‘प्रगत’ देशातील लोकांनाही मुलींच्या व्हर्जिनिटीची चिंता

3,273

लग्नाआधी मुलीचं कौमार्य अबाधित असलं पाहिजे हा अट्टाहास फक्त तथाकथित मागास समाजांमध्ये आढळत नाही. सामाजिक, आर्थिक आणि स्त्रियांच्या प्रगतीच्या अनेक निदर्शकांवर आघाडीवर असणाऱ्या स्वीडनसारख्या देशातही मुलींचं कौमार्य किंवा व्हर्जिनिटी हा पालकांसाठी चिंतेचा विषय आहे. ही चिंता आदिम आहे. मुलीने किंवा स्त्रीने कुणासोबत शरीर संबंध ठेवले आहेत का याची समाजाला इतकी उत्सुकता आणि चिंता आहे की त्यामुळे आपण मुलींच्या खाजगीपणाच्या, निवडीच्या आणि स्वातंत्र्याच्या अधिकारांचं उल्लंघन करतोय याची जराही फिकीर समाजाला आणि त्यामुळे शासनाला नाही. त्यातूनच मग कौमार्य तपासण्यासाठीच्या चाचण्या तयार होतात.  स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे.

इंडिपेडंट या वृत्तसमूहाच्या बातमीनुसार स्वीडनमधले काही डॉक्टर कडव्या  धार्मिक कुटुंबांच्या मागणीनुसार किशोरवयीन आणि तरूण मुलींच्या कौमार्याच्या तपासण्या करत असल्याचं आढळून आलं आहे. अशा तपासण्या बेकायदेशीर आहेत. मात्र कायद्याचं आणि नीतीमत्तेचं, मुलींच्या अधिकारांचं सर्रास उल्लंघन होत आहे.स्टिंग ऑपरेशन पद्धतीने दोन पत्रकार स्त्रिया स्वीडनमधल्या विविध शहरातील डॉक्टरांकडे गेल्या आणि त्यांनी अशा तपासणीची मागणी केली. 17 वर्षाच्या मुलीची भूमिका करणारी पत्रकार अशा तपासणीला नकार देण्याचं नाटक करत होती. स्वीडिश कायद्यानुसार अज्ञान मुलांवर अशा प्रकारचा कोणता दबाव आढळून आला तर डॉक्टरांनी समाज कल्याण किंवा बाल सुरक्षा विभागाला तसं कळवणं बंधनकारक आहे. पण असं काहीही न करता डॉक्टर कौमार्याची तपासणी करायला तयार होत असल्याचं या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळलं. ‘मी अशा शेकडो तपासण्या केल्या आहेत’, असं एक महिला डॉक्टर अभिमानाने सांगतानाही आढळली. कोल्ड फॅक्ट्स या कार्यक्रमाच्या पत्रकारांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं.

यामध्ये एका मुलीने स्वतःची ओळख उघड न करता ही माहिती दिली की ती १३ वर्षांची असताना तिच्या अतिधार्मिक पालकांनी तिच्या नात्यातल्या एका मुलाबरोबर तिचं लग्न ठरवलं आणि ती १५ वर्षांची असताना तिने सेक्स केलं आहे का हे तपासण्यासाठी कौमार्याची तपासणी करायला भाग पाडलं.

अशा प्रकारे मुलींच्या मर्जीविरुद्ध त्यांच्या बेकायदेशीर तपासण्या करणं, त्यांच्या स्वातंत्र्याच्या आणि खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन गंभीर आहे. आणि त्यासाठी मुलीचे पालक, डॉक्टर आणि कौमार्यासारख्या संकल्पनांना अवाजवी महत्त्व देणारी कडवी धार्मिक/सामाजिक मूल्यं जबाबदार आहेत.

बाईची इज्जत, शुचिता, कौमार्य या प्रश्नांचं गारूड कसं कमी करायचं?

साभार – टाइम्स ऑफ इंडिया (16-10-2015, पुणे आवृत्ती)
image – www.ibnlive.com

Comments are closed.