वेबसाईटबद्दल
लैंगिकता हा विषयच असा आहे की एकतर त्याबद्दल मोकळेपणाने बोलले जात नाही दुसरे बोलायचेच तरी ते कोणाशी बोलायचे आणि कसे बोलायचे हेही अनेकदा कळत नाही. त्यामुळे लहान समस्यांचे स्वरुपही मोठे वाटू शकते आणि मोठ्या समस्या तर अनुत्तरीतच राहून जातात. त्यातून मानसिक – शारीरिक ताण येऊ शकतो. ह्यातून वाट काढायची तरी कशी, हे समजून घेण्यासाठीच ही वेबसाइट आम्ही तयार केली आहे. लैंगिकतेबद्दल आजवर भरपूर संशोधन जगात झाले आहे पण मराठीत त्यापैकी फारसे सहज उपलब्ध नाही. म्हणून, या विषयासंदर्भातली अचूक शास्त्रीय माहिती सर्वांना मिळावी तसेच लैंगिकतेविषयी कोणतेही प्रश्न अगदी मनमोकळेपणाने विचारता यावेत हा या वेबसाईटचा उद्देश आहे.
ही वेबसाईट तरुणांना पडणार्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तर आहेच पण पालकांना आपल्या पाल्यांशी त्यांच्या वयोगटानुसार लैंगिकतेबाबत संवाद कसा करावा हे सांगणारी तसेच लैंगिकतेबाबत काम करणारे प्रशिक्षक/ शिक्षक/ कौंसलर यांनाही इतरांशी बोलताना लागणारी माहिती उपलब्ध व्हावी, त्यासाठी वापरता येण्याजोगे साहित्य सहज मिळावे असा सर्वसमावेशक विचार या वेबसाईटमध्ये केलेला आहे.
लैंगिकतेविषयीच्या प्रश्नांना पालकांना सामोरे जावे लागते. मुलांच्या प्रश्नांनी निरुत्तर होणे बरे नाही. त्यासाठी तज्ञ असण्याचीही गरज नसते. लैंगिकतेविषयी समजून घेण्याची इच्छा असणे व मोकळेपणाने बोलण्याची आणि ऐकण्याची तयारी असणे पुरेसे असते. मुलांशी लैंगिकता, शरीर, भावना आणि नातेसंबंधांबद्दल मोकळेपणाने केलेल्या संभाषणाने त्यांना अधिक सुरक्षित वाटेल. त्यांचे लैंगिक आरोग्य चांगले राखण्यासाठी हे अगदी आवश्यक आहे. तसेच बालक-पालक संवादही चांगला राहिल.
शाळा, संस्था, संघटना अशा ठिकाणी शिक्षक-प्रशिक्षक-समुपदेशक( कौंसलर)म्हणून काम करताना आपल्याला योग्य माहिती आहे ना हे तपासत राहावे लागते. अद्ययावत माहिती नव्याने सतत मिळवत राहावे लागते. लैंगिकतेबाबतचा स्वतःचा दृष्टिकोन पडताळत राहावा लागतो. शब्दांचा योग्य वापर, सादरीकरण अशा या कितीतरी बाबी असू शकतात. याविषयांबाबत आवश्यक साहित्य/संसाधने इथे उपलब्ध असतील.
तथापि ट्रस्टबद्दल
ही वेबसाईट मुळात तथापि ट्रस्ट या संस्थेने २०१४ मध्ये सुरु केली. तथापि ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्रात स्त्रिया आणि आरोग्य संसाधन संवर्धनाच्या क्षेत्रात २००० सालापासून कार्यरत आहे. त्या आधी राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी सुरू केलेल्या ‘वाह!’ या स्त्रिया आणि आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमात तथापिने संसाधन केंद्र म्हणून काम केले. त्यादरम्यान गोळा झालेली सर्व संसाधने आणि माहितीतून प्रेरणा घेत स्त्रिया आणि आरोग्य या विषयावरील संसाधने कार्यकर्त्यांना एकाच छताखाली मिळावीत यासाठी तथापिचे संसाधन केंद्र सुरू झाले. तेव्हापासून पुढील २० वर्षांहून अधिक काळ तथापिने आरोग्य, हिंसा, समानता, लैंगिकता आणि अपंगत्व अशा विविध विषयांवर मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये विविध स्वरुपाची संसाधने तयार केली. ही वेबसाईट अशाच प्रकारच्या संसाधनाचा भाग म्हणुन युवकांना केंद्रस्थानी धरुन तयार केली गेली.
२०२१ मध्ये आमच्या प्रयास आरोग्य गटाने या वेबसाइटचे काम स्वीकारले. आता तिची पुनर्रचना करून ती अद्ययावत स्वरूपात आपल्यासमोर आम्ही सादर करत आहोत.
प्रयासबद्दल
प्रयास, पुणे ही सामाजिक संस्था १९९४ सालापासून आरोग्य, ऊर्जा, शिक्षण व पालकत्व या विषयांत काम करते. प्रयासच्या आरोग्यगटाचे काम मुख्यत: एचआयव्ही, लैंगिकता, प्रजनन आरोग्य व अधिकारांसंबंधीचे आहे. या विषयांशी निगडीत संशोधन, जनजागृती असे कार्यक्रम आणि शिवाय तरुण व एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींसाठी वैद्यकीय व समुपदेशन सेवा देण्याचे कामही प्रयासचा आरोग्य गट करत आहे.
प्रयासबद्दल
प्रयास, पुणे ही सामाजिक संस्था १९९४ सालापासून आरोग्य, ऊर्जा, शिक्षण व पालकत्व या विषयांत काम करते. प्रयासच्या आरोग्यगटाचे काम मुख्यत: एचआयव्ही, लैंगिकता, प्रजनन आरोग्य व अधिकारांसंबंधीचे आहे. या विषयांशी निगडीत संशोधन, जनजागृती असे कार्यक्रम आणि शिवाय तरुण व एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींसाठी वैद्यकीय व समुपदेशन सेवा देण्याचे कामही प्रयासचा आरोग्य गट करत आहे.