वटपौर्णिमा

788

वटपौर्णिमा हे व्रत देशभरात फार मोठ्या प्रमाणावर साजरं केलं जातं. सत्यवान आणि सावित्रीची कथा पतिव्रता स्त्रीची, आपल्या पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या आदर्श स्त्रीची कहाणी म्हणून सांगितली जाते. आपल्या पतीच्या आणि लेकरांच्या कल्याणासाठी स्त्रियांनी हे व्रत करावे अशी रीत आहे. पुरुषप्रधान संस्कृती टिकवण्याचे हे व्रत म्हणजे एक प्रभावी साधन आहे. या व्रतामागची कहाणी आणि अर्थ समजून घेतानाच ते करण्यात काही तथ्य आहे का हेही समजून घेऊ या. अश्वपती राजाला बरीच वर्षे मूल झालं नाही म्हणून त्याने १८  वर्षं सावित्री देवीची उपासना केली. त्यानंतर देवीने त्याला मुलगी होईल असा वर दिला. खरं तर राजाला १०० पुत्र हवे होते. पण मिळाले आहे त्यात समाधान मानावे असा उपदेश सावित्री देवीने केला. कालांतराने त्याला अतिशय सुस्वरूप आणि बुद्धिमान मुलगी झाली. ती अकरा वर्षाची झाली तरी तिचे लग्न जमले नव्हते. तेव्हा नारदमुनींनी राजाला विचारणा केली आणि राजाने अखेर सावित्रीला आपल्या पसंतीचा वर शोधायला पाठवले. देशोदेशी फिरल्यानंतर सावित्रीने शाल्व देशाच्या राज्य हिरावले गेलेल्या द्युत्सेन राजाच्या एकुलत्या एक मुलाला – सत्यवानाला – वर म्हणून निवडले. इथेही नारदमुनी आले आणि त्यांनी भविष्यवाणी केली की बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच सावित्री १२ वर्षाची झाल्यावर सत्यवान मरण पावेल. यानंतर सावित्री उंची दागदागिने, वस्त्रं सोडून वल्कले नेसून वनामध्ये राहू लागली. बरोबर एक वर्ष पूर्ण होण्याअगोदर सावित्रीने तीन दिवस उभे राहून उपास केला. चौथ्या दिवशी सत्यवानाबरोबर ती वनात गेली आणि यम सत्यवानाचे प्राण घ्यायला आला. यमाच्या मागे सावित्री जात राहिली. यमाने तिची चिकाटी पाहून तिला वर मागायला सांगितला. यावर तिने आधी आपल्या पित्याला म्हणजेच अश्वपतीला १०० पुत्र मागितले. त्यानंतर दुसरा वर मागून आपल्या सासऱ्याची दृष्टी आणि गेलेले राज्य परत मिळवले आणि शेवट तिसरा वर मागितला की मला १०० पुत्र दे.. पतीशिवाय पुत्र कसे मिळणार यामुळे यमाने सत्यवानाचे प्राण परत दिले आणि सावित्री त्याच्यासोबत परत आली. अशा रीतीने तिने नवऱ्याचे प्राण वाचवलेच आणि आपलं माहेर आणि सासर दोघांचा उद्धार केला. म्हणूनती आदर्श. या कहाणीची आणि व्रताची अनेक रुपं आपल्याला देशभर दिसून येतात. स्त्रीची पाळी चालू असेल किंवा ती नुकतीच बाळंत झाली असेल तर तिच्या वतीने ब्राह्मणाने हे व्रत केलेले चालते. तर काही ठिकाणी वडाला पूजल्यानंतर घरी येऊन सासूच्या पाया पडावे अशी रीत आहे.

पुरुषप्रधान व्यवस्थेचं उदात्तीकरण आणि व्रत वैकल्यांध्ये स्त्रियांना गुंगवून ठेवून त्यांना या व्यवस्थेच्या पाईक बनवण्याचं काम अशी व्रतं करीत आहेत. आपल्यावरील भेदभाव, अन्याय दूर करण्यासाठी स्त्रियांकडे दुसरी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे निदान व्रतं, उपास-तापास करून तरी आपलं खरं तर आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबाचं आयुष्य सुधारेल अशा भाबड्या आशेपायी स्त्रिया ही व्रत-वैकल्यं करत आल्या आहेत. संस्कृतीच्या नावाखाली अशा पुरुषप्रधान रिवाजांचं प्रसारमाध्यमांधून मोठ्या प्रमाणावर उदात्तीकरण होत आहे. आणि त्यातूनही स्त्रिया अशी व्रतं करू लागल्या आहेत. अगदी घटस्फोट झाल्यानंतरही हाच नवरा सात जन्म मिळू दे म्हणून वडाला फेऱ्या घालणाऱ्या स्त्रिया पहायला मिळतात. शहरामध्ये वडाची झाडं नाहीत म्हणून वडाची फांदी घरी आणून पूजा करण्याची पद्धत पडत आहे. इतका या व्रतांचा पगडा आहे. या वटपौर्णिेच्या आधी या व्रताचा अर्थ समजावून घेऊन अशी पुरुषप्रधान संस्कृती जपणारी, आपल्या हातात काही नाही, उपास-तापासातून आपलं भलं होईल ही असहाय्यता वाढवणारी आणि स्त्रीचं अस्तित्व हे तिच्या कुटुंबासाठीच ही मानसिकता जपणारी व्रतं आपण करायची का यावरही निश्चित विचार करू या. तुच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

(संदर्भ सणांचे कूळ उत्सवांचे मूळसुन ओक, साधना प्रकाशन)

साभार: जिव्हाळा एप्रिल – जून २०१२,  अंक ३१, पान १० 

Comments are closed.