उंडारण्याचा हक्क!

0 757

‘मुलींनी सातच्या आत घरात यावं, उगा इकडे तिकडे भटकत बसू नये’, ‘काम झालं की मुकाट्याने घरात येऊन बसावं, रात्री भटकायची गरजच काय…’

मुली आणि स्त्रियांच्या किती तरी पिढ्यांनी ही अशी विधानं येता जाता ऐकली आहेत. अर्थात हे सगळ्याच मुली आणि स्त्रियांसाठी नाही कारण अनेकींना घराबाहेर पडून काम करावंच लागतं, आपलं आणि आपल्या घरादाराचं पोट भरावंच लागतं. पण तशी काही गरज नसेल तर मात्र मुलींनी आणि स्त्रियांनी घराची पायरी ओलांडू नये अशीच अपेक्षा समाजाने आतापर्यंत ठेवली आहे. नोकरीवरून घाईघाईने येणारी, हातात भाजीची पिशवी असणारी, लगबग करत जाणारी स्त्री चालते; मात्र रस्त्यावर टाइमपास करणारी, अळमटळम करत भटकणारी थोडक्यात उंडारणारी मुलगी किंवा स्त्री मात्र आजही समाजाच्या नजरेत खुपते. ‘स्त्रीचं जग घराच्या चार भिंतींच्या आत असतं त्यामुळे तिचं बाहेर काय काम?’ ही विचारसरणी आजही कळत किंवा नकळत आपल्या मनात बिंबलेली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पुरुषाचा गुन्हा न पाहता ‘ती मुलगी एवढ्या रात्री रस्त्यात काय करत होती’ किंवा ‘कशाला विषाची परीक्षा पहायची’ असे अजब प्रश्नही विचारले जातात. कारण तेच, स्त्रियांनी उगाच भटकू नये.

अगदी हेच करण्याचा हक्क आता अनेक स्त्रिया आणि मुली गाजवत आहेत. आणि तेही अनेक ठिकाणच्या, देशाची सीमा ओलांडत एकत्र येत या सगळ्या जणी सांगत आहेत की आम्हालाही भटकण्याचा, उंडारण्याचा हक्क आहे. मुंबईमध्ये WhyLoiter (http://whyloiter.blogspot.in/) (व्हाय लॉयटर – कशासाठी भटकायचं) नावाचं अनोखं अभियान सगळ्या मुली आणि स्त्रियांना सांगतंय की रस्ते, सार्वजनिक जागा, उद्यानं, मैदानं, रात्र-अपरात्र हे आता आपण काबीज करायला पाहिजे, आणि मनसोक्त उंडारायला पाहिजे. तिकडे कराचीमध्ये ‘गर्ल्स@धाबाज’ (http://girlsatdhabas.tumblr.com) नावाचा गट धाब्यावर, चहाच्या टपरीवर एकत्र जमून सार्वजनिक जागा पुन्हा काबीज करण्यात मग्न आहे. फियरलेस कलेक्टिव्ह (http://fearlesscollective.tumblr.com/) नावाचा कलावंतांचा गट भारतात विविध ठिकाणी रस्ते, भिंती रंगवून लिंगभेद आणि लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलण्याचं आव्हान करत आहे.

तर नव्या वर्षात घराची चौकट ओलांंडून उंडारूया. भटकूया. जगूया.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.