ती सध्या काय करते… श्रद्धा

1,440

‘मी’ वर्ध्याला कॉलेजला असतांना ‘ती’ ची आणि माझी भेट झाली आणि आम्ही मैत्रिणी झालो. खूप जवळची मैत्री. तिच्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ती मला सांगायची आणि मी तिला. तेंव्हा आमच्या कॉलेजचे स्पोर्ट डेज सुरु होते. आमच्या कॉलेजचा कॅम्पस खूप मोठा आहे. खेळ शिकवण्यासाठी आणि स्पर्धा घेण्यासाठी B.Ped. चे विद्यार्थी येत असत. ‘तो’ तिथे व्हॉलिबॉलच्या स्पर्धा घेण्यासाठी आला होता. स्पर्धा सतत तीन दिवस चालणार होत्या. तिथेच तिची आणि त्याची मैत्री झाली. ‘ही’ मैत्री हळूहळू बहरत गेली अन मग एकमेकांचे नंबर घेणं, खेळ संपल्यानंतर भेटणं, फोनवर बोलणं हे सगळं ओघानं आलचं. रोज फिरायला जाणं, माझं नाव घरी सांगून रोज त्याला डबा देणं हे तर नित्य नियमाने चालू होतं आणि अशातच परीक्षा आल्या आणि जशा आल्या तशा त्या संपल्यादेखील…

परीक्षेनंतर तो आपल्या घरी जम्मूला गेला आणि ही सुद्धा तिच्या घरी जळगावला निघून गेली. काही दिवस असेच निघून गेले. दुसऱ्या वर्षी दोघेही परत आले. ते भेटायला लागले. या भेटीत मग कधीकधी त्यांच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडणंही होत होती. अनेक गोष्टी तशा  पूर्वीप्रमाणं नसायच्या परंतू काही दिवसांनी सगळं ठीक झालं. पुन्हा दोघे खूप आनंदात दिसायला लागले अगदी पहिल्यासारखे. फिरायला जाणं, सिनेमे बघायला जाणं, बागेत चकरा हे सगळं पुन्हा एकदा नित्य नियमाने. हवेत पसरलेल्या सुगंधासारखं त्यांचं प्रेम कॉलेजमध्ये सर्वांना माहिती झालं. त्यांना कुणाशी काहीही देणंघेणं नव्हतं अगदी free Bird,  ते आपल्या जीवनात खूप आनंदी होते. असं अशातच दुसरं वर्षही निघून गेलं. अन मागच्या वर्षीप्रमाणं तो पुन्हा जम्मूला परत गेला आणि ती जळगावला…..

ह्या सुट्यांमध्ये मात्र भांडणं बंद झाली ती कायमचीच… कारण तो कायमचा नागपूर सोडून जात होता पुण्याला अन ही नागपूरलाच राहणार होती. तो तिला पुण्याला जाण्याच्या अगोदर भेटायला नागपूरला आला. दोघंही खूप आनंदाने एकमेकांना भेटली. काही वेळ सोबत राहिले. तो दुसऱ्या दिवशी पुण्याला निघुन गेला. ती त्याचं निघून जाणं एकटक पहात राहिली अगदी तो दिसेनासा होईपर्यंत…..

अनेक दिवस असेच निघून गेले. तिला वाटलं येईल तो कदाचित भेटायला परत नाहीतर निदान  फोन तरी करेल. असं भावनाविवश झाल्यावर लोकं करतात ना आजकाल फोन! परंतू ना कधी त्याचा फोन आला ना तो …

ती सध्या काय करते, काय करत असेल? मला माहित नाही…

Comments are closed.