बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमधील एक हजार घरांमध्ये ‘ऑक्सफॉम’ने एक सर्वेक्षण घेतले. यापैकी ५३ टक्के घरांमधील सदस्यांनी घरकामामध्ये किंवा मुलांचे संगोपन करताना महिला चुकल्यास तिला कठोर शब्दांमध्ये सुनावले गेले पाहिजे असे मत नोंदवले. तर ३३ टक्के जणांनी महिलेची चूक असल्यास तिला शारिरिक मारहाण करणेही चुकीचे नसल्याचे मत नोंदवले आहे. तर लहान मुलांना तसेच घरातील आजारी व्यक्तीला एकटं सोडणाऱ्या महिलेला सुनावणे गरजेचे असल्याचे मत ६० टक्के लोकांनी व्यक्त केले तर ३६ टक्के लोकांनी यासाठी महिलेला झालेली मारहाणही समर्थनीय असल्याचे मत नोंदवले.

बातमीचा स्रोत : https://www.loksatta.com/desh-videsh-news/unpaid-work-by-women-worth-43-times-apple-s-annual-turnover-oxfam-1827003/

Comments are closed.