बायकोला मारलं, तर काय बिघडलं? – मुक्ता चैतन्य

हरयाणातली 13 ते 15 वर्षाची मुलं. ते म्हणतात, मुलींना बघून शिट्टी मारणं, टॉन्ट मारणं, त्यांची छेड काढणं यात काहीही गैर नाही. मुलांच्या वाढीच्या दिवसातला तो अपरिहार्य आणि आवश्यक भाग आहे. आणि भविष्यात बायकोनं ऐकलं नाही आपलं म्हणून मारलं तिला तरी काही बिघडत नाही !

1,080

आपल्या समाजात स्री-पुरुष समानता आहे का?
फेसबुकच्या कट्टय़ावर असा प्रश्न विचारला की लोक वेडय़ात काढतात. आपल्या समाजात आता स्री-पुरु ष समानता आली आहे. काही स्रियाही आता प्रसंगी अनेक कायद्यांचा गैरवापर करतात. आता पुरुषमुक्तीच्या चळवळीची आवश्यकता आहे अशा कमेण्ट्सना  प्रचंड उधाण येतं. पण फेसबुकवर दिसणारी, जाणवणारी आभासी लैंगिक समानता खरंच वास्तवात आहे का?

आपल्या अवतीभोवतीचं चित्र आजही काहीतरी वेगळं सांगतंय.
मागच्या वर्षी एप्रिलमध्ये एक स्टोरी करायला मी पंजाबमध्ये गेले होते. पंजाबमध्ये पाऊल ठेवल्यापासून शेतात काम करणार्‍या शेतमजूर स्रिया मला दिसत होत्या. पोलिसात काम करणार्‍या काहीजणी भेटल्या. पण पंजाबच्या खेडय़ांमधून फिरताना जाणवलं व्यवस्थेत अजूनही स्रिया ‘अदृश्य’ आहेत. इथं एखादी इशारा रानी महिला आरक्षणातून निवडून येते, सरपंच होते; पण जगाला सरपंच म्हणून तिचा नवरा, सतपाल सिंगच  माहीत असतो, ती फक्त कागदोपत्नी सरपंच असते. जगासाठी, गावासाठी, व्यवहारासाठी इशारा रानी सरपंच नाहीये. ती असणं अपेक्षितही नाहीये. ते तिलाही काही प्रमाणात मान्य आहेच. अनेक गावात तर लग्न करून सासरी आल्या तशा घराबाहेर कधीही न पडलेल्या महिलांना मी भेटले होते. कशाला पडायचं घराबाहेर हा त्यांचा मूलभूत प्रश्न होता. जे जे लागेल ते ते सारं सगळं नवरा, भाऊ, मुलगा आणून देतात तर कशाला जायचं बाजारात? लग्ना-कार्यात बाजारहाट करायला जायचं असलं तरी बरोबर पुरुष हवेतच. एकटय़ा बायकांना जाण्याची तशी परवानगी नाहीच. आणि हे सर्वमान्य आहे. ट्रॅक्टरवर बसलेल्या चेहरा झाकलेल्या कितीतरी स्रिया दिसत होत्या.

हे सगळं पाहून अस्वस्थ वाटतंच. मला आठवतं, काही वर्षापूर्वी ऑक्सिजनने एक वाचक चर्चा घेतली होती. त्यातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. अनेक तरु णांना आपल्या गर्लफ्रेण्ड – बायकोवर हात उगारण्यात काहीही गैर वाटत नाही असं दिसून आलं होतं. इतकंच नाही तर अनेक मुलींना नवर्‍यानं बॉयफ्रेण्डने हात उगारणं, मारणं, यात काहीच गैर वाटत नव्हतं. नवरा, बॉयफ्रेण्ड मारतो कारण त्याचं आपल्यावर प्रेम असतं, हक्क असतो असं मुलीही मान्य करताना दिसल्या.

