वाजदा– क्रांतीचं एक छोटं पाऊल उचलणाऱ्या मुलीची कथा_निहार सप्रे

0 854

बहुतेक समाज व्यवस्थांमध्ये स्त्रियांवर लादली गेलेली अनंत बंधनं आपल्यासाठी नवीन नाहीत. अनेकदा ही बंधनं जशी व्यवस्थेचा भाग असतात तशीच कधी-कधी त्यांना माता, भगिनी, देवी, जन्मदाती, काळजी घेणारी, सपोर्टर अशा नावांखाली ग्लोरिफायही केलं जातं. काही ठिकाणी अशी बंधनं त्या समाजाच्या प्रथांचाच एक भाग असतात. परंतु आपण जर का त्या बंधनांकडं काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की या सर्व बंधनांच्या, प्रथांच्या मागं एक शक्तिशाली व्यवस्था कार्यरत असते आणि ती व्यवस्था म्हणजे पितृसत्ताक व्यवस्था (Patriarchal system).

अरब देशांमध्ये स्त्रियांवर असणारी बंधनं, त्यांच्यावर होणारे अत्याचार हे आपल्या वाचनात अनेक वेळा येत असतात. मुस्लीम देशांना किंवा तिथल्या समाजव्यवस्थेला मिडियामध्ये कशा प्रकारे आणि काय कारणास्तव पोट्रे केलं जातं त्यामागच्या सोशिओ-पॉलीटिकल कारणांकडं आत्ता जायला नको परंतु जेव्हा अशाच एखाद्या देशातील लोक काही वेगळं सांगू इच्छितात तेव्हा नक्कीच तो देश इतरांच्या तुलनेत standout होतो. पुन्हा एकदा, कोण त्या देशाकडं कशाप्रकारे पाहतं हा मुद्दा वेगळा. पण वास्तविकता हीच आहे की अशा दडपलेल्या समाजव्यवस्थेतूनच एखादीच का होईना पण वेगळा विचार करणारी व्यक्ती समोर येते आणि वेगवेगळ्या माध्यमांतून समाजापुढे आपला विचार मांडते. समाज नेहमीच वेगळा विचार मांडणाऱ्या अशा व्यक्तींना दडपण्याचा प्रयत्न करतो पण तरीही अशा व्यक्ती आपलं काम करत राहतात आणि त्यातून एखाद्या सर्जनशील कलाकृतीला किंवा विचाराला जन्म देतात. असाच विचार मांडणारी एक व्यक्ती म्हणजे २०१२ सालच्या “वाजदा” या पहिल्या संपूर्णपणे सौदी अरेबिया मध्ये बनलेल्या चित्रपटाची जगातील पहिली अरब महिला दिग्दर्शिका हलिफा-अल-मन्सूर. ज्यांना ही गोष्ट माहिती नसेल त्यांना एक महत्वाची गोष्ट इथं सांगावीशी वाटते ती म्हणजे सौदी अरेबिया मध्ये चित्रपट बनवले किंवा पहिले जात नाहीत कारण ते त्यांच्या कायद्याच्या विरोधात आहे. असो.

“वाजदा” ही कथा आहे सौदी अरेबियाची राजधानी ‘रियाध’ मधील एका मध्यमवर्गीय घरात राहणाऱ्या वाजदा या मुलीची. शाळेला जाताना नेहेमी एका दुकानाबाहेर दिसणारी सायकल विकत घेऊन आपला मित्र अब्दुल्लाला रेस मध्ये हरवण्याचं स्वप्न बघणाऱ्या वाजदाला व्यवस्थित माहितीये की, त्यांच्या धार्मिक कायद्यानुसार मुलींना सायकल चालवण्याची परवानगी नाही. पण तरीही स्वभावानंच बंडखोर असणारी वाजदा घरातून परवानगी नसून देखील ती सायकल विकत घेण्यासाठी पैसे स्वतःहून जमा करायचं ठरवते आणि त्या अनुशंगानं येणाऱ्या विविध पात्रांना, वाजदाला फेस कराव्या लागणाऱ्या आव्हानांना, आजूबाजूच्या एकूणच सामाजिक परिस्थितीला समोर ठेवत चित्रपटाची कथा पुढं सरकते.

