प्रश्नोत्तरेजसे दोन मित्र एकमेकांशी सेक्स विषयी बोलतात तसेच मित्र आणि मैत्रीण सेक्स विषय एकमेकांशी का बोलत नाहित आणि तसेच दोन मैत्रीनी सेक्स विषयी एकमेकींशी बोलतात का

1 उत्तर

एक तर आपल्या समाजात सेक्सविषयी बोलणं ही गोष्ट तितकी सहज किंवा मोकळेपणाने स्वीकारली जात नाही. त्यामुळे सेक्सविषयी बोलण्याच्या ‘जागा’ देखील सहजपणे उपलब्ध होणाऱ्या नसतात. त्यातल्या त्यात सेक्सविषयी मुलं एकमेकांशी बोलतात, कारण आपला समाज हा पुरुषप्रधान आहे आणि या पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषांच्या लैंगिक गरजांचा, भावनांचा जसा विचार केला जातो, तितका तो स्त्रियांच्या बाबतीत केला जात नाही. लहानाचं मोठं होण्याच्या काळात मुलांचा बाहेरच्या जगाशी अधिक संपर्क येतो. केवळ पुरुष म्हणून जन्माला आल्यानेदेखील अनेक फायदे मुलांना आपसूकच मिळतात. याउलट लहानपणापासूनच मुलींना स्वतःच्या आवडी-निवडी, विचार, भावना, मतं व्यक्त करण्यास पोषक वातावरण घरात किंवा बाहेरही उपलब्ध नसतं. उलट अनेक बंधनंच लादली जातात, त्यामुळं सेक्ससारख्या नाजूक विषयावर अनेकदा मुली किंवा मैत्रिणीदेखील मुलांच्या तुलनेत कमी प्रमाणात बोलतात. पण बोलतातच किंवा बोलतच नाहीत, असं नेमकं उत्तर यावर नाही. कारण आपल्या घरातलं, घराबाहेरचं वातावरण, आपण ज्या मित्र-मैत्रिणीमध्ये वावरतो त्यांचे विचार, मिळणाऱ्या संधी अशा अनेक गोष्टींवर ते अवलंबून असतं.

हेच एक मैत्रीण आणि एक मित्र एकमेकांशी सेक्सविषयी का बोलत नाहीत या प्रश्नाला देखील लागू आहे. यामध्ये त्या दोघांमध्ये काय नातं आहे, मोकळेपणाचा, विश्वासपूर्ण संवाद आहे का, या गोष्टीदेखील महत्वाच्या असतात. याशिवाय अनेकदा मुलगी स्वतःहून एखाद्या मुलाशी किंवा मित्राशी सेक्सविषयी बोलत असेल तर ती सेक्ससाठी उपलब्ध आहे किंवा चांगल्या संस्कारांची नाही किंवा वाह्यात आहे, असे गैरअर्थ देखील काढले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे देखील मुली बोलत नाही किंवा वर म्हटल्याप्रमाणे मुलींची जडणघडण अशा पद्धतीने होते की त्यांनी लाजलं पाहिजे, सेक्ससारख्या विषयावर त्या बोलल्या नाहीत तर त्या चांगल्या संस्काराच्या आहेत, असे विचार मुलींवर कळत-नकळतपणे बिंबवले गेलेले असतात, हेसुद्धा मुली सेक्सविषयी किंवा लैंगिक भावनांविषयी सहजपणे न बोलण्याचं कारण असू शकतं.

पण खरं तर विश्वासाचं, आदराचं, मैत्रीपूर्ण नातं मुला-मुलींमध्ये असेल आणि सेक्सविषयी बोलायला, ऐकायला दोघांनाही सहज वाटणार असेल, चालणार असेल तर तर सेक्सविषयी बोलण्यात गैर काहीच नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 15 =