प्रश्नोत्तरेकुटुंब नियोजन साठी injection पद्धत

2 उत्तर

कुटुंब नियोजनासाठी इंजेक्शन पद्धत हे फक्त स्त्रीने वापरावयाचे गर्भनिरोधक साधन आहे. गर्भनिरोधन ही स्त्री इतकीच पुरुषाची देखील जबाबदारी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता वळूयात या इंजेक्शनच्या माहितीकडे.

हॉर्मोनचे इंजेक्शन हे गर्भनिरोधनासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. यामध्ये एक किंवा दोन प्रकारची हॉर्मोन्स (progestin only / progestin+estrogen) शरीरात टोचली जातात. हे फक्त बाईने / स्त्रीने वापरावयाचे साधन आहे. या हॉर्मोन्समुळे स्त्रीबीज बीजांडामधून फलित होऊन बाहेर टाकले जाण्याची प्रक्रिया थांबते. तसेच गर्भाशयमुखाजवळील स्त्राव घट्ट होतो; त्यामुळे शुक्राणू स्त्री बीजापर्यंत पोहचू शकत नाहीत व अशा प्रकारे गर्भधारणा टाळली जाते.

हॉर्मोनच्या इंजेक्शनमध्ये DMPA/NET-IN/CYCLOFEM इ. इंजेक्शन्स भारतात उपलब्ध आहेत. यातील DMPA हे इंजेक्शन जास्त प्रमाणात वापरले जाते. ते साधारत: दर ३ महिन्यांनंतर परत घ्यावे लागते. प्रसुतीनंतरच्या काळात किंवा अॅबॉर्शननंतरही हे इंजेक्शन घेता येऊ शकते. योग्य प्रकारे व वेळच्या वेळी घेत राहिल्यास प्रेग्नन्सीचा धोका जवळ जवळ नसतो. इंजेक्शन घ्यायचे थांबवल्यानंतर साधारण ९-१० महिन्यांनतर प्रेग्नन्सी राहु शकते. अर्थात हे इंजेक्शन घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे.

इंजेक्शन काही महिन्यातून एकदाच घ्यायचे असल्याने प्रत्येक संबंधाच्या वेळी दुसरी काही खबरदारी घ्यायची गरज नसते. अर्थात शरीरसंबधातून ‘गरोदरपण राहणे’ फक्त एवढाच भाग नसतो. एच. आय. व्ही. किंवा इतर लिंगसांसर्गिक आजारांचा धोकाही असतो. या आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी सध्यातरी पुरुषांनी किंवा बायकांनी वापरायचे कंडोम हा एकच पर्याय उपलब्ध आहे. हॉर्मोनच्या इंजेक्शनमुळे लिंगसांसर्गिक आजारांपासून कुठलेही सरंक्षण मिळत नाही. त्यामुळे ज्यांना जोखीम आहे त्यांनी इंजेक्शन बरोबर कंडोमही वापरणे हितावहच आहे.

या इंजेक्शनचे काही दुष्परिणामही आहेत. अनियमित पाळी येणे, पाळी न येणे ही लक्षणे बऱ्याच जणींमध्ये दिसून येतात. परंतु इंजेक्शन थांबवल्यानंतर पाळी पूर्वपदावर येते. काही अभ्यासांमध्ये हाडं ठिसूळ होणे, स्तनांचा कॅन्सर, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे याप्रकारचे गंभीर दुष्परिणाम क्वचित दिसून आले आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 10 =