लैंगिक आरोग्य
लैंगिक आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव नाही तर एकूणच स्वस्थ आणि निरोगी असणे. लैंगिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मानवी हक्कांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. आयुष्याच्या सर्वच टप्प्यांवर लैंगिक आरोग्याचा विचार होणं गरजेचं आहे. लहान मुलं आणि वृद्धांसंदर्भातही लैंगिक आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. विविध प्रकारच्या लैंगिक वर्तनाचा लैंगिक आरोग्याशी संबंध आहे. सामाजिक आणि जीवशास्त्रीय घटकांचा एकत्रित परिणाम लैंगिक आरोग्यावर होत असतो.
लैंगिक आरोग्याचा विचार करण्यासाठी आधी लैंगिकतेचा सकारात्मक पद्धतीने विचार करायला पाहिजे. लैंगिकता, लैंगिक नाती तसंच सुरक्षित आणि सुखकर लैंगिक संबंध, ज्यामध्ये जबरदस्ती किंवा हिंसा नाही असे लैंगिक संबंध या सर्वांचाच विचार लैंगिक आरोग्यामध्ये आवश्यक आहे.
काही नेहमी आढळणारे लैंगिक आजार, त्यांची लक्षणं, रोगनिदान आणि त्यासंबंधीची प्राथमिक माहिती आपण या सदरात घेणार आहोत. स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्यासाठी त्याची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये आपल्या लैंगिक अवयवांचाही समावेश होतो.
तुमच्या मनात लैंगिक आरोग्याबद्दल काही शंका असल्यास त्या मोकळेपणाने इथे विचारा.