चित्रपटाची सुरवातच होते मुळी वाजदाच्या अत्यंत कट्टर धार्मिक वातावरण असणाऱ्या शाळेतील सीनपासून जिथे मुलींकडून कुराण वाचून घेतलं जातंय आणि तिथं वाजदाचं लक्ष नाही म्हणून तिची शिक्षिका तिला बाहेर उन्हात उभं राहण्याची शिक्षा देते. तिथून पुढे संपूर्ण चित्रपटात वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांच्या दाबल्या गेलेल्या भावनांचे, त्यांच्यावरील बंधनांचे अनेक संदर्भ सतत येत रहातात. फॅमिली ट्री वर फक्त मुलांची नावं बघून वाजदाचं एका कागदावर स्वतःचं नाव लिहून त्यावर चिकटवणं आणि दुसऱ्या दिवशी तिच्या आईनं ते काढून टाकणं, वाजदाच्या वडिलांचे मित्र घरी आले असताना तिच्या आईनं त्यांच्यासमोर न जाता खोलीच्या बाहेरून जेवण वाढणं, नवऱ्यानं मुलगा हवा यासाठी दुसरं लग्न करू नये म्हणून त्याला इम्प्रेस करण्यासाठी वाजदाच्या आईची एक ग्लॅमरस ड्रेस विकत घेण्याची इच्छा आणि त्यासाठी तिचं पैसे साठवणं, शाळेतील प्राचार्यांकडून मुलींना सतत इस्लाम आणि स्त्रियांच्या नैतिक वागणुकीबद्दल दिली जाणारी शिकवण, परपुरुषाबरोबर मैत्री केल्याबद्दल एका मुलीला झालेली शिक्षा, धार्मिक पोलिसांकडून केली जाणारी धरपकड अशा अनेक संदर्भांमधून आपल्याला वाजदावर असणारी दडपणं दिसत रहातात आणि त्यातून मग वाजदाची सायकल घेण्यासाठी चाललेली धडपड बघून एक प्रेक्षक म्हणून अनाहूतपणे आपण वाजदाला सपोर्ट करू लागतो. शिवाय परिस्थितीची गंभीरता दाखवण्याकरिता दिग्दर्शिकेनं तारांचं कुंपण, शाळेचा बंद होणारा दरवाजा अशा अनेक प्रतीकांचा वापर वेळोवेळी अत्यंत प्रभावीपणे केलेला दिसतो.

खूपदा बाह्यस्वरूपी आधुनिक वेशभूषा किंवा राहणीमान असणाऱ्या, आर्थिक दृष्ट्या सधन असणाऱ्या व्यक्ती आणि समाज  आपल्याला खूप प्रतिगामी वाटण्याची शक्यता असते. वाजदाची आई ही अशी एक स्त्री आहे जी बाह्य स्वरूपी आधुनिक वाटेल, तिचे कपडे भलेही आधुनिक असतील परंतु तिच्या आजूबाजूची परिस्थिती, तिच्या नवऱ्याचा विचार हे जुनाट, प्रतिगामी आहेत. ह्या सर्व गोष्टींना तिनं मनापासून स्वीकारलंय असंही एकवेळ वाटतं. ती घरात अत्यंत फॅशनेबल कपडे घालताना, सिगरेट पिताना दिसते, नवऱ्याला खुश करण्यासाठी ती एक ग्लॅमरस ड्रेस विकत घेण्याचा विचार करते पण संपूर्ण चित्रपटात ती या ना त्या मार्गाने एक दडपलेली व्यक्ती म्हणूनच समोर येत रहाते. तिला बाहेर जाताना संपूर्ण बुरखा घालूनच जावं लागतं, तिला एकटीनं फिरण्याची परवानगी नाही, मुलगा होत नसल्यानं तिच्यावर आरोप केला जातोय आणि तिच्या व तिच्या नवऱ्यामध्ये त्या कारणास्तव तणाव आहे. सासरचे लोक त्याच्याकरिता दुसरी मुलगी बघत आहेत. या सर्व परिस्थितीमुळं ती आतून खूप खचली आहे पण एका बाजूला त्रास होत असूनदेखील दुसऱ्या बाजूला मात्र तिला त्या परिस्थितीमध्ये राहण्याशिवाय गत्यंतर नाही हे आपल्याला जाणवत राहतं.

थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे देखील हीच परिस्थिती आहे. फरक केवळ दडपशाहीच्या स्वरूपामध्ये असतो. आपल्याकडे तर उलट अशा प्रकारच्या दडपशाहीला ग्लोरिफाय केलं जातं आणि स्त्रीला माता, भगिनी, काळजी घेणारी, हळव्या मनाची, देवी इत्यादी रूपात दाखवून त्या अनुशांगनं बंधनं लादली जातात. असो. तर एका बाजूला स्वतःच्या आईची अशा प्रकारे होणारी घुसमट आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक कारणांनी शाळेत घातली जाणारी बंधनं यामध्ये अडकलेली छोटी वाजदा सतत तिच्या सायकल घेण्याच्या ध्येयापर्यंत पोचण्याचा विचार करताना दिसते. ते करताना तिला एक प्रकारची भीती किंवा दडपण आहे हे आपल्याला एक प्रेक्षक म्हणून सतत जाणवत राहतं पण तिच्या नजरेतून चित्रपट बघताना संपूर्ण समाजव्यवस्था, त्यामध्ये होणारी स्त्रियांची घुसमट यावर विचार करायलाही आपण भाग पडतो.