हे सगळं काय सांगतं?
काही दिवसांपूर्वीच मार्था फेरेल फाउण्डेशन या भारतात स्री-पुरुष समानतेसाठी काम करणार्‍या संस्थेनं काही द्वितीय श्रेणी शहरांमध्ये सर्वेक्षण केलं होतं. स्री-पुरुष समानता आणि स्रियांना सामोर्‍या जाव्या लागणार्‍या हिंसेच्या संदर्भातील विषयांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यात हरयाणा राज्यातले तरु ण सहभागी होते. 13 ते 15 या वयोगटातले म्हणजे ऐन तारुण्यात पाऊल ठेवणारी ही मुलं. हीच मुलं उद्याच्या समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत, अशावेळी आज हे टिनएजर्स काय विचार करतात हे समजून घेणं आवश्यक आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तरु णांपैकी 58 टक्के तरु णांना वाटतं की त्यांच्या होणार्‍या बायकोवर त्यांचा अधिकार आहे आणि तिनं त्यांच्या वर्चस्वाखालीच राहिलं पाहिजे. 48 टक्के सहभागी तरु णांना वाटतं की मुलींच्या कपडय़ांमुळे आणि त्यांच्या वर्तनामुळे त्यांना लैंगिक छळाला सामोरं जावं लागतं. बायकोने नवर्‍याचं ऐकलं नाही तर तिला मारण्याचा नवर्‍याला पूर्ण अधिकार आहे असं 21 टक्के मुलांना वाटतं. तर 34 टक्के तरु णांना वाटतं, की प्रवास करावा लागेल अशा नोकर्‍या स्रियांनी करूच नयेत. अर्थात ही आकडेवारी धक्कादायक असली तरी याच सर्वेक्षणात काही दिलासा देणार्‍या गोष्टीही समोर आल्या. 85 टक्के सहभागी तरुणांना वाटतं की लैंगिक अन्याय आणि  अत्याचाराविरोधात स्रियांनी आवाज उठवला पाहिजे. आणि 81 टक्के तरुणांचा हुंडा पद्धतीला विरोध आहे. शिवाय याच सर्वेक्षणात अनेकांनी असंही नोंदवलं आहे कीमुलींना बघून शिट्टी मारणं, टॉन्ट मारणं, त्यांची छेड काढणं यात काहीही गैर नाही. मुलांच्या वाढीच्या दिवसातला तो अपरिहार्य आणि आवश्यक भाग आहे.

ही आकडेवारी आणि वाढणार्‍या मुलांनी मांडलेली मतं काय सांगतात?
पंजाब असो, महाराष्ट्र असो, हरयाणा असो नाहीतर जाऊनही कुठलं राज्य, भारतभरात कुठल्याही राज्यात गेलात तरी समाज म्हणून आपण स्रीपुरु ष समानतेसाठी झगडत आहोत. याचं कारण म्हणजे परंपरेने चालत आलेल्या पुरु ष प्रधान संस्कृतीची पाळंमुळं उघडून टाकणं अजूनही आपल्याला जमलेलं नाही. वर्चस्ववादाची भूक कायमच असते. कुटुंबावर, स्रियांवर, कुटुंबातल्या इतर सदस्यांवर वर्चस्व गाजवण्याच्या अधिकार पिढय़ानपिढय़ा पुरुषांना मिळालेला आहे. चांगल्या शिकल्या-सवरलेल्या घरातही घरातल्या मुलाला ‘कुटुंब प्रमुख’ संबोधलं जातं. त्या घरासाठी मरमर करणार्‍या स्रीकडे दुर्लक्ष करणं आपल्याला समाज म्हणून अंगवळणी पडलेलं आहे. आपण दुय्यम आहोत ही भावना स्रियांच्या मनातही पुरती रुजलेली असते. त्यामुळे आपल्याबरोबर जे काही घडतंय त्यात काहीतरी चुकीचं आहे, खटकणारं आहे हे त्यांच्याही अनेकदा लक्षात येत नाही. कुटुंब व्यवस्था चालावी म्हणून एकेकाळी कामांची विभागणी झाली त्यात काळानुसार बदल केले पाहिजे, जगण्याच्या पद्धतीत, संकल्पनेत बदल होत असतो तो लक्षात न घेता जे पूर्वीपासून चालू आहे ते उत्तम असं समजून आजही आपण त्या जुन्याचीच री ओढतो आहोत. तसं झालं तर आपल्या आयुष्यात हे परस्पर आदर आणि समतेचं सूत्र कसं रुजेल?

आयुष्यात परस्पर आदर आणि समतेचं सूत्र रुजवायचं असेल  तर परंपरेने आपल्याला जे शिकवलं त्यापलीकडे बरंच काही आहे हे मान्य करून जुने चष्मे उतरवून नव्यानं आपल्या जगण्याकडे बघायला लागेल.
आहे का आपली तयारी?

( लेखिका स्वतंत्र पत्रकार आहेत.)

बातमीचा स्त्रोत : लोकमत ऑक्सिजन : http://www.lokmat.com/oxygen/haryana-youth-believe-men-can-dictate-their-women-survey/

Comments are closed.