सगळ्यात पहिल्यांदा सिगारेटचा लैंगिक आयुष्यावर काय परिणाम होतो याविषयी बोलूयात. खूप प्रमाणात सिगारेट पिणाऱ्या पुरुषांच्या पुरुषबीज निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. रक्तवाहिन्या अरुंद होऊन लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येते. बायकांमध्ये रजोनिवृत्ती लवकर येणं, गर्भार महिलांचा गर्भ पडणं, कमी वजनाची मुलं जन्माला येणं, प्रीमॅच्युर प्रसूती होणं असे परिणाम दिसतात.
इतर व्यसनांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, कोणत्या अंमली पदार्थाचा किती व कसा परिणाम होतो हे त्या पदार्थावर अवलंबून असते. त्याचबरोबर किती प्रमाणात अंमली पदार्थ घेतला आहे, एका वेळी किती पदार्थ घेतले आहेत, शरीराला त्या पदार्थांची किती सवय आहे इ. गोष्टींवर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
काही उदाहरणे खाली दिली आहेत.
१. दीर्घकाळ कोकेन घेतल्याने लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येते.
२. गांजा, भांग असे पदार्थ सातत्याने घेतल्याने पुरुषबीज निर्मितीवर त्याचा परिणाम होतो.
३. हेरॉईन सारख्या पदार्थांमुळे लैंगिक इच्छा कमी होणं, वीर्यपतन होण्यास अडचण येऊ शकते.
४. सातत्याने दारू पिऊन पुरुषांची वृषणं सुकायला लागतात. टेस्टॊस्टेरॉनचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होऊ शकते. स्त्री बीज परिपक्व होण्यास अडचण येऊ शकते.