सरतेशेवटी ज्या धार्मिक व्यवस्थेनं वाजदाला सायकल चालवण्यापासून वंचित केलंय त्याच व्यवस्थेचा वापर करून वाजदा सायकलसाठी पैसे जमा करायचं ठरवते. वाजदाच्या शाळेत कुराण वाचण्याची स्पर्धा असते. या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय वाजदा घेते. त्यासाठी ती खूप तयारी करते आणि सरतेशेवटी ती स्पर्धा जिंकते देखील. पण जेव्हा मुख्याध्यापिका तिला विचारतात की ती जिंकलेल्या पैशाचं काय करणार तेव्हा ती निरागसपणे उत्तर देते की ती त्या पैशातून सायकल विकत घेणार. कट्टर धार्मिक असणारी मुख्याध्यापिका तिचं उत्तर ऐकून तिलाच झापते आणि स्वतःच घोषणा करते की ती वाजदाला मिळालेले पैसे पॅलेस्ताईन मधील मुस्लीम बांधवांना डोनेट करते आहे. ते ऐकून वाजदा तुटते, रडते आणि एक प्रेक्षक म्हणून एका बाजूला आपल्याला तिच्याबद्दल सहानुभूतीदेखील वाटू लागते आणि व्यवस्थेबद्दल रागही येतो पण त्याचं वेळी तिची दुःखी आई ती घरी आल्यावर तिला जवळ घेते, तिच्या खऱ्या वागण्याबद्दल तिचं कौतुकही करते आणि ज्या व्यवस्थेच्या त्या दोघी शिकार आहेत त्याबद्दल समजावते देखील. वाजदाला आईकडून समजतं की तिचे वडील दुसरं लग्न करतायत. तेव्हा ती तिच्या आईला दुकानात बघितलेला ड्रेस विकत घेऊन वडिलांना परत आणण्याचा सल्ला देते पण तिच्या आईने ते पैसे खर्च केलेले असतात. तिने वाजदासाठी तिला हवी असलेली सायकल विकत घेतलेली असते. ती वाजदाला एकंच वाक्य बोलते, “जे दुःख, जी दडपशाही माझ्या वाटेला आली, ती मी तुझ्या वाटेला येऊ देणार नाही”.

चित्रपटाच्या शेवटी वाजदा, आधी ठरल्याप्रमाणे अब्दुल्लाबरोबर रेस लावते आणि सर्व मुलांच्या घोळक्यातून वेगानं सायकल चालवत रेस जिंकते आणि ट्रॅफिकनं भरलेल्या एका रस्त्यावर येऊन थांबते जिथे चित्रपट संपतो.

चित्रपट बघताना आपल्याला एक प्रश्न मात्र नक्कीच पडण्याची शक्यता आहे. ‘व्यवस्थेच्या विरोधात न जाता, व्यवस्थेत राहूनच व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करावा असं काही दिग्दर्शिका सुचवू इच्छिते आहे का?’ हा तो प्रश्न. एका इंटरव्यूमध्ये दिग्दर्शिका म्हणली देखील आहे की तिला तिची संस्कृती, समाजव्यवस्था या विरोधात काहीही भाष्य करायचे नाही. तिला तिच्या संस्कृतीबद्दल, धर्माबद्दल आदर आहे. परंतु तसे असूनदेखील तिला त्याच व्यवस्थेत जगणाऱ्या आणि स्वतंत्र बनू इच्छिणाऱ्या मुलीची (जी कदाचित अनेक स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते) आणि तिला ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं त्याची कथा सांगायची आहे. खरंतर हा चित्रपट बनवताना अनुभवलेल्या आव्हानांबद्दल सांगतानादेखील तिने हेच सांगितलं की ती स्वतः जरी एका पुरोगामी घरातून आलेली असली तरी घराबाहेरील जगात जगताना तिला नेहेमीच समाजाच्या चौकटीत बसून जगावं लागलं. चित्रपट बनवताना देखील पुरुषांच्या घोळक्यामध्ये मध्ये एकटीनं राहून काम करता आलं नाहीच. पण म्हणून का ती शांत राहिली? नाही. तर तिनं तिला जे दाखवायचं होतं, जो विचार मांडायचा होता तो जगासमोर ठेवला. कुठंतरी हीच कृती समाजव्यवस्था बदलण्यासाठी उपयोगी ठरू शकते का? याचा विचार आपण सर्वांनी आणि खासकरून व्यवस्थेच्या दडपशाहीत जगणाऱ्या स्त्रियांनी करायला हवा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.