प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भधारणा कशी होते?
1 उत्तर

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत.

बहुतेक स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय, बीजवाहिन्या आणि बीजकोष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री बीजं असतात. वयात येण्याच्या काळात बीजकोषातली बीजं परिपक्व किंवा तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. गर्भ तयार होईल या शक्यतेनुसार गर्भाशयामध्ये अनेक बदल होतात. गर्भाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं. मात्र पुरुष बीज न आल्यास हे बीज तिथेच विरघळून जाते आणि त्यानंतर 12-16 दिवसांनी गर्भाशयाचं अस्तर गळून पडायला लागतं. म्हणजेच पाळी येते.

पुरुष बीज कुठून येतं?

पुरुषाच्या शरीरात वृषणांच्या आत दोन बीजकोष असतात. मुलगा वयात येऊ लागला की या बीजकोषांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने पुरुष बीजं तयार व्हायला लागतात. यांनाच शुक्राणू असंही म्हणतात. असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बीजं तयार होतात. आणि त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं!

लैंगिक संबंधांदरम्याल जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतं तेव्हा एका क्षणी लिंगामधून वीर्य बाहेर येतं. या वीर्यामध्ये लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं असतात. ती पोहत पोहत बीजवाहिन्यांच्या दिशेने प्रवास करू लागतात. बीजवाहिनीमध्ये तेव्हा स्त्री बीज असेल तर एक पुरुष बीज स्त्रीबीजामध्ये शिरतं आणि त्यातून फलित गर्भ तयार होतो. हा फलित गर्भ पुढील १० दिवसांमध्ये पुढे सरकत येतो आणि गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतो. ही सर्व प्रक्रिया निर्धोकपणे पार पडली तर गर्भधारणा झाली असं म्हणता येईल.

पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 3 =