लैंगिक शिवीगाळ, शेरेबाजी व राजकारण

1,806

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या वेबसाईटवर आपण लैंगिक शिवीगाळ व शेरेबाजी सहन करायची असेल तरच महिलांनी राजकारणात यावे, अन्यथा नाही हा पोल प्रकाशित केला होता.

लैंगिक शिवीगाळ व शेरेबाजी सहन करायची असेल तरच महिलांनी राजकारणात यावे, अन्यथा नाही

  • सहमत (58%, 247 Votes)
  • असहमत (33%, 141 Votes)
  • माहित नाही (9%, 39 Votes)

Total Voters: 427

Loading ... Loading ...

आपल्या वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून ३३% वाचक असहमत आहेत. तर ५८% वाचक या वाक्याशी सहमत आहेत. याचा अर्थ महिलांनी राजकारणात यायचं असेल तर लैंगिक शिवीगाळ व शेरेबाजी सहन करायला पाहिजे असाच कल आपल्या अनेक वाचकांचाही दिसतो आहे. आपल्या देशातील राजकारण्यांचीही अशीच मानसिकता आहे तेव्हा आपल्यापैकी ब-याच लोकांची मानसिकता अशाच प्रकारची बनलेली असली तर त्यात नवल ते काय. पक्ष कोणताही असो, विचारधारा काहीही असो समोर उभी असणारी व्यक्ती प्रतिद्वंद्वी आहे या पेक्षा ती स्त्री आहे याच नजरेतून तिच्या विरोधात प्रचार केला जाताना आपण पाहत असतो.

मुळात भारतीय परंपरेत स्त्रीच्या चारित्र्याला ‘पावित्र्याचं‘ लेबल लावून ठेवल्यामुळे समोरच्या स्त्रीवर अश्लाघ्य टीका केल्यास ती तिथेच अर्धमेली होऊन जाते. स्त्री उमेदवाराविरोधात बोलताना तिच्या कामांवर, जनसंपर्कावर, तिच्या समजदारीवर न बोलता तिच्या कपड्यांवर, तिच्या रंगावर, तिच्या दिसण्यावर टिप्पणी करत जिभेला सैल सोडणं फार सोपं आणि हक्काचं वाटतं. आपलं राजकारण आता-आता रसातळाला जाताना दिसत असलं तरी आपलं समाजकारण बऱ्याच वर्षांपासून बाईसाठी तळातच आहे. तिच्या उघड्या शरीरावर तिचं चारित्र्य मोजण्याची इथे परंपरा आहे. स्त्रीचं अस्तित्वच पुरुषी मानसिकतेला मान्य नाही, तिचा मान सन्मान तर दूरची गोष्ट आहे.

निवडणुक रिंगणात वावरणा-या पुरूषाला पंचारती ओवाळण्यापासून ते त्याच्या पाठीमागे खंबीरतेने उभं राहून त्याला पक्षीय पातळीवर सरसकट मदत करण्यापर्यंत महिलांचा प्रवास दिसून येतो, अगदी आतापर्यंत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थातून पन्नास टक्के आरक्षण मिळेपर्यंत ती बहुतांश या भुमिकेतून राजकारणात वावरत होती. राजकीय पक्षाच्या महिला आघाडीतील तिची संख्या लक्षणीय होती व आहे, पण तिचे राजकीय भान या व्यवस्थेने कधीच मान्य केले नाही. आरक्षणाने शहरी व ग्रामीण भागातील महिलांची पदावर विराजमान होण्याची संख्या लक्षणीय सुधारली पण पदावर बसली म्हणजे तिच्यातील राजकीयपणावर शिक्कामोर्तब झाले असे नाही. जरी संधी मिळाली तरी तिला रबरी शिक्क्यांसारखं वापरुन सगळा कारभार पुरुषच (सरपंचपती वा नगरसेवकपती….) करतात हे उघड गुपित आहेच. म्हणजेच तिला आरक्षणामुळे मिळालेल्या त्या संधीतून ती करत असलेल्या कामाला सहकार्य व मान्यता ही अखेर त्या त्या भागातील प्रस्थापित व्यवस्था ठरविते जी पुरुषांनीच प्रस्थापित केलेली असते. याला दुसरे नाव घराणेशाही सुध्दा मिळु शकते पण आपण ती सकारात्मकतेने घ्यायला हवी. किमान त्यामुळे तरी महिला केवळ पुरूषाला ओवाळणे व त्याच्या मागे उभे राहण्याच्या भुमिकेतून बाहेर येऊ शकली.

आपल्या समाजात असणारी पितृसत्ता राजकारणातही स्वत:चं अस्तित्व दाखवतेच. एकीकडे स्त्रिया सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत म्हणत स्त्री पुरुष समानतेचा नारा द्यायचा आणि स्त्रीला दुय्यम लेखणारी मानसिकता जोपासायची. अशा प्रकारच्या वागण्यातून अनेक पुरुष स्त्रीच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल असुरक्षित झाले असून, तिचे खच्चीकरण करण्यासाठी हा मार्ग वापरतात. पुरूषप्रधान संस्कृती, पुरूषी अहंकार व महिलांकडे पाहण्याची मानसिकता या अतिशय टोकदारपणाने जाणवण्या-या काटेरी मार्गावरून चालताना महिलांची दमछाक होते, प्रस्थापित व्यवस्थेशी तडजोडीचा मार्ग अनेकदा या महिलांना पुढे जाण्यापासून रोखतो. मुळात कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, लिंग यांसारख्या प्रत्यक्षदर्शी काहीही संबंध नसणाऱ्या गोष्टींचा आधार देऊन कमी लेखणं, दुय्यम लेखणं चूकच आहे.

राजकारण हे एक उदाहरण झालं पण एकूणच सर्व क्षेत्रांत आजवर मक्तेदारी कुणाची आहे? आजपर्यंत सर्व प्रकारच्या सत्तेच्या केंद्र स्थानी कोण आहे? पुरुषच ना! ज्यांना आजपर्यंत दुय्यम, कनिष्ठ ठेवलं गेलं, ज्यांना सत्तेत वाटा दिलाच गेला नाही, त्यांच्यासाठी सत्ता सोडणं किंवा सत्तेचे हस्तांतरण करणं खरंच पुरुषांसाठी सोपं असू शकतं? या सगळ्याची उत्तरं आपल्याला माहित आहेतच फक्त त्यामागचे राजकारण कोण करतंय अन का करतंय याचा विचार आपण तरुण म्हणून करणार की नाही हाच सवाल आहे.

या देशाचे भावी नागरिक म्हणून याकडं तुम्ही कसं पाहता, तुम्हाला काय वाटतं आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा. आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहू

लेखन व संपादन : अमोल नि ता

संदर्भ :

Comments are closed.