पाळीचक्रातले काही काळ जननक्षम असतात, म्हणजेच त्या काळाच गर्भधारणेला पोषक असं वातावरण तयार होत असतं. त्यातली एक महत्त्वाची खूण म्हणजे योनी व गर्भाशयाच्या मुखातून पाझरणारा स्राव आणि त्यातले बदल.
गर्भाशय मुखातील म्हणजेच ग्रीवेतील श्लेष्मा
डोळे मिटून लक्ष केंद्रित करा.
- तुमच्या मायांगात म्हणजेच योनीत किंवा मांड्यांमध्ये तुम्हाला काय संवेदना जाणवतात?
- मायांगामध्ये ओलसरपणा जाणवतो का कोरडेपणा?
- योनीमार्गातून काही स्राव येतो आहे का? हे पाहण्यासाठी हात स्वच्छ धुऊन दोन बोटं योनीमार्गामध्ये सरकवा आणि हाताला स्राव लागतो आहे का ते पहा. योनीमार्गाताला स्राव अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये घ्या आणि तो कसा आहे ते पहा.
- स्राव कोरडा आहे का ओला?
- त्याचा रंग कसा आहे?
- स्राव किती प्रमाणात आहे?
- स्रावाचा स्पर्श बुळबुळीत आहे की चिकट?
- स्राव बोटामध्ये घेतला तर तो ताणला जातो का तुटतो?
एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर आपण स्राव नक्की कसा आहे हे समजून घेऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाच्या आतील बाजूस खास पोकळीच श्लेष्मा तयार होतो. याला इंग्रजीत म्युकस म्हणतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या प्रभावामुळे यात दोन वेगळ्या प्रकारचे स्राव तयार होतात. पातळ, बुळबुळीत, पारदर्शक (गर्भधारणेस पोषक) आणि घट्ट, चिकट आणि पांढुरका (गर्भधारणेसाठी पोषक नाही). काचेच्या पट्टीवर श्लेष्मा वाळवला आणि भिंगातून पाहिला तर तो नेच्याच्या पानांसारखा दिसतो.
घट्ट श्लेष्मा शुक्राणूंना लांब ठेवतो.
बुळबुळीत किंवा निसरडा श्लेष्मा पुरुष बीजांना गर्भाशयापर्यंत जायला मदत करतो.
स्त्रीच्या बीजकोषातून बीज बाहेर येतं आणि त्या काळात पुरुष बीज त्यापर्यंत पोचलं तर गर्भधारणा होऊ शकते. या प्रक्रियेत हा श्लेष्मा महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या योनीमार्गात तयार होणारे स्राव कशा प्रकारचे आहेत याचं निरीक्षण केल्यास पाळी चक्रात होणारे बदल नीट लक्षात येतात.
पुढील लेखात गर्भाशय मुख किंवा ग्रीवेत होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेऊ.
(क्रमशः)
No Responses