लैंगिकता म्हणजे नक्की काय काय?

3,261

सगळ्यांना असं वाटतं की लैंगिकता म्हणजे लैंगिक संबंध, सेक्स किंवा त्याविषयीचे व्यवहार, वागणं, इत्यादी. पण लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स नाही. आपण आपल्या मनात असणाऱ्या लैंगिक भावना कशा व्यक्त करतो, आपल्या लैंगिक आवडी आणि निवडी, आपले लैंगिक संबंध आणि आपली तत्त्वं हे सगळं आपल्या लैंगिकतेशी संबंधित आहे.

म्हणजे एखाद्या समाजात मुलींनी काय कपडे घालायचे आणि मुलांनी काय कपडे घालायचे याचे काही उघड किंवा छुपे नियम असतात. हे नियम लैंगिकतेशी संबंधित आहेत. आपलं शरीर कसं असावं, कसं दिसावं याचे नियमही लैंगिकतेशीच संबंधित आहेत.

वयात येताना होणारे बदल नक्की काय, तेव्हा वाटणारं आकर्षण, ओढ, आपल्या किंवा भिन्न लिंगाच्या व्यक्तीबाबत वाटणारं प्रेम हेही लैंगिकतेचाच भाग आहे.

कुणी कुणाबरोबर लैंगिक संबंध ठेवायचे, लग्नाशिवाय असे संबंध ठेवता येतात का, त्याला समाजाची मान्यता असते का, किंवा लग्न करताना  जोडीदार कोण असावा याचा निर्णय कोण घेतं या गोष्टी लैंगिकतेशी खूप जवळून संबंधित आहेत.

आपल्या लैंगिक आवडी, भावना, विचार, कल – आपल्याला समलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं का भिन्नलिंगी, आपल्याला लैंगिक आकर्षणच वाटत नसेल तर – अशा अनेक बाबींमधून आपली लैंगिकता व्यक्त होत असते.

लैंगिक छळ, हिंसा, जबरदस्ती, बलात्कार, नकोसे स्पर्श हाही लैंगिकतेचा नकारात्मक किंवा वाईट चेहरा.

त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी लैंगिकतेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित आहेत.

Comments are closed.