कोवळं प्रेम

2 1,077

प्राजक्ता सहावीत होती. अभ्यासाचं फार वेड. मैत्रिणी मोजक्याच. शाळेतून घरी गेल्या गेल्या लगेच दप्तर काढून बसायची सवय. असंच एक दिवस घरी गेल्यावर तिनं कुठली तरी गृहपाठाची वही हातात घेतली. ती वही ज्या पानावर उघडली गेली तिथं एक चिट्ठी होती. साहजिकच तिनं ती उघडली आणि वाचली… “मी तुझ्यावर प्रेम करतो. तू करत असशील तर सांग चिठ्ठीतून – तुझा दिनेश.” शेजारी बदाम आणि त्यात दोन बाण! ज्याचा अर्थ प्राजक्ताला तेव्हा तर कळाला नव्हताच पण पुढे कळायलाही काही वर्ष गेली. चिठ्ठी वाचल्यावर ते काहीतरी वेगळं आहे पण नक्की काय ते अंधूकसंही कळालं नव्हतं. तिला शाळेतलं ‘ए टू झेड’ आईला सांगायची सवय आणि भारी हौस! तिनं ती चिठ्ठीसुद्धा आईला दाखवली. काही झालं तरी ते वाचून आईच्या मनात कुठंतरी ‘धस्स’ झालं असेलच. पण घरातील बाकी ‘काका’ मंडळींनी मात्र त्या चिठ्ठीची हसून मजा घेतली. प्राजक्ताला मात्र काही कळत नव्हतं. हा दिनेश कोण..? वर्गात तर या नावाचं कुणीच नव्हतं. कुणाचाही चेहरा समोर येत नव्हता. मग नुकतंच काही तरी घडलेलं आठवायला लागलं.

हल्ली कुणीतरी आपल्याकडं बघतं, आपल्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतं. कधी मध्ये आपणही इम्प्रेस होतो. काय हिरोगिरी करतो तो? ‘हिरो’ च आहे तो गोट्या..! पण हा चिट्ठीतला दिनेश म्हणजेच गोट्या! हे कळायला उशीरच झाला. तो सातवीत. सहावीचा आणि सातवीचा वर्ग समोरासमोर. मधली सुट्टी झाली की प्राजक्ता तिच्या वर्गातून बाहेर पडायच्या आत तिला पाहण्यासाठी भिंतीला लावलेल्या पोस्टरसारखा हा उभाच असायचा!

आता हा हिरो कोण ते बघायला, नव्हे ‘त्याच्याकडं बघायला’ दुसऱ्याच दिवशी शाळेत तीन गाड्यांवर सहा माणसं हजर! त्यात प्राजक्ताची आई पण… त्या गोट्याला “काका” मंडळींपैकी एकानं असं काही ओढलं की त्याच्या शर्टाचं बटण तुटतं नं तुटतं तोवर गालावर एक जोरात चपराक बसली. चिठ्ठी लिहिणारा गोट्या, चिठ्ठी प्राजक्ताच्या गृहपाठाच्या वहीत ठेवण्याचं धाडस करणारा दुसराच आणि त्या दोघांना सामील असणारा तिसरा असा तिघांचा ग्रुप होता. ज्यानं चिठ्ठी वहीत ठेवली त्याचं आडनाव योगायोगानं वाल्मिकी होतं. हे समजताच प्राजक्ताच्या मातोश्रींच्या तोंडातून शब्दांचा वर्षाव झाला – ‘वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि तू बदाम काढतोस?’ प्राजक्ता आणि तिची मैत्रीण तर पुरत्या घाबरल्या होत्या.

या सर्व ‘रामायणाचा’ शेवट म्हणजे, त्या तिघा ‘हिरोंना’ शाळेतून काढून टाकलं. त्यांच्या पालकांशी काहीही न बोलताच तडकाफडकी घेतलेला निर्णय होता तो.. गोट्याचं किशोरवयातलं प्रेम एकही मास्तर समजू शकले नव्हते.

आता प्राजक्ता मोठी झालीये. गोट्याही मोठा झाला असणारच! दरम्यानच्या काळात प्राजक्ताला अनेक प्रश्न पडायचे… त्या तिघांना कुठल्या शाळेत अॅडमिशन मिळालं असेल? मिळालं असेल ना? काही अडचण आली असेल का अॅडमिशन मिळताना? ते ‘कोवळं प्रेम’ कुठून कुठं घेउन गेलं असेल त्याला? त्या वेळचा “हिरो” नंतर “विलन” तर झाला नसेल ना? यातूनही त्याच्या आयुष्यातल्या ‘प्रेम’ या भावनेलाच तडा गेला नसावा एवढं तिला आजही वाटतं…

 

 

2 Comments
 1. Lokesh mashalkar says

  अशा अवस्थेतील मुलांना मुलींना कशा प्रकार मार्गदर्शन कसे करावे
  याविषयी एखादा लेख पोस्ट करावा

  1. I सोच says

   वेबसाइटबद्दल तुमचा अभिप्राय कळवल्याबद्दल थँक्स. या विषयावर लवकरच एक लेख पोस्ट करणार आहोत. तुमचे विचार अधिक समजून घ्यायला आवडेल.
   लिहीत रहा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.