प्रश्न, प्रश्न, प्रश्न …..
हैद्राबाद मधील एका मुलीवर बलात्कार होतो आणि फेसबुक, व्हाट्सअप, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया या सर्वच स्तरांवर या गोष्टीच्या निषेधार्थ पोस्ट येऊ लागल्या. अन मला खूप प्रश्न पडायला लागले. आपल्या देशातील लोक किती संवेदनशील आहेत. पेपर किंवा सोशल मीडियावर मुलीचं गुडग्यांमध्ये खुपसलेलं चित्र यायला लागलंय(म्हणजे तिच्यावर झालेल्या कृत्याची तिलाच लाज वाटतेय पण ज्यांना वाटायला पाहिजे त्यांचं काय? असो ). मग आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे कि बलात्कार करतंय कोण? आपले मित्र? नाही नाही ते कसे असू शकतील त्यांनी पण फेसबुकवर निषेधाच्या पोस्ट टाकल्यातन की! काही मित्रांचे तर डीपी पण काळे आहेतच की आणि स्टेटस तर बेटी बचाओ वालेच आहेत. बरं मग नातेवाईक असतील? अरेरे काही काय! फॅमिली ग्रुप वर जाऊन तर कळतंय ना की, मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी मुलींनी कसं राहीलं पाहिजे, काय नेसलं पाहिजे. बरं मग कोण आहेत कोण हे लोक? येतंय का काही लक्षात?
आपण लहानपणापासून चित्रपटांत बघत आलोय की, बरं त्यात बलात्कार कोण करतो तर व्हिलन किंवा त्याचा मुलगा किंवा गर्भश्रींमत बापाचा मुलगा. पण दिल्लीपासून तर हैदराबादपर्यंतचे आरोपी तर वरील उल्लेख केल्याप्रमाणे कोणीच नाहीत. नाही नाही म्हणजे चित्रपटात दाखवतात तस अज्जीबात होत नाही असं मला म्हणायचं नाहीये. पण अगदी अल्पवयीन असलेली ही मुलं, आमच्याच वयाची. जी अगदी सामान्य घरातून आलेली, शिक्षण अपूर्ण, बालवयापासून काम करणारी. यांच्या डोक्यात कुठून येतोय एवढा हिंसक आणि क्रूर विचार? आता यावर काहीजण म्हणतात नीट संस्कार झाले नसलेले लोक असं करतात. पण मग ज्यांना आपण संस्कार म्हणतो त्या तथाकथित ‘संस्कारांची’ ज्यांच्याकडे मक्तेदारी आहे ते सुद्धा बलात्कार सारख्या गुन्हेचे आरोपी आहेतच की! बघा गुगल करुन.
बरं आपल्या देशात कठोर शिक्षा नाहीत (फटके, मृत्युदंड, फाशी, इ.) म्हणून असं होतं आहे असं खूप मोठ्या समूहाचे मत आहे. परंतु आजवर ज्या देशात अशा कठोर शिक्षा आहेत त्या देशात तरी गुन्हे कमी झालेले दिसलेत का? नाहीच ना! असो आपल्या देशात एवढे कायदे असूनही कुठल्या स्वरूपाच्या गुन्हांची संख्या कमी झालीय? आणि अब्रुच्या-इज्जतीच्या भितीने बलात्कारासारखे गुन्हे तर आपल्याकडे समोर येतात तरी किती? आपण चित्रपटात, टीव्ही वर किंवा चित्रपटगृहात बलात्कारासारखी दृष्ये पाहतो. तेव्हा आपल्या हाताच्या मुठी आपोआपच आवळल्या जातात, दात घट्ट दाबले जातात, डोळे पाणावतात. आपल्याला माहिती असते की, समोर चालणारे केवळ नाटक आहे. मग अशा संवेदनशील समाजात जेव्हा हैद्राबाद मधील एका मुलीवर बलात्कार होतो आणि तो कसा झाला? कसा केला? ती मुलगी कशी ओरडली असेल? आणि कसा तिने प्राण सोडला असेल? हे पाहण्यासाठी जेव्हा याच देशातील 80 लाखांहून अधिक लोक त्या पीडित मुलीचे नाव एका पॉर्नसाईट वर का शोधत असतील? तेव्हा दुसरा महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे, आता बलात्कार करणारी आणि बलात्कार कसा झाला याचे कामुक कुतूहल बाळगणारी ही लोक आहेत तरी कोण? फेसबुक वर मोठ्या प्रमाणात आरोपींना जिवंत जाळा अशा प्रतिक्रिया देणारे, आरोपीच्या बहिणीवर बलात्कार करा म्हणजे त्याला त्याची जाणीव होईल किंवा आरोपींवर भरचौकात 100 पुरुषांनी बलात्कार करा व ते टीव्हीवर लाईव्ह दाखवा असं म्हणणारी ही लोकं आहेत तरी कोण? आपले मित्र, नातेवाईक की आपली मुलं? नोकरदार, सहकारी, आपला शेजारी कि आपण स्वतः?
आता मुळ विषय हा आहे कि, बलात्कार का केला जातो? लैंगिक सुख हे नेहमी दोघांच्या मर्जीने घडणारी एक सुंदर नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे लैंगिक सुखाचा (sexual pleasure) परमोच्च क्षण (orgasam) गाठण्याचा प्रयत्न केला जातो. हे आपल्या समाजात किती लोकांना माहित आहे हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. असो! तर बलात्कार फक्त कामुक भावना पूर्ण करण्यासाठीच केला जात नसतो. तर बलात्कारात केवळ हिंसा, राग आणि क्रूरताच असते. अन पुढचा प्रश्न हा की, या अल्पवयीन मुलांपर्यंत ही विकृती पोहोचवली कुणी? आणि इतक्या सहज ते हे पाऊल कस उचलू लागलेत? तर त्याचं उत्तर एकच आहे या देशातील “पुरुषसत्तेने”. या पितृसत्तेने (patriarchy) समाजात काही प्रतिमा (images) तयार केल्या आहेत. त्यातील एक पुरुषांची प्रतिमा आणि दुसरी स्त्रियांची, अन यात एकाला नेहमी भोगवस्तू दाखवले तर एकाला भोगकर्ता. पुरुष नेहमी श्रेष्ठ अन बाईसह बाकीचे त्याच्यापेक्षा कनिष्ठ, कमी.
लैंगिकता (sexuality) हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. हे अजुनही पूर्णपणे मान्य करायला कुणी तयार नाही. ज्या गोष्टीबद्दल बोलणं घाण, वाईट, चुकीचं समजलं गेलं. आता त्याच अज्ञानामुळे बलात्कार, बळजबरी आणि छेडछाड सारख्या घटना वाढताना आपण पाहत असताना, आतातरी यावर उपाय म्हणून लैंगिक विषयावर खुलेपणानं – मोकळेपणानं घरा-घरात, शाळांमध्ये, रस्त्यावर, बागेत, अन सगळीकडे चर्चा होणं गरजेचं वाटतंय की नाही? लैंगिकतेवर प्रश्न विचारण्यासाठी मोकळे वातावरण तयार होणं गरजेचं वाटतंय की नाही? आम्हाला असा समाज हवाय, तुम्हाला?
- नितीन पाटील (nitindevidasp@gmail.com)
- चित्र साभार : https://www.news18.com/news/india/6-men-gang-rape-up-woman-with-her-kin-tied-to-tree-film-act-and-post-video-online-2371719.html